सौ. सावित्री जगदाळे
मनमंजुषेतून
☆ चारिका वारी … आतंरिक नाते ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
गौतम बुद्धांनी संघाला चारिका करण्याचा उपदेश केला. “भिक्खुंनो, बहुजनांच्या हितासाठी ,सुखा- -साठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी आणि देवमनुष्याचे साफल्य, हित, सुख यांसाठी तुम्ही चालत रहा. “— “ सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम ”—-(लेखक आ.ह.साळुंखे )– या पुस्तकातील हा उतारा वाचला आणि मला वारीची सुरुवात का झाली असेल याचा थोडासा अंदाज आला. नेहमी वाटायचं “का सुरू केली असेल ही वारी ?”
आपल्याकडे तीर्थयात्रा करणे तसे होतेच. पुण्यप्राप्ती व्हावी म्हणून, मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून तीर्थ यात्रा करायचे. पण ठराविकच काळ किंवा तोच मार्ग असं काही नसतं. वारीला मात्र ठराविक काळ, ठराविक मार्ग, ठराविक मुक्काम, सगळं काही ठरलेलं असतं. (वारीचं व्यवस्थापन जबरदस्त असते. अतिशय शिस्तबद्ध , काटेकोर असते.) सगळ्यांनी एकत्र पायी जाणं, असं का असावं असं नेहमी वाटायचं.
तुकोबांची पालखी देहूवरून अगदी अलीकडच्या काळात का निघत असेल ?? वाटतं तुकारामांनी हा मनातला विचार नारायणाला तर सांगितला नसेल ??? त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी नारायणाने देहूवरून इतर वारीबरोबर तुकोबांची वारी सुरू केली असावी . तशी वारी कधी सुरु झाली याचा स्पष्ट , ठाम काळ सांगता येणार नाही . नामदेव , ज्ञानेश्वरांच्याही आधी वारी असावी असं अभ्यासकांचं मत आहे . देहू वरून मात्र तुकोबानंतर नारायणाने तुकोबांची पालखी पंढरपूरला वारीबरोबर नेण्यास सुरवात केली असावी. कारण तुकोबांचे विचार बुद्धासारखेच होते, आहेत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उद्देशाने चारिका करा. चालण्यामुळे लोकांना धर्म सांगता येतो. त्यांचं कल्याण करता येते. म्हणून एका दिशेला एकजणाने जाऊन लोकांच्या कल्याणासाठी उपदेश करावा. भिक्खुंनी चारिका करावी असं त्यांनी सांगितले. स्वतःही चार दशकांहून अधिक काळ त्यांनी चारिका केली. वारकरी संप्रदायाचे विचार, आचार बघितले तर बुद्धाच्या विचारांचा हा आधुनिक अवतार वाटतो. ठाम मत मांडण्यासाठी माझा तेवढा अभ्यास नाही. इतरांनी लिहिले आहे तेच मांडण्याचा हा प्रयत्न.
विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे असं संतांच्या अनेक अभंगातून रामचंद्र ढेरे वगैरेंनी दाखवले आहे.
बुद्ध धम्म जेव्हा भारताबाहेर घालवून दिला, तेव्हा सगळाच्यासगळा जाणे शक्य नसते. काही अंश राहतो, उरतो. सुप्त अवस्थेत, गुप्तपणे कुठेतरी वाढ विस्तार, विकास होत राहतो. उजळ माथ्याने नसेल वावरत पण वेष बदलून धम्म टिकवून ठेवण्याचा प्रयत्न झाला नसेल कशावरून….
चारिकाबद्दल वाचल्यावर तर खात्रीच वाटली. लोकांचे कल्याण करायचे असेल तर चालले पाहिजे. हे असे विचार तुकोबा घरात, मुलांजवळ बोलत असणार. जिवंतपणी ते साध्य झालं नाही की मागे राहणारे त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक कष्ट घेतात. तसंच हे वारीचे असावे. असं माझे वैयक्तिक मत आहे..
॥ ॥ ॥
© सौ. सावित्री जगदाळे
संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈