डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ दूरचे दिवे…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
लहानपणी एक गोष्ट वाचल्याचे आठवते —-
—- बादशहाने यमुना नदीत रात्रभर उभ्या राहिलेल्या माणसाला बक्षीस दिले.
पण पोटदुखी झालेल्या दरबाऱ्यांनी म्हटले—’ याला नदीकाठी दिवे होते, त्याची ऊब मिळाली, म्हणून तो उभा राहिला, याला बक्षीस देऊ नये महाराज। ‘
यावरूनच मनात आले —- दूरचे दिवे हे कधी कोणाला ऊब देतात का ? ते दूर असतात,आणि त्यांनी ऊब द्यावी ही अपेक्षाच चुकीची आहे ना. व्यवहारात बघा–या दूरच्या दिव्यांचा, रोषणाई- व्यतिरिक्त काही उपयोग नसतो। मिरवणुकीत झगमगाट करतात, आणि मिरवणूक संपली,की लोक त्यांना विसरूनही जातात.
अलीकडेच बघा, घरटी एक मूल परदेशात स्थाईक झालेले आढळते. त्यांचे आईवडील, त्या मुलांचे, नातवंडांचे फोटो, मोठ्या अभिमानाने आणि कौतुकाने सगळ्यांना दाखवत असतात. बघणाऱ्याला काहीवेळा त्यांचे ते कौतुक ऐकूनच उबग येतो. पण बोलणार कोण,आणि त्यांच्या उत्साहाला टाचणी लावणार कशी, आणि का ? रमतात बिचारे स्वप्नरंजनात, तर रमेनात का—
पण खरी परिस्थिती त्यांनाही चांगलीच माहीत असते. मग नातवंडांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या, की हे तिकडे 2 महिने जातात, आणि सुट्टी संपली,की मायदेशी परत येतात.
या संदर्भात लेखिका मंगला गोडबोलेंचा, ” बाल्टिमोरची कहाणी “ हा अतिशय सुंदर लेख मला नेहमी आठवतो. किती परखड आणि सत्य लिहिलंय त्यांनी – तिकडे असलेल्या मुलांचे तोंड फाटेपर्यंत कौतुक, आणि इथे सतत जवळ राहून, हवे नको बघणाऱ्या मुला- सुनेला दुय्यम स्थान.– जसजसे वय वाढू लागते, तसे परदेशवाऱ्या झेपेनाशा होतात.
तिकडे सिटीझनशीप घेऊन कायमचे राहणाऱ्या लोकांना मी भेटलेय, बोललेय.
ते लोक 40 -45 वर्ष तिकडेच राहिलेले असतात. त्यांची कोणतीही मुळे भारतात रुजलेली रहात नाहीत. त्यांची पूर्ण मानसिक तयारी असते,की आपल्याला वृद्धाश्रम हाच पर्याय उरतो.
सुना अमेरिकन, जावई व्हिएतनामी, आणखी एखादी सून चिनी, –असले सगळे विविधदेशीय लोक, या म्हाताऱ्यांना कशाला हो विचारतात.
पण तरी ते मात्र सांगत असतात, की आम्हीच oldage होम हा पर्याय निवडलाय.
–एका अमेरिका भेटीत मी बघून आले ते वृद्धाश्रम. काळे,गोरे, चिनी, मराठी, पंजाबी,असे अनेक वृद्ध तिथे होते. ना आपुलकी,ना प्रेम। पण काळजी, कर्तव्यात मात्र कमी नाही.
भरपूर पैसे मोजावे, आणि रहावे. आता आता, तिथल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन, आपल्या colonies करायला सुरुवात केलीय–इथल्या ‘अथश्री ‘सारख्या.
मला तिकडे एक आजी दिसल्या. मी जवळ जाऊन त्यांच्याशी बोलले.
त्या म्हणाल्या, “ मी जर माझ्या गोऱ्या सासूला एकही दिवस सांभाळले नाहीये, तर माझ्या सुनेकडून मी कशी अपेक्षा करावी ,की ती गोरी सून मला कायमचं घरी ठेवून घेईल.”
त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. म्हणाल्या, ” भाग्यवान हो तुमची आई. ८५ वर्षाची आहे, पण तुम्ही बहिणी संभाळताय.–माझी तक्रार नाही, पण इथे नको वाटते ग. संध्या छाया भिववतात.
माझा मुलगा सून चांगले आहेत हो. नवराही छानच होता. त्या काळात मी अमेरिकन नवरा केला,तर भारतात माझे आई वडील नुसते संतापले होते. बरोबरच आहे ग. आता समजतो मला त्यांचा संताप. पण 4 वर्षांपूर्वी नवरा गेला,आणि माझे घरच गेले. मुले मला एकटी राहू देईनात.मग काय, हेच माझे घर आता. नशिबाने पैसा आहे, म्हणून या चांगल्या वृद्धाश्रमात रहाणं परवडतेय मला. नाही तर कठीण होते बाई सगळेच. “
माझ्या पोटात कालवले ही कहाणी ऐकून.
मला त्यांनी विचारले, “ काय ग, इंडियात नसतील ना असे वृद्धाश्रम ? किती छान असेल तिथले म्हातारपण ? “
कोणत्या तोंडाने त्यांना मी सांगणार होते, की “ आजी असे अजिबात नाहीये. पैश्याच्या ओढीने तिकडेच गेलेली मुले, नाईलाजाने का होईना, पण एकाकी उरलेल्या आई किंवा वडिलांना ठेवतात हो वृध्दाश्रमात. एवढेच कशाला, परदेशात नसूनही, आई बाप नकोसे झालेली मुलेही कमी नाहीत—-”
पण हे काहीही न बोलता, मी त्यांना वाकून नमस्कार केला. बरोबर आणलेला खाऊ त्यांना दिला— “ इथे आहेस तोवर येत जा मला भेटायला. मराठी बोलायलाही कोणी नाही ना ग इथे.” —–खिन्न मनाने मी मुलीबरोबर परत आले. तिला म्हणाले, “ बाई ग, इथे नका हं राहू म्हातारपणी. हा देश आपला नाही ग बाई. “
मुलगी माझ्या जवळ बसली. म्हणाली, ”आई,तू का रडतेस? बघू,ग आम्ही. येऊ परत साठ वर्षाचे झालो की.”
पण मला मनातून माहीत आहे की –’ सिंहाच्या गुहेत गेलेली सशाची पावले, परत आलेली कोणी बघितली आहेत का.?’
पुन्हा विचार केला–म्हणजे मनाला समजावलं — देश सोडण्याचा निर्णय त्यांचा, त्याचे भले बुरे परिणाम भोगायची तयारीही त्यांचीच—-
—निमूट बॅग भरली, आणि ठरलेल्या वेळी माझ्या देशात परत यायला निघाले ।—
विमानाने टेकऑफ घेतला. मी अगदी सहज खिडकीतून बाहेर बघितलं —–
अमेरिका दिव्यांनी नुसती झगमगत होती. हळूहळू विमान आकाशात उंच झेपावलं —- इतका वेळ झगमगणारे दिवे पुसट पुसट होत गेले, आणि एका क्षणी दिसेनासेच झाले—–का कोण जाणे, पण नकळत हसू आलं —- आणि झर्रकन मनात विचार आला —-
“ दिवे असोत, की माणसे असोत, दूर असले की ऊब मिळण्याची अपेक्षा व्यर्थच ठरणार .”
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈