डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ स्वप्नाची दुनिया ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
माझ्या व्यवसायात,मला इतके विविध अनुभव येत असतात, नाना प्रकारची माणसेही भेटतात.
माझे आयुष्य अगदी समृद्ध केलेय ,या अनुभवांनी. कसे जगावे,संकटातही कसे आनंदी राहावे,
हे या निम्न स्तरातील बायकांकडून मी शिकले.
माझ्या कडे आया म्हणून काम करणारी शकू—
फार आनंदी,उत्साही. सतत नवीन शिकायची हौस, आणि गप्पा मारण्याची तर प्रचंड हौस.
शकू धडपडीही होती. एकदा,तिच्या वस्तीतली एक बाई,कशी कोण जाणे दुबईला,घरकामासाठी नेली कोणीतरी–झाले–शकू च्या डोक्यातही तेच—
” बाई, दुबईला जायला काय लागते हो करायला ? मी पण जाते की.लै पैसा भेटतो म्हणे.
चार वर्ष गेले, तर जन्माचे कल्याण होते. शेजारची रेखा गेलीय बघा. माजी बी लै विच्छा हाये.
इथे किती राबा, काय चव न्हया बघा. पुरतच नाही पैसा.”
रोज रोज शकू हेच बोलायची. आमच्या इतर स्टाफचा, चेष्टेचा विषय झाली होती शकू.
रोज विचारायच्या तिला बाकीच्या आया–
” काय शकू,झाली का तयारी दुबईची ?’
मी रागवायची त्यांना–” नका ग असं बोलू. जाऊ दे ना मिळाली संधी तर. ”
एक दिवस नवऱ्याला घेऊन आली. तो उर्मटपणे म्हणाला, ” बाई,आत्तापर्यंत झालेला पगार द्या शकीचा–ब्यांकेत टाकत होतात तो–तिचा पासपोर्ट करतोय मी.”
मी हादरलेच हे ऐकून—” अहो, कोण नेणारे तिला? सगळी नीट चौकशी केलीत का.”
” हा.केलीय. आमचा गाववाला हाये. समदं करतोय तो. वीस हजार द्यायचे की तो दुबईला जाब लावून देणारे.” —-मी कपाळाला हात लावला. ” अहो,असे नसते, नीट करा चौकशी.”
” बाई, तेवढे पैशे द्या. मी बघीन बाकीचे.”
दुसऱ्या दिवशी शकू सगळे पैसे घेऊन गेली. आम्ही सगळे हळहळलो. तो उर्मट माणूस डोक्यात गेला आमच्या. दरम्यान,शकूने केव्हाच काम सोडले. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. खूप वर्षे झाली ,मीही अनेक गोष्टीत गढून गेले होते.
मध्ये एकदा मंडईत गेले होते. एकदम हाक ऐकू आली—” बाई –बाई, अहो डॉक्टरबाई ”
मी चमकून बघितले. कैरीच्या मोठ्या ढिगाजवळ बसलेली बाई मला हाका मारत होती–
” बाई,ओळखलं नाही न्हवं. “
” मी शकू नाही का.”
” अरे हो की–शकू,तू इथे काय करते आहेस? दुबईला ना गेली होतीस? “
“कर्म माझं व.कसली दुबई. या मेल्याने सगळे पैसे खाल्ले.”
मी बघितले, शेजारीच,शकुचा नवरा मान खाली घालून बसला होता. सगळी गुर्मी उतरलेली दिसत होती. गप गरिबा सारखा बसला होता.
शकू म्हणाली, ” तुम्ही सांगत होतात, तेच खरे होतं हो बाई. कोणी पासपोर्ट नाही केला,न काय न्हाय. पण मग एका बाईबरोबर मला मुंबईचे काम आले.–घरकाम–ती बाई10 हजार पगार देणार होती राहून. तिची जुळी मुले सांभाळायची. सगळे सगळे काम,करायचे. माझा पिट्ट्या पडायचा हो कामाने. पण बाई चांगल्या होत्या. माझे सगळे पैसे त्या बँकेत टाकायच्या.
मी महिन्यातून एकदा पुण्याला येऊन भेटून जायची. सासूने बघितले हो लेकरांकडे. या मेल्याला दिले होते घरातून हाकलून तीन वेळा, मग सुतासारखा सरळ आला बघा. दारू सोडवली मी केंद्रात नेऊन. बाई,चार वर्षे लै राबले बघा. मग इकडे परत आले. त्या
माऊलीने माझे ४ लाख साठवून दिले बघा. इथे आले,तर शेजारीण घर विकतेय समजले.
मी तिला रोख पैसे देऊन घर घेतले. या बाबाला गाळा घेऊन दिला बघा. आता मस्त जातोय पहाटे ४ ला उठून.”
शकुचा नवरा म्हणाला, ” बाईंना घरी नेशील,का न्ह्याय–का नुसतीच माजी गाऱ्हाणी गाशील.
चा पाज त्यांना.”
माझ्या हाताला धरून शकू म्हणाली, ” चला चला,गरीबाच घर बघा चला.”
जवळच होते शकुचे घर. मला इतके आश्चर्य वाटले, चांगला 3 खोल्यांचा फ्लॅटच होता की तो.
शकूने घर सुंदरच ठेवले होते. म्हणाली आधी 2 खोल्या घेतल्या, मग या दोन पण घेतल्या.”
शकुचा मुलगा अभ्यास करत होता. म्हणाला,” बाई,पोलीसात जाणार मी.” दुसरा मुलगा कॉलेज करत होता. शकू म्हणाली,” लै मस्त चाललंय आमचं. आता बघितला ना,मालक कसा नीट वागतोय ते. आणला वठणीवर बघा.”
–आम्ही दोघीही हसायला लागलो. तिच्या गाळ्याजवळच माझी गाडी मी लावली होती.
शकूने, मी नकोनको म्हणत असताना,पिशवी भरून कैऱ्या गाडीत ठेवल्या–
” बाई,येत जा. गरीबांनी, स्वप्ने बघूच नयेत का हो? काय चुकले,मी दुबईची स्वप्ने बघितली त्यात– मला हे दरिद्री जिणे नको होते हो. आणि दुबई नाही, पण मुंबई तर भेटली.
मिळाले भरपूर पैसे. राबलेही खूप हो बाई चोवीस तास.” शकूच्या डोळ्यात पाणी आले.
मी म्हटले,” शकू,आहेस खरी ग बाई जिद्दीची.किती सुंदर मांडला आहेस संसार.”
मी purse मध्ये होत्या , त्या सगळ्या नोटा तिच्या हाती ठेवल्या.तिचा नवरा ही गाडी जवळ आला—-
” बाई,मी खूप चुकलो,पण शकूने मला साथ दिली. आज हे दिवस तिच्या मुळे दिसत आहेत. ” .
दोघांनी मला हसून निरोप दिला.
—–समाजात अशा अनेक शकू आहेत, की त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करायला हवा
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈