डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ वैद्यो नारायणो ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

कुठेही असलो तरी आम्ही डॉक्टर, आमच्यातल्या  डॉक्टरला  मुळीच विसरत नाही. त्याच संदर्भातली माझी  एक आठवण—-

चार  वर्षांपूर्वी मुलीकडे अमेरिकेला गेले होते. तिकडून इकडे परत येताना स्वाभाविकच मन अगदी कासावीस आणि व्याकुळ होते. विमानतळावर पोचवायला लेक जावई आणि सगळ्यात लाडकी नात आली होती. “ आजी नको ना जाऊ.  मी पण येणार  इंडियाला “–असे म्हणत  माझा जीव आणखीच व्याकूळ करणारी माझी नात. 

जड अंतः करणाने त्यांचा निरोप घेऊन विमानात बसले,  पण मन मात्र अजून तिच्या घरातच होते. 

तीन महिने अनुभवलेली ती आद्याची गोड बडबड—आई डॅडी रागावतील म्हणून त्यांना न सांगता केलेले लाडिक हट्ट—सगळं सगळं बरोबर घेऊनच पाऊल विमानात ठेवले होते। विमान म्युनिकला पोचले आणि आता ४ तास तिथेच थांबायचे होते. मुंबईला जाणारे इतर बरेच लोक भेटले, आणि ४  तास कसे गेले समजलेच नाही.

मुंबईच्या विमानात बसलो आणि विमानाने आकाशात झेप घेतली. नेहमीच्या सवयीने मी पुस्तक काढून वाचायला लागले. जरा वेळाने माझ्या पुढच्या सीट वरून मला कोणीतरी रडत असल्यासारखा भास झाला. जरा वेळाने चक्क हुंदके ऐकायला आले. न राहवून मी डोकावून बघितले, तर तिथे बसलेल्या जवळपास ८०-८२ वर्षाच्या एक आजी रडत होत्या. मराठी दिसत होत्या.

मी विचारले, “ काय झाले आजी ? काही होतंय का तुम्हाला? “ 

तर म्हणाल्या, “ माझं भयंकर डोकं दुखतंय. काही सुचत नाहीये. “ 

मी हवाई सुंदरीला बोलावले. ती जवळ बसली.  विचारू लागली. पण आता आजी आणखीच रडायला लागल्या. ती बिचारी घाबरली आणि तिने सिनियरला बोलावले.

” मला आता हे सहन होत नाहीये. माझ्या छातीत पण दुखतंय.” आजी कळवळत म्हणाल्या

आता तर त्या एअर होस्टेस ही घाबरल्या. हे सगळे मी बघत होते

मी विचारलं, “ मी बघू का ? मी डॉक्टर आहे, आणि मदत करू शकते.” 

त्वरित आजीच्या शेजारचा प्रवासी उठला, आणि म्हणाला “ डॉक्टर प्लीज पुढे या.” 

मी त्याच्या सीटवर गेले. एअरहोस्टेस खूपच टेन्स झाल्या होत्या. मी आजीच्या जवळ बसले. 

म्हणाले, “  आजी घाबरू नका. मी आहे ना आता तुमच्याजवळ ? “

मी एअरहोस्टेसना म्हटलं, “ माझ्या कडे उत्तम पेन किलर गोळ्या आहेत, मी याना देऊ का– त्यांना लगेच बरे वाटेल.” 

“ द्या ना प्लीज।” त्या लगेच म्हणाल्या.

“ आजी तुम्हाला कसली allergy आहे का ?”

“ नाही “ 

“ सकाळपासून काय खाल्लंय तुम्ही ?”

“ काही नाही हो. मन नुसतं बेचैन झालंय। मला काही सुचले नाही खायलाही.” 

मी एअरहोस्टेसना  ज्यूस आणायला सांगितला. 

आजींना म्हटले, “ आजी ही गोळी घेऊन टाका.  मस्त बरे वाटेल बघा. अहो मलाही खूप वाईट वाटतंय– मुलीला आणि  नातीला सोडून येताना. पण काय करणार ? “ 

 आजी म्हणाल्या, “ ४ महिने होते हो  मुलाजवळ. आता या वयात असे मानसिक आघात

सहन नाही होत. मी पुन्हा नाही येणार आता कधी परदेशात.” 

मी गोड बोलून आजीना गोळी घ्यायला लावली. थोडा ज्यूस पाजला. आजींना झोप लागली. 

हे बघून मगच एअरहोस्टेस मला विचारून तिथून आपल्या  कामाला गेल्या.

आजी थोड्या वेळाने जाग्या झाल्या. माझा हात त्यांच्या हातातच होता.

मला म्हणाल्या, “ खूप कमी झाले हो माझे डोके.  अगदी बरे वाटतेय मला.” 

म्हटले, “ आजी तुम्हाला मानसिक त्रास झाला, बाकी काही नाही. मी विशेष काहीच नाही केले. “ 

मला म्हणाल्या, “ बाई ग देवासारखी आलीस हो मदतीला. काय सुंदर दिलेस बाई औषध. अग मी एकटीच असते मुंबईला. मुलगा नातू सून अमेरिकेत. माझे मिस्टर  मागच्या वर्षी  गेले, आता मी एकटीच रहाते फ्लॅटमध्ये. एकटीने प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ. म्हणून हे सगळे दडपण आले.” 

आजीचे डोळे पुन्हा भरून आले—-“ मुलगा म्हणतो आई एकटी नको राहू. इकडे कायमची ये. 

 मी ग्रीन कार्ड करतो. पण मला नाही आवडत तिकडे. तुझे आभार ग बाई. हे विमानातले खाणेही

मुळीच आवडत नाही मला.” आजी म्हणाल्या. 

मी माझ्या जवळचा शिरा आणि लाडू आजीना दिला. म्हटले “ बघा ,लेकीची माया. आईची काळजी किती. सकाळी शिरा आणि पुऱ्या करून दिल्या.” 

आजींनी आनंदाने सगळे खाल्ले. आता डोके छाती सगळे थांबले म्हणाल्या. पुन्हा त्यांना मस्त झोप लागली. एअरहोस्टेसनी माझे आभार मानले, आणि सुटकेचा निश्वास टाकला.

मुंबई आली– सगळे  सोपस्कार उरकून बाहेर आले तर आजी वाट बघत होत्या. त्यांची बहीण त्यांना न्यायला आली होती. माझी ओळख करून देत म्हणाल्या,“ ही मुलगी नसती तर माझे कठीण होते बाई. .मला कोणती गोळी दिलीस ती लिहून दे हो. “ 

मी हसले आणि म्हणाले, “ आजी, ती साधी पेन किलर होती. तुम्हाला फक्त धीर, प्रेम आणि आश्वासनाची गरज होती तेवढेच काम मी केले, बस.” मी आजींना नमस्कार केला.

त्या म्हणाल्या. “  देव कल्याण करो ग बाई तुझे. डॉक्टरला धन्वंतरी म्हणतात ते उगीच नाही. “ 

 त्यांनी मला हात जोडले–” अशीच पुण्यकर्म करत रहा ग बाई. अग देव काही  वेगळा असतो 

का ? तुझ्या रूपात भेटलाच की मला.” 

“ आजी एवढे नका मला मोठेपण देऊ हो. माझे कर्तव्य केले मी.” 

आजींनी मला जवळ घेतले, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, आणि डोळे पुसत बहिणीबरोबर चालू लागल्या—

त्या थकलेल्या दोघी वृद्ध बहिणी बघून माझेही डोळे भरून आले ——

 

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments