सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गेल्या काही दिवसात  शिवशाहीरांवर  लिहिलेले कितीतरी लेख वाचले. त्यांच्या मृत्यूमुळे झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. आज साठी- सत्तरीला असणाऱ्या  प्रत्येकाने कधी ना कधी बाबासाहेबांची व्याख्याने ऐकली असतील ! तो धबधब्याच्या अखंड प्रवाहासारखा  वाणीचा अखंड स्त्रोत एकदा सुरू झाला की त्या प्रवाहाखाली सचैल स्नान करण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरंच भाग्यवंत ! सुदैवाने हे भाग्य आम्हाला मिळाले ! आता पुष्कळांनी त्यांच्या आठवणी काढल्या असतील ! खूप छान लेखन वाचायलाही  मिळतंय, तरीही मला आठवणारे  ते रत्नागिरीतील शिवव्याख्यानाचे आठ दिवस व्यक्त करावेसे वाटत आहेत.

  साधारणपणे 66/ 67 सालची गोष्ट असेल. रत्नागिरीला महिला विद्यालयाच्या मैदानात बाबासाहेबांच्या व्याख्यानाचा महोत्सव होता. पूर्ण महोत्सवाचे तिकीट काढले होते. रोज रात्री ठराविक वेळेला (बहुतेक आठ किंवा साडेआठ, नक्की आठवत नाही) व्याख्यान सुरू होत असे.  वेळेच्या बाबतीत अतिशय कडक असलेले बाबासाहेब, व्याख्यानाची सुरुवात करण्याच्या वेळेनंतर पाच मिनिटातच गेट बंद करायला लावत असत. त्यानंतर कोणालाही आत प्रवेश नसे आणि बरोबर एक तासानंतर व्याख्यान संपत असे. तीही वेळ अगदी कटाक्षाने पाळली जाई. भारावलेल्या मनस्थितीत लोक बाहेर पडत असत. जणू काही शिवकालातच आपण सर्वजण वावरत असू ! लहान मुलांचे रडणे, ओरडणे त्यांना अजिबात चालत नसे. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असा त्यांचा आग्रह असे. कारण अशा व्यत्ययामुळे रसभंग होत असे, तो त्यांना आवडत नसे. आम्ही जिवाचे कान करून त्यांचा प्रत्येक शब्द ऐकायचा प्रयत्न करत असू. काहीजण त्यांच्या व्याख्यानाचे टिपण काढत असत. त्यावेळी त्यांची सही घेण्यासाठी आम्ही धडपडलो होतो तेही आठवते ! त्यांची

पल्लेदार वाक्यं, खानदानी भाषा, डोळ्यासमोर मूर्तिमंत शिव- इतिहास निर्माण करण्याची क्षमता ! खरोखरच ते सर्व अद्भुत होते ! ‘ शिवरायांचा आठवावा प्रताप…’ सांगणारे रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या काळातच होते, त्यांनी शिवाजीमहाराज अनुभवले, पण बाबासाहेबांनी ते पुन्हा आपल्यासमोर सत्यात आणले !

  शाळेत असताना शिवरायांचा इतिहास इयत्ता चौथीच्या पाठ्यक्रमात आम्ही शिकलो. पुढे मोठे झाल्यावर बाबासाहेबांच्या ‘राजा शिव छत्रपती’ पुस्तकाचे भाग पारायणासारखे वाचून काढत होतो. कितीही वेळा वाचले तरी शिवचरित्र हे कायमच नवीन वाटते ! मुलांना शिकवतानाही शिवचरित्र ऐकवत होतो.

  बाबासाहेब पुरंदरे आणि लता मंगेशकर यांच्या संदर्भात एक गोष्ट आठवते ती म्हणजे,  लतादीदींच्या 90 व्या वाढदिवसाच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते की, ‘तुमचा शंभरीचा वाढदिवस करायला मी नक्की असेन !’ आता प्रत्यक्षात जरी ते नसले तरी त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी कायमच राहणार आहे. शिवरायांचा आणि त्या काळाचा बाबासाहेबांना इतका ध्यास होता की ते खरोखरच त्या काळात जगत असत. त्यांच्या घरातील मंडळींना मानाने हाक मारली जात असे. तसेच मुजरा केला जाई असेही ऐकून होतो !

आज शंभराव्या वर्षी त्यांचे निधन झाले असले तरी बाबासाहेबांचा मृत्यू झालेलाच नाही– ते त्यांच्या विचारातून आणि ग्रंथातून अमर झालेले आहेत !

  बाबासाहेबांविषयी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने लिहिणे म्हणजे अवघडच आहे ! पण त्यांची भाषणे ऐकली होती त्यांचे स्मरण झाले. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त कराव्या असे वाटले म्हणून हा छोटासा लेख !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments