☆ मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक ☆
मन हे माणसाचे सहावे इंद्रिय आहे.नाक,कान,डोळे, रसना आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांना माणूस जेवढा ओळखतो त्याच्या पावपटही तो या सहाव्या इंद्रियाला ओळखत नाही.त्याचे सर्वात महत्वाचे कारण ही पाच ज्ञानेंद्रिये शरीरबाह्य आहेत आणि मन हे देहान्तर्गत आहे.जशी पाच ज्ञानेंद्रिये आपण दाखवू शकतो तसे मन दाखविता येत नाही.
मन दिसत नसले तरी सर्व इंद्रियामध्ये ते बलवान असते.सर्वावर त्याची सत्ता असते.जेव्हा माणसतली राक्षसी वृती जागृत होते माणसाचे मनोबल त्याला दुष्कृत्य करण्यास भाग पाडते.ही मानवी जीवनाच्या
विनाशाची सुरवातच म्हणावी लागेल.माणसाचे पहिले दुष्कृत्य म्हणजे सुधाकराचा एकच प्याला असतो.
हे लक्षात घेऊन आपण आपले मनोबल विधायक कामासाठी वापरले पाहिजे.विधायक कामासाठी मनही सदाचारी होणे महत्वाचे!
मन सदाचारी बनवायचे असेल तर आपल्या सहा शत्रूंना आपण जिंकले पाहिजे.हे सहा शत्रू म्हणजे काम,क्रोध, मद, मत्सर, लोभ! त्याना जिंकणे तसे सोपे नसते तरीही प्रतत्नपूर्वक सोपे करण्याचा प्रयत्न अशक्य नसतो. भूतकाळातील चांगल्या घटना, आठवणीना उजाळा देत आपण सकारात्मक विचार करू शकतो,आपल्या शत्रूंना आपल्यापासून दूर करण्याच्या प्रयत्नात हळूहळू यशस्वी होऊ शकतो.अशा यशस्वी होण्याने आपोआपच आपले मनोबल वाढते.
आनंद हे सुध्दा मनोबल वाढविण्याचे महत्वाचे कारण होऊ शकते.त्यामुळेच आपली आनंदीवृत्ती सहजपणे संकटाशी सामना करू शकते .प्रत्येकाने आनंदीवृत्ती जोपासून आपले मनोबल वाढविले जगणे सोपे होईल.अर्थात प्रत्येकाचे आनंद मिळवण्याचे मार्ग निश्चितच वेगळे असतात.
मनोबल वाढण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन फार महत्वाचा असतो.एखादा पाण्याने अर्धा भरलेला पेला बघताना तो अर्धा भरला आहे म्हणायचे की अर्धा रिकामा आहे म्हणायचे हे जसे त्या पेल्याकडं बघण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते तसेच मनोबलाचे असते.मानवी जीवनाच्या विकसासाठी सकारात्मक मनोबल उपयोगी पडते.जगायचेच आहे तर स्वप्नपूर्तीच्या मनोरथावर स्वार व्हावे म्हणजे जीवन यशस्वी होईल.
© सुश्री अनुराधा फाटक
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈