मनमंजुषेतून
☆ कोतमीर ☆ मेहबूब जमादार ☆
साधारण 1980 च्या आसपासचे दिवस होते.स्वस्ताई होती. मुबलक भाजीपाल्यांची उधळण होती. शेजारी शेजार धर्माला जागत होता. माणूसकीची जाण होती. दिवस अगदी सुखाचे होते.
नुकतीच सुगी आटपली होती. रानांतली ज्वारी, देशी भूईमूग काढला होता. कोतमीरीला धनं आलं होतं. ते भी पिक शेतक-यानीं काढलं होतं. सगळी रानं मोकळीच निपचीप पडली होती. नेहमीप्रमाणे कार्तिक महिन्यात हलकासा पाऊस पडला होता.
मी अन वसंता सहज ओढ्याकडे फिरायला गेलो. ओढयाला स्वच्छ पाणी वहात होतं. काटावरल्या झाडांची सावली पाण्यात पडली होती. आंम्ही ओढ्याकडे सिताफळ, मोराचे पीस गोळा करणेस नेहमी जात असू. आमच्यात तसा थोरला म्हणजे शंकर आबा होता. फिरतानां आमच्या एक गोष्ट लक्षात आली. आमच्या मळ्यात सगळीकडे पालेदार कोतमीर ऊगवली होती. ती पेरली नव्हती पण झडलेल्या धन्यांच्या बियांमूळे ती सा-या रानांत पेरल्यासारखी ऊगवून आली होती.हिरवीगार कोतमीर पहातानां डोळं ठरत नव्हतं.
त्याच दिवशी शंकरआबाला सांगितलं तसं तो म्हणाला,
“ऊद्याच सगळी कोतमीर उपटून गोळा करू.दहा पैशाला एक अशा पेंड्या बांधू.परवा गुरूवार आहे.येरवाळी जाऊ अन बाजारात विकून चैनी करू”
हे ऐकल्यावर आमचे चेहरे खुलले.बेत चांगला होता. त्याला खर्च कांहीच नव्हता. बरं कोतमीर घेवून जायला तिघांच्याही सायकली होत्या.
बुधवारी सायंकाळीच आंम्ही तिघानीं कोतमीर उपटली. त्यात कुठं तण आलं तर ते वेगळं केलं. पानमळ्यांतनं वाळलेल्या केळांच सोपट आणलं. त्याच्या पेंड्या बांधता येतील अशा बारीक वाद्या केल्या. राती जेवनांआधी त्या सगळ्या पेंड्या एकसारख्या बांधल्या. एका पोत्यावर पाणी मारून त्या बैजवार ठेवल्या. पेंड्या मोजल्या जवळ जवळ अडीचशे पेंड्या भरल्या.
दुसऱ्या दिवशीं येरवाळी ऊटून त्याच्या तीन वाटण्या केल्या. त्या सायकलच्या क्यरेजवर बैजवार बांधल्या. पडू नयेत म्हणून त्या दोरींन बांधल्या. तिघांची जेवनं एका पिशवीत घेतली. ऊजाडताच निघालो. कांहीवेळा चालत तर कांही वेळा सायकलवर बसून इस्लांमपूरची गणेश मंडई गाटली. खाली शंकरआबाची लुंगी अंथरली. त्याच्यावर सगळ्या पेंड्या ठेवल्या. आसपास सगळीकडं पाहीलं. सगळीकडं कोतमीर विकायला आली होती. मला तरं वाटलं अख्खा तालुका कोतमीर विकायला तिथं आला होता.
तास गेला. दोन तास गेले. पण कोतमीर ला गि-हाईक काय भेटनां. चार दोन यायची पण कोतमीर न घेताच हसत निघून जायची. हिच परिस्थिती सगळीकडे होती.
आंम्ही तिघं कोतमीरकडं मोठ्यां आशेनं बघत होतो. कोतमीर आमच्याकडं दिनदुबळ्या नजरेनं पहात होती.
आंम्ही कोतमीर जवळ बसून होतो. तोवर वाडीतला म्हादण्णा आला. आमच्याकडं बघून तो म्हणाला,
“गड्या,तुमची वेळ चूकली”
“कावं आण्णा?”
“आरं मी पानं विकायला बाजारातच असतु. तुम्ही हे कोतमीरीचं बोलला असता तर तुमचं याप तरी वाचलं असतं. एक सांगू आज कोतमीर ला कोण इचारत नाय. तरीभी बघा थोडं थांबून”
हे सारं ऐकून आंम्हाला दरदरून घाम फूटला.vकाल केलेल्या कामांवर पाणी पडणार होतं.बरं आम्ही काय सराईत बाजारकरी नव्हतो त्यामूळे कायच अंदाज नव्हता.
दुपारचे बारा वाजले. सकाळी नुसत्या चहावर आलो होतो. कोतमीरीचं चार पैसं मिळाल्यावर भाकरीबरोबर ताजी भजी घेवून जेवणार होतो. तरी बरं आंम्ही तिघानीं बरोबर जेवन आणलं होतं. पण कोतमीर विकल्याबिगर खायाचं कसं? म्हणून दम धरून होतो.
बाराचे एक झाले. दोन झाले. तरी एक पेंडीचा खप झाला नाय. सारा बाजार कोतमीरीवर रूसून होता. सगळ्यानीं शेतात अनावधानांन उगवलेली कोतमीर बाजारात आणली होती. सगळा बाजार कोतमीरनं भरला होता. त्यामूळे मालाला आजिबात उठाव नव्हता. पुढंपण काय सुधरलं असं काय दिसून येत नव्हतं.
दोन वाजल्यानंतर शंकरआबानं एक काम केलं, कोतमीरीच्या पेंड्याखाली टाकलेली लूंगी हळूवार काढून घेतली. त्यो आंम्हाला म्हणाला,
“चला लुंगी तरी घेवूया,नायतर ती भी जायाची.”
आंम्ही काय बोललो नाय. मूळात बोलण्यासारखे काय राहिलंच नव्हतं. गुमान सायकली घेतल्या अन पुढं चालू लागलो. कोतमीरीच्या पेंड्याकडं बघायचं धाडस झालं नाय. शंकरआबा अन वसंतानं सायकलवर केंव्हाच टांग मारलीवती. मी सायकलवर टांग मारण्याआधी कोतमीरीकडं बघितलं. एक गाय ती कोतमीर निवांतपणे खात ऊभी होती……!
© मेहबूब जमादार
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈