सौ. स्वाती रामचंद्र कोरे
मनमंजुषेतून
☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते
नात्याच्या गंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे
का होते बेभान कधी गहिवरते—-
मन…कधीच न उलगडणारे कोडे… शब्दात न मांडता येणारे मन वेडे.. आकाशासारखे अथांग… सागरासारखे गहिरे.. क्षणात फुलणारे… क्षणात कोमेजणारे .. सावरणारे …अडखळणारे,
तर कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे हे मन….
किती सांगावी महती या मनाची.. मन चंगा तो कटोती मे गंगा असे म्हणतात म्हणूनच उत्तम शरीराबरोबरच मनही निरोगी असणे तितकेच गरजेचे आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर असते. यासाठी मनाला नेहमी चांगल्या गोष्टीत गुंतवायला हवे.
आपण इतरांची मने जपण्यासाठी खूप काही करतो. स्वतःच्या आशा अपेक्षांना मुरड घालतो पण या सर्वांची मने जिंकताना आपल्यालाही एक मन आहे हे साफ विसरून जातो. कधीतरी आपलेच मन आपल्याला विचारेल की, माझ्यासाठी तू काय केलेस? आहे उत्तर?….
योग्य आहार ,विहार, व्यायाम याने जसे शरीर चांगले राहते तसेच छंदाची जपणूक, चांगले मित्र, छान पुस्तक वाचन, गायन, वादन, बागकाम … मनापासून आवडणारे कोणतेही काम हे भरभरून आणि आनंदाने करायला हवे. थकलेल्या शरीराला जसे स्फूर्ती येण्यासाठी टॉनिक देतात तसेच आपले छंद आपल्या मनासाठी टॉनिक म्हणून काम करतात…
स्वतःचे ही मन जपा. त्याला काय हवे-नको ते बघा. त्याचेही कोड कौतुक करा.सकारात्मक विचारांनी त्याला फुलवा.आनंदी क्षणात भुलवा ..मग बघा जीवनाचे इंद्रधनुष्य कसे सप्तरंगानी बहरून येते…
नजर को बदलो
नजारे बदल जायेंगे
मन को बदलो
धूप मे भी छांवको पाओगे—–
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈