श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मनमंजुषेतून
☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 1- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
आईवडिलांनी मुलांचे मित्र व्हावं, असं म्हणता म्हणता आई-वडील म्हणूनच त्यांच्या असण्यात जो आदरयुक्त धाक असतो, तो हरवला. मुलांना मोकळीक देणं, घरात खुलं वातावरण असणं योग्यच. पण त्याचा अर्थ असा नाही, की मुलांची एखादी गोष्ट खटकल्यावर पालकांनी आपली नापसंतीही व्यक्त करू नये. मुलांशी नेमकं कसं वागावं याविषयी पालकांमध्ये जास्त गोंधळ आहे? की त्यांचं वागणं दुटप्पी आहे? पालकांनी यावर गंभीरपणे विचार करायला हवाय…
उंच स्टुलावर चढून भिंतीवरचं कोळ्याचं जाळं काढणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे बघून शोभाताई ओरडल्या, ‘‘अहो, काय करताय हे? खाली उतरा आधी! तरुण पोरं आहेत घरात. त्यांना सांगू ना! उगाच पडलात बिडलात, हाड मोडलं, तर केवढ्याला पडेल ते?’’
‘‘अगं होतंय तोवर करायचं! पोरांना कशाला सांगतेस लगेच? दिवाळी आलीय तोंडावर. आणि तू शंभर वेळा ओरडशील तेव्हा कुठे मुलं ऐकतील कदाचित. वर्षही संपेल तोपर्यंत!’’ नाइलाजानं खाली उतरत, हात झटकत शरदराव म्हणाले.
नवऱ्याचे हे शब्द दिवसभर शोभाताईंच्या मनात घुमत राहिले. त्या विचार करू लागल्या, खरंच, हे असंच होतं हल्ली. मुलं पटकन ऐकत नाहीत, मग आपणच काम हातावेगळं करून टाकू म्हणत पालकच सगळी कामं उरकतात. मुलांपर्यंत जातच नाहीत. परवाचीच गोष्ट- मुलांना सांगितलं होतं, ‘आज मुंबईहून मामा येणार आहेत. उद्या सकाळी लवकर उठून तयार राहा. त्यांना एका ठिकाणी नेऊन सोडायचं आहे.’ पण मुलं रात्री जागत बसली आणि सकाळी वेळेवर उठलीच नाहीत. शेवटी शरदरावांनीच गाडी काढली. कडक शिस्तीच्या मामांसमोर आपल्यालाच ओशाळल्यासारखं झालं होतं. आणि शिस्तीचं म्हणावं, तर मामाच का, आपले आईवडीलसुद्धा किती शिस्तीचे होते! पहाटे उठणं, रात्री लवकर झोपणं, संध्याकाळी हात-पाय धुवून देवासमोर पसायदान म्हणणं, अशा गोष्टी अंगी भिनलेल्या सहजप्रवृत्ती म्हणून आपण करत होतो. कधी चांगल्या सवयी लागल्या हे समजलंच नाही. पाढे पाठ केल्याशिवाय जेवणाचं ताट मिळत नसे लहानपणी. आपण किती शिस्तीत वाढलो नाही? आपल्या पालकांनी घालून दिलेले नियम आणि शिस्तच आज स्थिर आयुष्य जगण्यास कारणीभूत आहे…’ हा विचार आला आणि शोभाताई चमकल्या. आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या पुंजीत नेमकं कोणतं दान टाकणार आहोत? आपण त्यांना योग्य ती शिस्त लावण्यात कमी पडतोय का? या विचारानं त्या अस्वस्थ झाल्या.
‘‘मॉम, आम्ही या वीकेंडला विकीच्या फार्महाऊसवर जातोय. शनिवारी दुपारीच निघू.’’ तनयानं सरळ आपला कार्यक्रम जाहीर केला. आईची परवानगी नाही मागितली. आईला अर्थातच ते खटकलं. आज निदान आपली मुलं न लपवता, सांगून सगळं करतात हे जरी योग्य वाटत असलं, तरी मुलीनं असं कुणाच्या फार्महाऊसवर जाणं आपल्याला अजिबात पटलेलं नाहीये, हे चेहऱ्यावर न जाणवू देता मीनाताईंनी विचारायला सुरुवात के ली, ‘‘मुक्कामी का जाताय? कोण कोण आहे? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणं नाही जमणार का? मुली किती आहेत? ’’
‘‘आता तूपण प्रियाच्या आईसारखे ‘ऑर्थोडॉक्स’ प्रश्न विचारणार आहेस का? आमचं ठरलंय गं सगळं. सांगते रात्री क्लासवरून आल्यावर.’’ हे बोलत तिनं स्कूटर सुरू केली आणि आई काही बोलण्याआधीच वेगात निघूनही गेली.
लहानपणापासूनच मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक दिल्यानं आता नेमक्या कोणत्या शब्दांत मुलीला ‘जाऊ नकोस’ म्हणावं याचा विचार करत मीनाताई तिथेच उभ्या होत्या. ‘हल्ली हे असं का होतंय? का आपण पटकन तनयाला विरोध नाही केला? मुलांना फटकारताना आपली जीभ का चाचरते? ती दुरावतील किंवा दुखावली जातील, असं वाटून आपण गप्प बसतो का? आपणच घेतलेल्या सुधारणावादी भूमिकेमुळे आता आपण अचानक जुन्या मतांचे वाटू अशी भीती आपल्याला वाटते का? बदललेल्या जगण्याशी हातमिळवणी करताना आपणच ओढून घेतलेल्या नव्या कातड्याखाली आपले संस्कार गाडले जात आहेत. हे बरोबर नाही. वागण्यातील कृत्रिमता कधीच मनाला भिडत नसते. आता लेक घरी आली की कडक शब्दात तिला ‘नाही’ म्हणायचं. काय महाभारत व्हायचंय ते होऊ देत.’ असा विचार करत मीनाताई घरात आल्या तर खऱ्या, पण आपल्या कडक शब्दांची धार केव्हाच बोथट झाली आहे, हे जाणवून त्यांना खूप अगतिक वाटत होतं.
मीनाताईंच्या आईनं त्यांना वेळोवेळी जाणीव दिली होती, ‘‘मीने, पोरांना वेळच्या वेळी ठामपणे नाही म्हणायची सवय लाव तू! लहानपणीच थोडं नियमात बसवावं. पाक घट्ट झालेले लाडूही वळत नाहीत गं! मग ही तर स्वतंत्र विचारांची पोरं आहेत. नको तिथे ढील दिली की पतंगही भरकटतोच.’’ आईनं सल्ला दिला होता, पण मीनाताईंना वाटायचं, की जुन्या काळातल्या शिस्तीचे नियम आज कसे लागू होतील? मुलांशी मित्रत्वानं वागायचं, तर थोडं त्यांच्या कलानं घ्यावंच लागतं. पण आता वाटतंय, की कोणत्या विषयात किती कलानं घ्यावं, याचं गणित जरासं बिघडलंच.
संध्यासमोर तिची भाची बाहेर जाण्याची तयारी करत होती. खरंतर त्या दिवशी घरात सगळ्या मावस-मामे भावंडांचा मेळावा होता, काही भाचेमंडळीही येणार होती. ‘‘शानू, तू बाहेर निघालीस? आज सगळे येत आहेत ना घरी?’’ संध्यानं विचारलं.
‘‘हो गं मावशी, पण आमच्या इंजिनीअरिंगच्या फ्रेंड्सचं ‘जी.टी.’ (गेट टुगेदर) आहे आज. मी येईन रात्री अकरापर्यंत.’’
‘‘अगं, तुझ्या घरी जमतायत ना सगळे? महिनाभर आधीच ठरलं होतं ना हे?’’ आवाजात शक्य तितकं मार्दव आणत मावशीनं विचारलं.
‘‘चिल मावशी ! धिस इझ लाईफ.’’ ओठांवरून लिपस्टिक फिरवत शानूबाई बोलल्या आणि पर्स उचलून उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या.
क्रमशः….
ले: अपर्णा देशपांडे
प्रस्तुती : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈