सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
मनमंजुषेतून
☆ दिवाळी कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
दिवाळी गोवत्स द्वादशी पासूनही साजरी करतात. गुरुद्वादशी असंही म्हटलं जातं. खेड्यात गोधनाला खूप महत्त्व असल्याने पूर्वीपासून आताही गाय-वासराची किंवा त्याच्या फोटोची पूजा करतात. शिष्य गुरूंचे पूजन करायचे. मात्र आज ही प्रथा फारशी दिसत नाही.
धनत्रयोदशी दिवशी पूर्वी आणि आताही व्यापारी वह्या आणि तिजोर्यांची पूजा करतात. धन्वंतरी जयंती असल्याने वैद्य डॉक्टर त्याची पूजा करतात. पूर्वी आणि आताही. पूर्वीची आणखी एक प्रथा कणकेच्या तेलाचा दिवा घराबाहेर संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून लावला जायचा. आणि सर्वजण मिळून सूर्याला प्रार्थना करायचे मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह त्रयोदश्यां दीपदानात सूर्यज प्रियतां मम . आज क्वचित ठिकाणी हे दिसते. पूर्व परंपरेनुसार क्वचित ठिकाणी ब्रह्मास्त्राच्या प्रतिमेची , निर्जळी उपास करून, पुरणाचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. ही प्रथा आज फारशी माहित नाही पाण्याचे हांडे घासूनपुसून तेही पूजले जायचे.आज गिझर आणि गॅस असल्याने हांडे कोठे दिसत नाहीत. नरक चतुर्दशी दिवशी चे अभ्यंगस्नान आजही आहे. पण पूर्वी इतका मसाज करणे होत नाही. पूर्वी तीळ, खसखस, वाटून ते उटणे अंगाला लावत. आज उटण्याची तयार पावडर मिळते. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट फोडले जायचे. आज कारिट कोणाला माहित असेल असे वाटत नाही. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी विष्णू आणि कुबेर आणि घरातील दागदागिने यांची पूजा केली जायची.तसेच अलक्ष्मीचा नाश व्हावा म्हणून घरातला कचरा काढणारी केरसुणीची पूजा करून दमडी आणि सुपे वाजवून बाहेर टाकला जायचा. आजही काही ठिकाणी हे चित्र दिसते. काही घरात, घरातली स्त्री समाधानी, आनंदी रहावी , म्हणून गृहलक्ष्मी म्हणून तिची पूजा केली जाते. पूर्वीचे फटाके आणि आता चे फटाके यातही खूप फरक पडला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री जागवत असत. पगडी पट मांडला जायचा .खेळ रात्री उशिरापर्यंत चालायचा. करमणुकीचे दुसरे साधन नव्हते. आता नवीन पिढीला पगडी पट हा खेळ आणि ते नावही माहीत नसावे. पाडव्यादिवशी खेड्यात लव्हाळीची दिवटी करून त्याने गायी वासरांना ओवाळून त्यांचे आशीर्वाद घेतले जायचे . यादिवशी शेणाचा गोवर्धन पर्वत करून, त्यावर दुर्वा फुले खोचून , कृष्ण गाई वासरे यांची चित्रे त्यावर मांडून पूजा आणि मिरवणूक काढण्याची प्रथा होती ही प्रथा आज फारशी दिसत नाही. पत्नी पतीला ओवाळण्याची पद्धत पुर्वापार आहे.फक्त देणे-घेणे वाढले आहे. भाऊबीज, या दिवशी भावाने घरी न जेवता बहिणीकडे जेवावे, आणि तिने भावा प्रति प्रार्थना करून कुशल चिंतावे.”हातजोडी ते उगवत्या नारायणा, जतन कर देवा ,माझा बंधूजी राणा”. असे म्हणून ओवाळावे. ही प्रथा आज आहे . फक्त भेटवस्तू देण्यात फरक पडलाय.
दिवाळी हा सण नात्या नात्यांशी इतकंच काय पर्यावरणातल्या प्रत्येक गोष्टीशी भाव बंधनांनी आणि आत्मीयतेने जवळीक आणणारा असा हा सण !कालच्या दिवाळीतला आनंद, चैतन्य ,उत्साह, यात बदल होतच राहणार. काल आणि आज प्रमाणे उद्याच्या दिवाळीतही फरक पडणारच. लाईटच्या माळा, भडक सजावटी, मिठाया ही सगळी आनंदाची बाह्यरूप. खरी दिवाळी मनांकडून मनाकडे. एकमेकांबद्दल वाटणारा प्रेम जिव्हाळा आपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनांची.
“सर्वांना दिवाळी भरभराटीची, समृद्धीची, शांतीची आणि आरोग्यदायी जावो”
समाप्त
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈