बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे
मनमंजुषेतून
☆ बाबासाहेब…शुभा गोखले. ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
पद्मविभूषण महाराष्टभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शतक-वर्षात पदार्पण करत आहेत याचा आनंद सोहळा मनात सुरु असतांनाच, त्यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकावी लागली, आणि त्यांच्याविषयीच्या आठवणी मनात दाटून आल्या. त्यातली ही एक अगदी पहिली आठवण —–
पुण्यात रहात असल्यामुळे त्यांना अनेक प्रसंगी पाहण्याचं भाग्य मला लाभलंय… मग ते ‘ जाणता राजा ‘’च्या प्रयोगादरम्यान असो, नाहीतर टिळक स्मारकमधे राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार समारंभात असो. पण एका छोट्या प्रसंगी त्यांची-माझी झालेली प्रत्यक्ष भेट मी कधीच विसरू शकत नाही !
साधारण ४०-४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. पुण्यातल्या पेशवे-काळातल्या विश्रामबागवाड्याला जुन्या वैभवाकडे परत नेण्याचा बाबासाहेबांनी विडा उचलला होता. त्याचाच भाग म्हणून असावा बहुधा, त्यांनी एक प्रदर्शन तिथे आयोजित केलं होतं. प्रदर्शन दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणार होतं, पण संध्याकाळचे ७ वाजून गेले असल्याने दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणून सगळ्या पाट्या, बॅनर वगैरे विश्रामबागवाड्याच्या तळमजल्यावर लागलेलेही होते. त्यावरची तारीख न पाहताच मी घाईघाईने वर पोहोचले (कारण प्रदर्शनाची वेळ ७.३०पर्यंत लिहिलेली होती)!
आत गेले तर पांढरी दाढी असलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व प्रदर्शनाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवत होतं. बाकी कुणीच नव्हतं ! माझी चाहूल लागल्यावर त्यांनी वळून प्रेमाने विचारलं, “ अगं आजच आलीस का ? प्रदर्शन तर उद्यापासून आहे ! “
मी पण निर्भयपणे सांगितलं की, “ आता खाली पाटी दिसली म्हणून आले. आम्ही लांब रहातो. आणि आता परत गावात येता येणार नाही पुढच्या दोन दिवसांत ! “
मग त्यांनी ‘ बरं ‘ म्हणून सगळ्या प्रदर्शनाचं दर्शन घडवत मला वाड्याच्या गतवैभवाची कथा सांगितली.
अशी exclusive treatment मिळणारी मी किती भाग्यवान होते हे कळायचं ते वय नव्हतं ! प्रदर्शनाची सैर संपल्यावर, शेवटाकडे पोहोचल्यावर तिथली पाटी वाचून मी चक्क फ्रॉकच्या खिशातून आठ आणे काढून त्यांना देऊ केले ! त्यांना माझं काय करावं हेच कळेना ! “ अगं राहू देत “ ते म्हणाले. तर माझा एकच धोशा…’ प्रदर्शन बघण्याचं मूल्य ५० पैसे आहे ना पण !’ शेवटी माझी समजूत काढत म्हणाले की,” ते मूल्य उद्यापासून प्रदर्शन सुरू झाल्यावरसाठी आहे ! “ — मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला की ‘ शाळेत इतिहास छान शिक ! ‘
—-आता इतक्या वर्षांनंतर या सगळ्या संस्कारांचं महत्व पटतंय ! आपला बहुमोल वेळ एका शाळकरी मुलीसाठी इतक्या सहजपणे खर्च करायची त्यांची तयारी, आता मला माझ्या विद्यार्थ्यांंसाठी केव्हाही वेळ द्यायला नेहमीच प्रेरणादायी ठरते !
श्री. बाबासाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
– शुभा गोखले
संग्राहक – सुश्री मीनल केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈