☆ मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

 

“स्वत:साठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास” हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत असतो. ते पूर्णपणे खरं आहे. पण या वाक्याचा विपर्यास ही झालाय असं आपलं मला वाटतं.

आजूबाजूला काय दिसतं?

पूर्ण आयुष्य संसाराला, मुलांना वाहिलेली गृहिणी असते. तिचं समर्पण वंदनीय असतं. पण सतत दुसऱ्यांच्या म्हणजे मुलांच्या, घरातल्या संदर्भात जगण्याची तिला सवय होते. मात्र एका वळणावर मुलं स्वयंपूर्ण होतात. त्यांचं आईवर खूप प्रेम असलं तरी दैनंदिन आयुष्यात आईची गरज कमी होते. घरही स्थिरस्थावर होतं. मग मिळालेल्या या एवढ्या मोठ्या वेळेचं करायचं काय हा प्रश्न पडतो. शरीराची दुखणी, मनाचा एकटेपणा यांचा संबंध मग जुन्या घटनांशी, व्यक्तींशी, अगदी ज्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकलं, त्या

मुलांशीही जोडला जातो.

पुरूषांचं  हेच होतं. नोकरी, व्यवसायातले कष्ट संपतात. घरात राहण्याचा वेळ वाढतो. मग घरातल्या अनेक गोष्टी ज्या वर्षानुवर्षे चालू होत्या पण जाणवलेल्या नव्हत्या , त्या अचानक जाणवायला  लागतात. बारिक सारिक गोष्टीत हस्तक्षेप सुरू होतो. समाजातल्या,  राजकारणातल्या समस्यांवर कृतीशून्य चर्चा मोठ्या उत्कटतेने सुरू होते. आणि समवयस्कांखेरीज इतरांना त्यातली निरर्थकता जाणवल्यामुळे ती निरस वाटू लागते.

या दोन्ही मागचं कारण मला वाटतं, आपण नेहमी”दुसऱ्यांच्या संदर्भात”जगतो. “दुसऱ्यांसाठी”असं मी म्हणणार नाही. कारण दुसऱ्यांसाठी आपण जे करतो त्याचा आपल्याला आनंद होतो म्हणून करतो हे खरं आहे. त्यामुळं तसं आपण दुसऱ्यांसाठी काहीच करत नाही. दुसऱ्यांच्या संदर्भात करतो. तर आपण मूलतः आपल्यासाठी जन्मलो आहोत आणि आपल्यासाठी जगतो आहोत हेच आपण विसरतो.

आपण सवड असली तरी व्यायाम करत नाही,  फिरायला जात नाही. स्वत:साठी योग्य ते खात नाही.

मनाला विकसित करण्यासाठी ध्यान, स्वसंवाद,  विवेकपूर्ण विचारप्रक्रियेची समज याकडे लक्ष देत नाही. (अर्थात या विवेकाची सवय लगेच होत नाही. बऱ्याचवेळा अविवेकानं वागून झाल्यावर “अरेरे. . . चुकलं आपलं”असं वाटतं. )पण तेही ठीक आहे. निदान यामुळे दुसऱ्यांवर रागवण्याचा क्षणिक उद्रेक झाला तरी नाराजीची पुटं चढत नाहीत मनावर.

स्वत:साठी काही पाठांतर करण्यात आपण वेळ देत नाही. कारण पाठांतर वगैरे लहान मुलांशी संबंधित. . . आता या वयात मला काय गरज? असं वाटतं. पण वाढत्या विस्मरणशक्तीवर काही श्र्लोकांच्या पाठांतरासारखे इतरही स्मरणशक्तीचे व्यायाम उपयुक्त असतात.

यातल्या कशालाही पैसे लागत नाहीत. २४तासात कमी होत चाललेल्या आणि कधीकधी वाढलेल्यासुध्दा जबाबदाऱ्या सांभाळून यातलं सगळं नाही पण थोडं काहीतरी आपण करू शकतोच. पण असं फक्त स्वत:साठी काही करायची आपल्याला सवय नसते. या अर्थानं स्वत:साठी जगणं हे फार महत्त्वाचे आहे. पैसा उडवणं आणि गुंतवणं यात फरक आहे. तोच फरक स्वत:पुरतं जगणं आणि स्वत: साठी जगणं यात आहे असं मला वाटतं. स्वत:पुरतं जगताना तुम्हाला दुसऱ्याचा विचार करायची,  दुसऱ्यासाठी झिजण्याची गरज नसते. पण स्वत:साठी जगण्यासाठी दुसऱ्यांसाठीचं जगणं सोडायची गरज नसते. गरज असते ती फक्त सतत दुसऱ्यांच्या संदर्भात जगणं सोडायची.

हेच तर “कैझान”आहे जे आपण कंपन्यांमध्ये राबवतो पण स्वत:च्या  आयुष्यात कैझानची गरज आणि ते अत्यंत छोट्या गोष्टीतून कसं इंम्प्लिमेंट करता येईल याचा विचार करतच नाही. माझ्या posts हे माझं loud thinking ही असतं हं. . . कारण मीही प्रवासीच आहे की कैझानची.

© सौ. राजलक्ष्मी देशपांडे

मोबाईल नं. ९८५०९३१४१७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments