श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मनमंजुषेतून
☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 2- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
(उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या.) इथून पुढे —-
संध्याला राहावलंच नाही. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाऊन तिनं विचारलं, ‘‘तू शानूला सांगितला नव्हतास का आजचा आपला प्लॅन?’’
‘‘ताई, सांगितलं होतं गं. सगळ्यांबरोबर तू असायलाच हवीस, असंही म्हटलं होतं. पण हल्ली मुलींना त्यांच्या प्रोग्रॅममध्ये अडवलेलं आवडत नाही. ‘आमच्या मैत्रिणींच्या गेट टुगेदरचं काय?’ असं म्हणाली.’’
‘‘तू नक्की आईच आहेस ना तिची? घरातल्या कार्यक्रमांसाठी आपण घरी असलंच पाहिजे, शेवटी सगळी आपली माणसं आहेत, हे ठणकावून सांगायची हिंमत होत नाही का तुझी? की मुलांसमोर आपली ‘इमेज’ सांभाळायच्या नादात संस्कार आणि शिस्त गुंडाळून ठेवलीय माळ्यावर? तिच्या बाहेर जाण्याला माझा विरोध नाहीये. दोन कार्यक्रमांचं वेगवेगळ्या दिवशी नियोजन करणं, इतकं साधं आहे ना हे! तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मुलांशी बोला ना घडाघडा.’’ संध्याचं म्हणणं बहिणीला पटलं होतं, पण… हा ‘पण’च फार अवघड होता.
——————————————————————————————————–
‘‘पप्पा, आनंदाची बातमी आहे. आम्ही नवीन ‘एस.यू.व्ही.’ घेतली काल. येतो दुपारी दाखवायला.’’ मनोजरावांचा जावई शंतनू फोनवर सांगत होता. त्यांनी जावयाचं अभिनंदन तर केलं, पण नंतर चिंतेत पडले. नुकताच नव्वद लाख रुपयांचा फ्लॅट घेतलाय, घरात दोन स्कूटर आणि चक्क दोन कारही आहेत. मग पुन्हा ही गाडी का घेतली असावी? त्याच्या आईवडिलांशी किंवा आपल्याशी न बोलता इतका मोठा खर्च?
‘‘तुम्ही का त्रास करून घेताय? तो जावई आहे, त्यांचा त्यांचा संसार आहे. आपण नको बाई बोलायला!’’ सासूबाई बोलल्याच.
‘‘मुलगी-जावई काय फक्त कौतुक करवून घ्यायलाच आहेत का? मुलासारखं मानतो ना आपण त्याला? ढळढळीत दिसतंय की अवाजवी खर्च चुकीचे आहेत. मग हक्कानं आपलं मत सांगायला नको? गरज जेव्हा लालसेचं रूप घेते ना, तेव्हा अनिर्बंध वर्तणुकीला प्रारंभ होतो बघ. फ्लॅटसाठी दहा लाख ज्या हक्कानं दिले आपण त्यांना, त्याच हक्कानं त्यांच्याशी बोलायला हवं. नको तिथे मूग गिळून बसल्यावर त्यांचं चुकतंय हे त्यांना कोण ऐकवणार?’’ मनोजराव म्हणाले.
तनया असो, शानू असो किंवा मनोजरावांचे जावई आणि मुलगी… घरातील मोठ्या मंडळींना आता आपण बोलावं की नाही, असं वाटणं चुकीचं नाही का? जीव तोडून प्रेम करणाऱ्या ज्येष्ठांची जीभ शिस्त आणि संस्कारांच्या बाबतीत अडखळणं, हे बेलगाम जीवनशैलीला खतपाणी घालणारं आहे.
लग्नानंतर मुलांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते… अगदी मान्य! पण समोरचा चुकतोय हे दिसत असूनही न बोलणं हा अतिरेक ठरेल. ही वेळ येऊच नये, म्हणून उधळणाऱ्या घोड्यांचे लगाम त्याआधीच आवळले गेले पाहिजेत.
मुलीनं एखाद्या विशिष्ट पार्टीला जाणं अजिबात पटत नसताना आईचं तिला नकार देताना चाचरणं वाईट नाहीये का? ठोंब्या मुलांना ‘बाब्या’ बनवत लोळत पडू देणं आणि बापानं त्यांची कामं करणंही वाईटच. खर्चाला दिलेल्या पैशांचा हिशेब विचारताना वडिलांची जीभ अडखळणंही वाईट. ‘मी तुझ्यावर मुळीच अविश्वास दाखवत नाहीये, पण तू या रकमेचा कसा विनियोग केलास ते मला सांग,’ असंही म्हणता येतं की! ‘पहिला मोबाइल उत्तम चालतोय ना, मग दुसऱ्या मोबाइलचा विषय आता अजिबात काढायचा नाही. त्यापेक्षा हवा तर एखादा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग लाव, मी पैसे देतो.’ हे कमावत्या मुलाला सांगताना वडिलांना अवघडल्यासारखं वाटणं चुकीचं. ‘मैत्रिणीशी फोनवर नंतर बोल. आधी मला या कामात मदत कर,’ हे सांगायला आईनं का कचरावं? करोनामुळे निदान स्वच्छतेच्या बाबतीत बरीच जागरूकता आलीय. नाहीतर महाविद्यालयातून आलेली मुलं न चुकता आल्याबरोबर हातपाय धूत होती का? जर उत्तर ‘नाही’ असेल तर त्याला जबाबदार कोण? नुकतंच शाळेतून आलेलं पोर आल्या आल्या मित्राला फोन करून आजचा गृहपाठ विचारत असे, तर ‘सोन्या, तुझं शाळेत बाईंच्या बोलण्याकडे लक्ष नसतं का? अजिबात असं मित्राला फोनवर विचारायचं नाही. वर्गात नीट लक्ष द्यायचं,’ हे आई-बाबा सांगत नसतील तर ते चुकीचंच नाही का?
मुलं आपलं ऐकत नाहीयेत किंवा आपल्याला अजिबात न विचारता निर्णय घेत आहेत, हे जेव्हा पहिल्यांदा जाणवतं, तेव्हाच त्यांच्याशी निवांत बोलण्याची गरज असते. ‘तू हे करायचं नाही म्हणजे नाही!’ असं बिनबुडाचं वाक्य फेकल्यास मुलं तात्त्विक मुद्द्यांवर वाद घालून पालकांना नक्कीच निरुत्तर करू शकतात. त्यासाठी त्यांना समजेल, रुचेल, अशा पद्धतीनं समजावून सांगणं गरजेचं आहे. पूर्वी मुलांना सांभाळणं किती सोपं होतं नाही? वडिलांची नुसती चाहूल लागली तरी असतील नसतील तिथून येऊन पुस्तक हातात घेऊन बसत. ‘तोंड वर करून’ बोलायची हिम्मत नसायची (अर्थात त्यामुळे फार कमी घरांमध्ये पितापुत्रात मैत्रीचे संबंध होते हेही मान्य करावं लागेल). पूर्वी मिळतंय त्यात हवी तेवढी मजामस्ती चालायची, पण अवाजवी मागण्यांना थारा नसे. करंजी-लाडूला लज्जत होती! कष्टाची किंमत होती. नात्यांची कदर होती. दिनचर्येला आकार होता. ‘नाही’चा आदरयुक्त धाक होता. पण आज मैत्रीचे संबंध राखताना तो ‘बडगा’, पालकांचा वाटणारा एक प्रकारचा धाक मिळमिळीत झालाय असं नाही वाटत?
आपल्याच मुलांशी वागताना आपण अत्यंत सुधारलेल्या, नवीन विचारांचे पालक आहोत, मुलांना संपूर्ण मोकळीक देणारे आहोत, त्यांना स्वतंत्र विचारांचे पंख देणारे आहोत, मग आता काही गोष्टींना विरोध केल्यास आपलं दुटप्पीपण उघडं पडेल, अशी भीती वाटते का पालकांना? मग वाटू देत की! पण जिथे हस्तक्षेपाची गरज आहे तिथे बोललंच पाहिजे.
आजच्या मुलांच्या वागण्यातला सगळा समतोल बिघडलाय असं जर वाटत असेल, तर नक्कीच त्याला कारणीभूत आहे पालकांचा चाचरता संस्कार आणि परिणामी ओशाळलेली शिस्त! तुम्हाला काय वाटतं?
समाप्त
ले: अपर्णा देशपांडे
प्रस्तुती : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈