सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष..  – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

(बुजणारी तीच मी आता धीट झाले होते.) इथून पुढे —-

वेगवेगळ्या खेळांसाठी नावे घेणे निवड करून टीम तयार करणे सामान्यांच्या वेळी हजर राहून खेळाडूंच्या गरजा  अशी अनेक कामे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊनही आवडीने व चोखपणे केली. गोरे सरही जिमखान्यातील गरजा अडचणी याबद्दल सतत चौकशी करायचे. प्रत्येक  टीम खेळायला जाण्यापूर्वी मीटिंग घेऊन स दिच्छा देत व सल्लेही देत त्याचप्रमाणे  विद्यार्थिनी सल्लागार पिटके बाई मार्गदर्शन करीत असत आमच्या खो-खो कबड्डी अथलटिक्सच्या टीम बरोबर परगावी जाताना कधी पिटके बाई कधी  पोंक्षे बाई कधी उत्तरा जोशी बाई कोणी ना कोणी अगदी मोकळ्या मैत्रिणी सारख्या असायचा खेळाडूंचे खाणेपिणे लागले खुपले अगदी जातीने पहायच्या. शिपाई मारुती तात्या सदा यांनीही उत्तम सहकार्य केलं मी एल आर झाल्यानंतर मुलींची कबड्डी आणि ग्राउंड टेनिसची टीम प्रथमच सुरू झाली या संबंध वर्षात मी स्वतःही अनेक खेळात घेऊन कॉलेज पातळीवर बरीच बक्षिसे मिळविली आत्मप्रौढीचा दोष पत्करून सुद्धा सांगायला अभिमान वाटतो की उंच उडी मध्ये सांगली झोनला पहिला नंबर आला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या  पोर्च मधील बोर्डवर जेव्हा आपलंच नाव रंगीत अक्षरात पाहिलं आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला तेव्हा झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता जिमखाना डे म्हणजे आमचा मिरवण्याचा उत्साहाचा पर्वणी चा दिवस. बक्षीस समारंभाला कोणाला बोलवायचे याबाबत  प्रो. गोरे सर सर्वांची मते घ्यायचे व मिळून प्लॅनिंग करायचे.

कॉलेजचे गॅदरिंगही  धुमधडाक्यात  असायचे. त्यातील एक भाग सरप्राईज गिफ्ट असा असायचा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे सवयी कडे पाहून किरकोळ बक्षीस देत असत मी देहयष्टीने  खूप बारीक होते तरीही स्टॅमिना चांगला होता बऱ्याच खेळात खेळत होते मला नाव पुकारून स्टेजवर बोलावले गेले आणि डोंगरे बालामृत ची बाटली दिली हसत-हसत स्वीकारली सर्वजण खूप खूप हसले संपूर्ण वर्ष असच धामधुमीत गेलं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं शेवटचे दोन महिने जोरदार अभ्यास केला लॉजिक आणि सायकॉलॉजी विषय खूप आवडायचे इंग्रजीच्या नातू सरांनी शिकविलेली ॲनिमल फार्म कादंबरी अजूनही विसरलेली नाही मी प्राणीप्रेमी असल्याने त्यातील सर्व प्राणी अजूनही डोळ्यासमोर येतात याच वर्षात हौशी मुलींनी बसविलेली बायकात पुरुष लांबोडा या एकांकिकेत गणू या शिपायाची विनोदी भूमिका करण्याची संधी मिळाली खूप खूप मजा आली त्या वेळी. एस वायच वर्ष अविस्मरणीय कसं गेलं

टी वाय च्या वर्षाची सुरुवात झाली. आणि आता हे कॉलेज सोडून जाणार या विचारांनी एक प्रकारची रुखरुख लागून गेली आता आपल्याला मैदानी खेळ पुढील आयुष्यात कधीच खेळायला मिळणार नाहीत  म्हणून भरपूर खेळून घेतल आणि बक्षीसही मिळविली माझा स्पेशल विषय अर्थशास्त्र असल्याने तीनही वर्ष आंबर्डेकर सरांच्या शिकवण्याचा लाभ घेता आला विनोद करत टोमणे मारत हास्याचे फवारे उडवत अशी त्यांची शिकवण्याची हातोटी अजूनही स्मरणात आहे सरांच्या तासाला पुन्हा बसण्याची संधी मिळावी असं अजूनही वाटतं सरांचा तास कधी संपला कळायचे ही नाही त्यांचा तास मात्र कधीच चुकवला नाही इंग्रजीचे बर्ट्रांड रसेलचे निबंध खूप कठीण होते समजायला. माझी मैत्रीण जुल्फिकार नाईकवडीने मला खूपच छान समजाविले आणि म्हणून मी पेपर लिहू शकले.

कॉलेजच्या आठवणी किती सांगू तितक्या कमीच एकदा आम्ही मैत्रिणी लेडीजरुमच्या पूर्वीचे मागील पायऱ्यांवर खात बसलो होतो गप्पा चालू होत्या आपण कॉलेजच्या जुबिलीला जमू तेव्हा कशा दिसत असू ग केस पिकले असतील मुलं असतील संसार असतील नवरे बरोबर असतील एक एक मत ऐकता-ऐकता हसून हसून पुरेवाट झाली एकदा रेल्वेचा संप होता बस लवकर मिळेना एकदमच ठरलं चालत जायचं का आणि खरंच सात आठ जणी चालत चालत आलो दुसरे दिवशी पाय उचलवेनात अशी स्थिती झाली पण त्यातही एक  थ्रिल होत मजा आली पुढे गॅदरिंग ला आम्हाला वाऱ्यावरची वरात असा फिश्पोंड मिळाला मिरज सांगली पॅसेंजर गाडी म्हणजे उत्साहाचा खजिना तीन महिन्याचा पासला चार रुपये आणि बसला एक महिन्याला अकरा रुपये दहा रुपयांमध्ये वर्षाचा कॉलेजचा प्रवास खर्च व्हायचा त्यामुळे रेल्वेला खूपच गर्दी असायची थर्ड क्लास लेडीज डबा म्हणजे गाणी बजावणी विनोद चेष्टा मस्करी वर्गात शिकविलेल्या विषयांवर चर्चा वाद-विवाद ठेवलेली टोपण नावे मजा मजा असायची पावसाळ्यात कित्येकदा वह्या पुस्तके साडीच्या निऱ्या पद सांभाळत धूम ठोकून गाडी पकडावी लागायची कधीकधी इंजिन ड्रायव्हर शिट्टी वाजवून मुद्दाम गाडी सुरू करत आणि थोडी पुढे नेऊन पुन्हा थांबवत असत. तेही विद्यार्थ्यांबरोबर एंजॉय करत असायचे.

विलिंग्डन मधील चार वर्षांचा काळ (१९६५–६६. ते १९६८–६९) हा झुळुझुळु वाहणाऱ्या निर्मळ कारंज्याचे तुषार झेलत कसा गेला कळलंही नाही कन्या शाळेतून बाहेर पडलेल्या लाजऱ्या बुजऱ्या मला कॉलेजनी बनवलं भरभरून शिकायला मिळालं अनेक अनुभव मिळाले यशाच्या आनंदा प्रमाणे कशालाही कसं तोंड द्यायचं हेही शिकविलं. अजूनही कधीतरी तीव्रतेने वाटत की कॉलेजमध्ये जाव त्या त्या वर्गात जाऊन बसावं ठराविक विषय त्या-त्या सरांनी शिकवावेत गप्पा माराव्यात खेळाव  स्टडीडीमध्ये बसून अभ्यास करावा रेल्वेची   न्यारी गंमत अनुभवावी निदान पुढील जन्मी तरी ते सत्यात उतरावं या चार वर्षांच्या छोट्याशा प्रवासात कोण कुठून आलं कसं आलं माहित नाही पण या प्रवासाच्या सूत्रातून आम्हा मैत्रिणींना  सख्यांना  शिक्षकांना एकत्र आणून सच्चिदानंद देण्याचच सृष्टीकर्त्याच  प्रयोजन असावं. या मुशाफिरीतील काही सहप्रवासी. काळाच्या पडद्याआड गेले काही अधूनमधून भेटतात कॉलेजच्या आठवणी गप्पा होतात अत्यानंद होतो काहीवेळ कॉलेजच्या वातावरणात गेल्याचा भास होतो. आणि मन प्रसन्न होत. आजही आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो,” आमचं शिक्षण  विलिंग्डन मध्ये झालंय”

समाप्त 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

( पूर्वाश्रमीची पुष्पा व्यंकटेश रिसबूड )

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments