सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष..  – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

नुकतीच सकाळ’मधे बातमी वाचली की विलिंग्डन कॉलेजला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत .तोंडून आपोआप उद्गार आले ” अरे वा, आमचं कॉलेज शंभर वर्षांचं झालं” असं म्हणत असताना मी आमच्या कॉलेजचा इतिहास आणि माझ्या कॉलेज जीवनाच्या चार वर्षांच्या भूतकाळात रममाण झाले.

दक्षिणा महाराष्ट्रात त्यावेळी उच्च शिक्षणाची सोय नव्हती. डी. ई. सोसायटीच्या कार्यकर्त्यांच्या मनात दक्षिण महाराष्ट्रात एखादे महाविद्यालय काढावे असा विचार आला शिक्षण दिल्याशिवाय त्यांच्यात जागृती निर्माण होणार नाही असा एक विचार होता सांगली मिरजेच्या परिसराची पाहणी करून सर्व दृष्टीने योग्य असा निर्णय घेण्यात आला

महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी त्यावेळेचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्याकडे मंडळी गेली आणि विलिंग्डन यांनी अपेक्षेबाहेर मदत केली. अनेकांचा विरोध दूर करून महाविद्यालयाचा मार्ग मोकळा केला. तत्कालीन परिस्थिती त्यांच्या मदतीशिवाय हे महाविद्यालय निघणे शक्य नव्हते. म्हणून त्यांचेच नाव या महाविद्यालयाला देण्याचा निर्णय डी. ई. सोसायटी ने घेतला.२२जून१९१९ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू  सर चिमणलाल  सेटलवाड यांच्या हस्ते विलिंग्डन महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी उच्चारलेली  वाणी पूर्णांशाने खरी ठरली आहे. ते म्हणाले‌‌.‌ It is a great day for the southern  maratha country, for today this part of the country views the  birth of an institution, which has a great future and which will play an important part in the educational and political progress of the  southern maratha country.

१९६५साली मी मिरजच्या जुबिली कन्या शाळेतून अकरावी मॅट्रिक पास होऊन, प्री. डिग्री आर्ट्सला प्रवेश घेतला. साध्या कन्या शाळेतून एकदम एका भारदस्त, प्रतिष्ठित,नामांकित, अलौकिक आणि इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये येताना थोडं काय, पण खूपच  गांगरायला  झालं. आमचा पी. डी .आर्ट्सचा ,सहा नंबरचा, मोठा वर्ग पूर्ण भरलेला असायचा. दोन लेक्चर्स मधील दहा मिनिटे म्हणजे धमाल असायची. कागदी बाण फेकण काय ,टोमणे मारणे काय, टोपण नावाने चेष्टा करणं काय, सगळाच गोंधळ असायचा. लेडीज रूमपासून वर्गापर्यंत किंवा रेल्वे स्टेशन पर्यंत आम्ही एकटी दुकटी कधीच जात नव्हतो. कायम ग्रुपनेच जायचो. कधी मुलांची बोलणं तर दूरच ,पण उगीचच एक भीती आणि संकोच मनात वाटायचा.

प्री.डिग्रीला असताना असणारे सरांचा भूगोलाचा तास खूप आवडायचा कारण तो माझा आवडीचा विषय होता आणि त्यात सर्वोच्च मार्गही मिळाले होते.  प्रिन्सिपल  मुगळी सरांनी शिकविलेली डफोडिल्स कविता अजूनही आठवते.

डफोडिल्सच्या  लाटांप्रमाणे ते स्वताही  डोलायचे. इंग्रजीचे खळदकर सरांची सुपरफास्ट गाडी वर्गात आल्यापासून सुरू व्हायची. संपल्यानंतरच थांबायची. आम्हा मराठी माध्यमातून आलेल्यांना.  सुरुवातीला ते डोक्यावरून जायचं. हळू हळू सवय झाली. आणि मग आवडायला लागलं.

त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने एन.सी.सी.  स्पोर्टस्  किंवा पी.टी. यापैकी एका प्रकारात भाग घेणे सक्तीचे असायचे. मला खेळाची आवड व अनुभव असून सुद्धा संकोच आणि बुजरेपणा मुळे खेळात न जाता एन सी सी मध्ये भाग घेतला निपाणीजवळ अर्जुन नगरच्या दहा दिवसाच्या  कंपने  खूप काही शिकविले . दहा दिवस कडक परेड फायरिंग रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम हार्ड वर्क अनेक ओळखी जमवून घेण्याची वृत्ती आणि शेवटच्या दिवशीचा कंप फायर सगळा खूप छान अनुभव मिळाला. त्याचा पुढील आयुष्यातही उपयोग झाला.

प्रि डिग्री पास होऊन एफ वाय बी ए ला प्रवेश घेतला. आता बुजणे अनेक भीती थोडी कमी झाली. थोडा आत्मविश्वास आला. माझी खेळातील मैत्रीण शीलकरमरकरने खो-खो  सिलेक्शनसाठी माझं नाव दिलं. स्वत‌ःचा  स्पोर्ट्स ड्रेस घालायला लावून मला ग्राउंड वर घेऊनच गेली .एक दीड वर्ष खेळाची सवय मोडली होती. पण तरीही खो-खोच्या टीम मध्ये मी निवडले गेले आणि पुढील सामान्यांसाठी सराव सुरू झाला. मला मोठ्या कौतुकानं सांगावसं वाटतं की त्यावेळी विलिंग्डनची  बहुतेक प्रत्येक टीम सांगली दोन ला चॅम्पियन असायची. आता माझ्यातला संकोच भीती बुजरे पणा कमी झाला होता. शाळा सोडल्यानंतर पुन्हा खेळण्याची संधी मिळाली.खेळाची ओढ मुळात होतीच. ती आता जास्तच वाढली अभ्यासात कधी फर्स्ट क्लास वगैरे मिळाला नाही कुठे गच्चूही खाल्ला नाही. पांडवप्रताप नावाच्या विनोदी एकांकिकेसाठी विचारणा झाली आणि मी पटकन होकार दिला द्रौपदीची छोटीशी भूमिका पार पाडण्याची संधी आणि अभिनयाचा छान अनुभव मिळाला.

एस वाय बी ए ला प्रवेश घेतला संपूर्ण वर्ष खूपच धामधुमीत गेल. जिमखाना मॅनेजिंग कमिटीच्या निवडणुकीत जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी एल आर म्हणून मी निवडून आले आवडीचे आणि मानाचे स्थान मिळाले खूप खूप आनंद झाला त्याच बरोबर बऱ्याच जबाबदाऱ्याही आल्या.  बुजणारी तीच मी आता  धीट झाले होते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments