श्री विजय गावडे
विविधा
☆ ती दिवाळी….. ही दिवाळी ☆ श्री विजय गावडे ☆
दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी
गाय म्हशी कुणाच्या, लक्ष्मीमणाच्या,
लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा……
या ओळी आठवतात ना? ती दिवाळी आठवतेय का? गावची. बालपणीची. आपल्या बालपणीची. सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वीची.
निसर्गाशी एकरूप असा प्रत्येक सण साजरा व्हायचा. सजीव ते ते सर्व सामावून घ्यायचा. गायी, म्हशी, बैल यांना तर हक्काचं स्थान असायचं.
लहान दिवाळी, मोठी दिवाळी. आठवतात ना. मोठ्या दिवाळीत गुराखी आपापले गोठे सारवून सुरवून लक्ख करायचा. गुरांच्या शेणाचा एक गोठ्यात गोठा तयार केला जायचा. त्या गोठ्यात कारटांची (कडू काकडीची) गुरं ढोर भरली जायची. त्या इवल्याश्या प्रतिकात्मक गोठ्यात लहान लहान कारट वासरं असायची. गोठेकर पती पत्नी गोठ्याची मनोभावे पूजा करायची. आम्हा मुलांना आग्रहाने गोडा धोडाच खाऊ घालायची. चंगळ असायची.
नरक चतुर्थी ला आमच्या तळ कोकणात ‘चाव दिस’ म्हणतात. थंडीत कुडकूडत, उटणं लावून आंघोळ झाली कि चावायला मिळायचे गूळ पोहे. नव्या भाताचे नव्याने कुठलेले, चवदार. झालंच तर ढाक चिनी, करांदे या सारखी रताळी सदृश्य कंद किंवा मूळ हि असायची चावदिसाला. क्वचित कोणी त्यातल्या त्यात धनवान सर्वांना आमंत्रित हि करी फराळाला ज्यात रताळ्यांचा रतीब मुख्यत्वे करून असायचा. ती एखाद दुसरीच मेजवानी असायची.
तर अशी हि ‘ती दिवाळी’. मनात घर करून राहिलेली. आजच्या प्रत्येक वस्तूच्या मुबलक उपलब्धतेला वाकुल्या दाखविणारी. कमी साधनातून अमर्याद आनंद देणारी आणि म्हणूनच आठवणींचा कोपरा अजूनही व्यापून उरलेली.
© श्री विजय गावडे
कांदिवली, मुंबई
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈