सौ कुंदा कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ लहानपणीची दिवाळी ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
आनंदाची दिवाळी
घरी बोलवा वनमाळी
घालिते मी रांगोळी
गोविंद गोविंद—–
अशी गीते गात शेणाने सारवलेल्या स्वच्छ अंगणात रांगोळी काढत आमची दिवाळी सुरू व्हायची. बांबूच्या कामट्या आणि रंगीत कागद वापरून केलेला आकाश कंदील घरावर उंच टांगलेला असायचा.
आईच्या हाताखाली फराळ करताना जाम मजा यायची. घराची साफसफाई , देवघर, तुळशीवृंदावन धुवून रंगवून ठेवलेले असायचे.
फराळाची सुरुवात शकुनाच्या करंजीनेच करायची असा जणू अलिखित नियम होता. त्यातही सुरुवातीला मोदकच करायचा गणपतीला नैवेद्य दाखवायचा हेही पूर्वापार चालत आलेले. करंजीचे पीठ म्हणजे रवा मैदा आई निरशा दुधात भिजवायची त्यामुळे करंजी खुसखुशीत व्हायची व सोवळ्यात राहायची. नरक चतुर्दशीला पहाटे देवाला नैवेद्य दाखवून मगच आम्हाला खायला मिळायची. करंज्या झाल्या की लगेच चिरोटे, शंकरपाळी, रव्याचे व बेसनाचे लाडू,
साध्या भाजणीची खमंग कडबोळी व विशिष्ट भाजणीची चकली तयार व्हायची. त्याच तळणीच्या तेलात चिवडा परतायचा की झाला फराळ संपन्न. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आई दहीपोहे करायची व त्या दिवशी हवा तितका फराळ खा म्हणायची. नंतर मात्र ती देईल तितकेच आम्ही आनंदाने खात असू. घरोघरी फराळाची ताटे फिरत असत.
दिवाळी हा सणांचा राजा——–
मांगल्याचा, प्रकाशाचा, खमंग फराळाचा, गोड-धोड पक्वान्नांचा, जल्लोषी फटाक्यांचा, बाळगोपाळांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांचा, रंगीबेरंगी आकाशकंदीलांचा, भेट कार्ड देऊन साधणाऱ्या जिव्हाळ्याचा, झेंडूची फुले, आंब्याची पाने यांनी बनवलेले तोरण दाराशी बांधून सर्वांचे स्वागत करण्याचा, सुंदर सुंदर रांगोळ्यांचा, पणत्यांच्या दीपोत्सवाचा, कोर्या करकरीत कपड्यांचा, फुलांनी सुगंधित झालेल्या देवघराचा, जावईबापूंच्या दिवाळसणाचा, पाडवा , भाऊबीज साजरे करून त्यातील नात्यांचा गोडवा वाढवणारा , सर्वांना तृप्त करणारा हा सण.
उगारला चाळीमध्ये मुले किल्ला, आकाश कंदील व तोरणे करत असत. आम्ही मुली फराळ व रांगोळ्या यात आमचे कौशल्य दाखवत असू. सगळेच मध्यमवर्गीय पण मिळेल त्यात समाधान मानून आपले काम जास्तीत जास्त चांगले करायची धडपड सगळेजण करायचे.सांगलीचे एक काका दरवर्षी फटाके विकायला यायचे. त्यांच्याकडूनच वडील मंडळी. खरेदी करायचे. केवढा आनंद व्हायचा. मिळेल तो वाटा पुरवून पुरवून वापरायचा. बायका भाजणीचे पीठ, अनारसा पीठ, करंज्यांचे सारण, घरीच मन लावून करायच्या.” इन्स्टंट चा जमाना” अजून आलेलाच नव्हता.
वसुबारसेला दिवाळीची सुरुवात व्हायची. मूल झालेल्या प्रत्येक बाईने त्या दिवशी उपवास करायचा असे आई सांगायची. त्यामुळे आपली. मुलेबाळे आरोग्यसंपन्न व सुखासमाधानात राहतात असा तिचा दृढ विश्वास होता. संध्याकाळी गायवासराची पूजा प्रार्थना करताना वेगळा आत्मविश्वास यायचा.
धनत्रयोदशीला सगळ्यांच्या दिव्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला. त्याला मनोभावे नमस्कार केला की अपमृत्यु टळतो हे आजही पटत आहे. त्यादिवशी बायकांची दिवाळी असायची. सुवासिक तेल , शिकेकाई भरपूर गरम पाणी घेऊन साग्रसंगीत नहाणे व्हायचे. पित्त होऊ नये म्हणून गोड शिरा खायचा. दुपारी पाट , रांगोळी, उदबत्ती, एखादे पक्वान्न असे उदरभरण झाले की गोविंदविडा खायचा. अशी चैन असायची. एका दिवाळीला आजोळी चिकुर्डे येथे गेलो होतो. आजोबा नामांकित वैद्य असल्यामुळे त्यांनी मनोभावे केलेली धन्वंतरीची पूजा आजही आठवते.
नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान केले नाही तर नरकात जावे लागते असा धाक असल्यामुळे सगळे पहाटे उठून अभ्यंग स्नान करीत असत. आई सर्वांना औक्षण करायची. मग नवे कपडे, वडील मंडळींना नमस्कार, त्यांनी तोंड भरून दिलेले आशीर्वाद, पोटभर फराळ, फटाके उडवणे, दुपारी सुग्रास भोजन, एखादी डुलकी संध्याकाळी थाटामाटात लक्ष्मी पूजन , हळदी कुंकू अशी धमाल असायची.
पाडव्याला पत्नीने पतीला सुवासिक तेल लावून आंघोळ घालावी व आंघोळ घालतानाच ओवाळावे अशी पद्धत होती. महागडी बक्षिसे देण्याची पद्धत नव्हती. बायका देखील हट्ट करत नव्हत्या. भाऊबीजेला बंदा रुपाया मिळाला की आम्ही बहिणी हुरळून जायचो. उगारला कानडी लोक खूप. भाऊबीजेच्या दुसरे दिवशी त्यांच्याकडे
“आक्कनतदगी ” म्हणजे “आक्काची तीज” अर्थात आक्काची तृतीया असे. त्यादिवशी भाऊ बहिणीला ओवाळून भेट देत असे .कधीकधी आम्ही दिवाळीला आमच्या मूळ गावी वाळव्याला जात असू. तिथे मोठ्ठ घर होतं. पडवीत गाई-म्हशी पाडसं होती. खूप मोठ्ठा ओटाहोता . तिथे गाईच्या ताज्या शेणा ने सारवून शेणाचे गोकुळ आम्ही बहिणी उत्साहाने तयार करत असू. गोप गोपी कृष्ण राधा तुळशी वृंदावन उखळ मुसळ जाते गाय वासरू सारे निगुतीने तयार करत असू. बलीप्रतिपदेला भलामोठा बळीराजा बनवताना मला फारच मजा यायची. पांडव पंचमीला पाच पांडव, द्रौपदी, कृष्ण, बलराम , राधा , सत्यभामा, रुक्मिणी , यशोदा, गोपी असे आठवून आठवून खूप पात्र॔ उभी करतांना दुपार होऊन जायची. आईचा स्वयंपाक तयार असायचा. मग आम्ही प्रत्येक पात्रासमोर शेणाची ताटली ठेवून सर्व जेवण वाढत असू.
त्यावेळी दिवाळीच्या पहिल्या दिवशी परटिणीचा मान असायचा. घरोघरी जाऊन ती पुरुषांना ओवाळायची. प्रत्येक जण यथाशक्ती ओवाळणी द्यायचे.
आता जमाना बदलला. जुने रीतिरिवाज मागे पडले. जागेची अडचण, वेळेची कमतरता, आधुनिकतेचे फॅड यामुळे दिवाळी साजरी करण्याच्या कल्पना बदलत चालल्या.सुट्टी त बाहेर भटकणे बाहेरचे खाणे सहली काढणे यात या पिढीला रस आहे. आनंदाच्या कल्पना बदलत चालल्या आहेत.” कालाय तस्मै नम:”
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈