सौ.मंजुषा सुधीर आफळे
मनमंजुषेतून
☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – भावपूर्ण श्रद्धांजली ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆
बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे
ज्यांनी आपले उभे आयुष्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी अर्पण केले, अशा थोर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…….?
हिमालयातील ट्रेकसाठी दुरांतोमधून प्रवास सुरू होता. संध्याकाळ झाली होती. बाहेर अंधार पडला होता. आम्ही पत्ते खेळत होतो. तितक्यात आमच्यापैकी कुणीतरी धावत येऊन, ‘ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिसले आपल्या गाडीत — मागच्या बाजूने २ डबे ओलांडून गेल्यावर दिसले ‘ अशी बातमी दिली. ताबडतोब डाव सोडून आम्ही धावत गेलो. आणि त्यांचे दर्शन घडले. त्या तेजःपुंज व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक झालो. डोक्यावर हात ठेवून त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले. तो आयुष्यातला खूप अविस्मरणीय क्षण होता. प्रत्यक्ष देव भेटल्याचा अनुभव आला. डोळ्यात आनंदाश्रू —मन भरून आले.
बोलता येईना. ते हसले. “बसा” म्हणाले. वडिलांजवळ बसल्यासारखेच वाटले. आता ट्रेक यशस्वी होणारच हे निश्चित होते. आणि तसेच झाले. एक विलक्षण अनुभव जगता आला. त्याबद्दल देवाची खूप खूप आभारी आहे.
भेटीनंतर जी उर्जा, चेतना मिळाली, ती आजतागायत टिकून आहे. अजूनही ट्रेकला जायचं ठरवलं की, ही आठवण मनात येते. आणि अंगात चार हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते.
अफाट स्मरणशक्ती, आपल्या भाषणातून, लेखनातून, अभिनयातून संपूर्ण इतिहास, त्यातील प्रसंग, जिवंतपणे डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. अत्यंत निष्ठावंत शिवप्रेमी, अभ्यासू आदर्श व्यक्तिमत्व–ज्यांनी आपलं सर्व आयुष्य खर्च करून भावी पिढीसाठी इतिहास जागवला, आणि तो जिवंत ठेवण्यासाठी तळमळीने अखंड यज्ञ सुरू ठेवला, त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शतशः नमन—?
शरीराने आज ते आपल्याजवळ नसले तरी त्यांचे महान कार्य सतत प्रेरणा देणारे आहे. ते कार्य पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्यांसाठी ते नेहमीच त्यांच्या सोबत आहेत, हे नक्कीच–
भावपूर्ण श्रध्दांजली… ?
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
विश्रामबाग, सांगली.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈