डॉ अभिजीत सोनवणे
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆
@doctorforbeggars
ती मला भेटली होती साधारण चार वर्षांपूर्वी….
वय असावं साधारण साठीच्या आसपास… ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथवर, एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची…..
येता जाता मी तिला पहायचो…तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो. पण ती कधी दाद द्यायची नाही…. तिला अंधुक दिसायचं… जवळपास नाहीच…
वयाच्या मानाने तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे, परंतु ती मात्र पूर्णतः खचलेली…. वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं…. मी तिच्या यजमानांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही दाद दिली नाही. मला याचं काहीच कारण कळत नव्हतं….
असंच वर्ष निघून गेलं….. पावसाळा सुरू झाला, एके दिवशी त्या रस्त्याने जात होतो. माझ्या अंगावर रेनकोट होता…. सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं– ते दोघे भिजत होते… पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होते…. ! सगळ्यांनीच छळलं होतं…. पाऊस बरा यांना सोडेल?
खूप वाईट वाटलं.. परंतू ते दोघेही सहकार्य करायला तयार नव्हते… मी तरी काय करणार ?
तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लास्टिकची मोठीच्या मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली…. पाऊस धो धो कोसळत होता… ते भिजत होतेच…
ते ज्या ठिकाणी बसले होते तिथे जाऊन मग त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिकची ताडपत्री टाकून, छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला….
तिला दिसत नव्हते… तिने शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारले, “ एवढ्या जोरात पाऊस पडत होता अचानक कसा थांबला ? “ यजमानांनी तिच्या कानात काहीतरी सांगितले.
मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीने मला हाक मारली….” ए बाबा… हिकडं ये….”
मी छताखाली गेलो, तशी ती मला म्हणाली, “ तू हायस तरी कोण? आनी आमच्या मागं का लागला हायस? तुला काय पाहिजेन…. जगू दे ना बाबा हित तरी सुखानं…”
घरातून बाहेर पडलेले हे दोघे….जगाने यांना, या ना त्या कारणाने खूप फसवले होते, आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता….अनेकांनी यांना धोका दिला होता….
खरंच, विश्वास किंमती असेलही, पण धोका मात्र खूप महाग असतो…!
पुढे तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो. मी नेमकं काय करतो आणि कशासाठी, हे त्यांना समजेल अशा भाषेत यांना समजावून सांगितलं….’ माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही झाली तर मदतच होईल ‘ याची मी त्यांना खात्री दिली…! मी निघालो, जाताना या वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं…
यानंतर अनेक वेळा मी तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो. जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो…. बघता बघता दोन माणसांना स्वयंपाक करून खाता येईल आणि जगता येईल अशा सर्व गोष्टी घेऊन दिल्या.
तिचं माझ्याविषयीचं मत आता बदलत चाललं…
मी तिला फसवणार नाही, याबद्दल ति ची खात्री झाल्यावर त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला….
यानंतर तिला माझ्या गाडीवर बसवून तीन ते चार वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ऑपरेशन केली, आणि … शेवटी एकदाचं तिला दिसायला लागलं….
एका पायाने ती अधू होती…. मग तिला एक व्हीलचेअर पण घेवून दिली….
आता नाती घट्ट झाली होती….
मी तिला गमतीने नेहमी “ए म्हातारे” असं म्हणूनच हाक मारायचो.
तिला बाकी कशाचा नाही, पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा. बस एवढ्या एकाच गोष्टीने ती चिडायची….दरवेळी मला म्हणायची, “ म्हातारे नको ना म्हणू…. ताई म्हणत जा की मला “.
पण कुणाचं ऐकेल तो मी कसला ?
क्रमशः….
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈