सुश्री प्रभा सोनवणे

? मनमंजुषेतून ?

☆ सरदार पेठ – शिरूर घोडनदी ☆

आम्ही पुणं सोडून शिरूर घोडनदी या तालुक्याच्या ठिकाणी नवीन बि-हाड केलं ! शिरूर मधे आमचे नातेवाईक- बाबासाहेब पवार रहात होते, खरं तर ते देवासचे सरदार पवार,आजोबांची बहिण (माँसाहेब) बाबासाहेब पवारांच्या वडिलांची सावत्र आई ! त्यांच्याच गावात पिंपरी दुमाला येथे आम्ही स्थायिक झालो होतो. त्यांनीच आम्हाला शिरूरला भाड्याचं घर बघून दिलं, ते जिथे रहात होते ते घर सोडून दुसरं घर !

पवारांचं घर मोठं आणि प्रशस्त होतं. दोन मजली स्वतंत्र वाडा, पवार काकींचं व्यक्तिमत्व सरंजामदारणीसारखंच रूबाबदार होतं !त्यांच्या घरातलं वातावरण आणि राहणीमान उच्चभ्रू होतं !

त्यांनी आम्हाला दाखवलेलं घर पलिकडच्या वाड्यात वरच्या मजल्यावर होतं. घर छान होतं.   आमचं ते घर सरदार पेठेत होतं, पण येण्याजाण्याचा रस्ता पाठीमागच्या बाजूने होता ते गैरसोयीचं वाटे. तिथे आम्ही चार पाच महिनेच राहिलो. त्या घराच्या समोरच एक दोन मजली घर होतं. त्या घराची मालकीण मुस्लिम होती, ती मुंबईला रहात होती….त्या घरात कोणीच रहात नसल्यामुळे त्या घराला “भूतबंगला” म्हणत. पण आईला ते घर आवडलं आणि आम्ही त्या चार खोल्यांच्या  प्रशस्त घरात रहायला गेलो. कुणीही शेजार पाजार नसलेला तो एक स्वतंत्र बंगलाच होता. पाठीमागे छोटंसं अंगणही होतं. आम्ही विद्याधाम प्रशाला या शाळेत जात होतो. मी सातवी अ मधे प्रवेश घेतला तेव्हा पहिल्याच दिवशी माझी राणी गायकवाड नावाच्या मुलीशी ओळख झाली. लता रजपूत, संजीवनी कळसकर, चित्रा कुलकर्णी,मंगल पंढरपूरे, सुनंदा बेलावडे, माधुरी तिळवणकर, पुढे आठवीत फैमिदा शेख, सरस बोरा, उज्वल, निर्मल या वर्गातल्या  मुली होत्या. ती शाळा मला खुप आवडली. मी पहिली कविता आठवीत असताना लिहिली- हस्तलिखित नियतकालिकासाठी !

माझी धाकटी बहीण खूप हुषार होती, तिने पहिला नंबर कधीच सोडला नाही. 

आम्ही तीन सख्खी, तीन चुलत भावंडे अशी सहा मुलं, आई आणि आमच्या गावाकडच्या एक काकी आईला सोबत म्हणून आलेल्या. त्या एकट्याच होत्या, पती लवकरच वारले, एकुलत्या एक मुलीचं लग्न झालं होतं, त्यामुळे बरीच वर्षे काकी आमच्याकडेच राहिल्या ! त्या पहाटे उठून बंब पेटवत आणि सगळ्यांच्या आंघोळी होईपर्यंत बंबावर लक्ष देत. त्यांनी आईला स्वयंपाकघरात कधीच मदत केली नाही. त्यांना स्वयंपाक येत नव्हता की करायला आवडत नव्हता माहीत नाही पण तशी ती खूप तडफदार बाई होती. पूर्वी त्या वडनेरहून पिंपरीला घोड्यावर बसून येत. आम्ही त्यांना वडनेरच्या काकी म्हणत असू. माझे आजोबाही जवळपासच्या गावात, शेतावर घोड्यावर बसूनच जात ! ह्या काकी म्हणजे आजोबांच्या चुलतभावाची सून !

आमच्या त्या “भूतबंगला” घरात आम्ही एक वर्ष राहिलो. मला ते घर खूपच आवडायचं. पण आमच्याकडे पहिलवान असलेला वडिलांचा मामेभाऊ आला होता. रात्री झोपेत तो खूप जोरात ओरडला.  आम्ही सगळे जागे झालो, “या घरात भुताटकी आहे, कुणीतरी अज्ञात शक्तिने माझा हात ओढला ” असं तो म्हणाला !

नंतर काही दिवसांनी आम्ही ते घर सोडलं आणि थोडं पुढे भूविकास बँकेशेजारी बरमेचा निवास मधे रहायला गेलो. हे ही घर बरंच मोठं होतं ! सरदार पेठेत तीन घरं बदलल्यानंतर वडिलांनी छत्रपती सोसायटीत बंगला बांधण्यासाठी प्लाॅट विकत घेतला !

शिरूरमध्ये वडिलांची पत प्रतिष्ठा होती. सगळे त्यांना बाजीरावशेठ म्हणत !तीन दुकानात आमची खाती होती आणि तिथून कुठलीही वस्तू आणायची आम्हाला मुभा होती.

शिरूर या शहराला माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. माझी जडणघडण शिरूरमध्येच झाली, शिरूरमध्ये रेडिओ ऐकायचं वेड लागलं, वाचनाची आवड निर्माण झाली. खूप सिनेमा पाहिले. राणी गायकवाड ही खूप जिवाभावाची मैत्रीण मिळाली…. वडनेरच्या काकी, गावाकडून आणलेली कली ही कामवाली पोरगी, जना मोलकरीण या सा-यांना माझ्या आईनं मोठ्या हिकमतीनं सांभाळलं. आई नेहमी आजारी असायची पण रोजचा स्वयंपाक कधीच टाळला नाही, सुगरणच होती ! तिनं आम्हाला खूप आरामशीर सुखवस्तू आयुष्य जगू दिलं !

खंत एकच– शिरूरमधे मला काॅलेज अर्धवट सोडावं लागलं, तो जो “हादरा” मला बसला,, त्यामुळे मी खूप निराशावादी कविता केल्या. 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
3.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

धन्यवाद हेमंत सर ?