सौ. सुनिता गद्रे
मनमंजुषेतून
☆ सिनेमा जिंदाबाद ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
“दादा घरी चला. हा मारुती सुद्धा हिंदीत का बोलतोय ?मला नको असला ‘पवनपुत्र हनुमान’. चला ना दादा.” असं किरकिरणं…. आणि मग नंतर जोर-जोरात रडणं… आणि लोकांचं “अहो काका, त्या पोराला बाहेर घेऊन जा .असं दटावणं…पडद्यावर पिक्चरचा सीन चालू… तर टॉकीजमधे लोकांचं ओरडणं.
“काय कार्टं आहे .मगाशी खुर्चीवर उभं राहून पडद्यावर पडणाऱ्या प्रकाशझोतात हात घालत होतं…आणि आता हे रडणं.” आजूबाजूचे प्रेक्षक जाम वैतागले होते.
शेवटी दादा-आमचे आजोबा माझ्या चुलत भावाला- सुहासला हाताला धरुन ओढत बाहेर घेऊन गेले. डोअरकिपरजवळ स्वतः बसले अन् तो शहाणा बाहेर खिशातनं गोट्या, भोवरा काढून खेळत बसला… मधनंमधनं, खिशात भरलेल्या टॉफ्या,चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे फस्त करत राहिला.
मध्यंतर झालं. आम्ही बाहेर गेलो. आपल्या दोन्ही खिशात, टाइमपास म्हणून आणलेला दादांच्या पिशवीतला चिमणचारा (खादगीचा माल)भरला.. आणि आम्ही दंगा न करता शांतपणे सिनेमा बघू असं दादांना आश्वासन देत, जाता जाता न चुकता सुहासच्या डोक्यावर टपल्या मारत…त्याला रडवत पुन्हा आपल्या सीटवर येऊन बसलो.
ही कित्ती जुनी गोष्ट आहे, जवळजवळ साठ पासष्ठ वर्षापूर्वीची. तेव्हाचा सिनेमा नंतर पिक्चर आणि आता मूव्ही झालाय.
तर तेव्हाची ही कहाणी. आम्ही सांगलीच्या गावभागातील महाबळ वाड्यातील ,जॉइंट फॅमिलीत राहणारी , महाबळांच्या घरातली नवरत्नं …पुरे ,पक्के गावभागी सांगलीकर…. जणू सदाशिवपेठी पुणेकरांची धाकटी भावंडं…एवढी ओळख पुरेशी आहे…
आमच्या घरी आमचे सतरा जणांचे कुटुंब. आजी-आजोबा त्यांची तीन मुले, तीन सुना आणि नऊ नातवंडे. शिवाय पाहुणे- रावळे ,ठराविक वारी जेवायला येणारे माधुकरी- असे भरगच्च कुटुंब .श्राद्धपक्ष, सणवार, उत्सव, व्रतवैकल्ये, उपासतापास यात पूर्णपणे गुरफटून गेलेला एक सुखी समाधानी परिवार.
आम्ही मुलं आजीपासून, तिच्या तापट स्वभावामुळेआणि तिच्या सोवळ्या-ओवळ्यामुळे जरा दूरच असायचो. फक्त जेवणाच्या वेळी आम्ही तिच्या दृष्टीला पडायचो. पण आजोबा- दादांजवळ आम्ही बिंदास….! आमचं घर तसं तेव्हाचं रसिकच म्हणायला पाहिजे. त्या काळात आमच्याकडे ग्रामोफोन होता. एक आजी सोडली तर… काका-काकू आई बाबा सगळ्यांनाच नाटक, सिनेमाची आवड. एक काका गायक (गवई). आजोबा पूर्वीच्या बालगंधर्वांच्या नाटकाचे शौकीन ! त्यामुळे दादांबरोबर मधूनमधून सिनेमाला जाणं हा आम्हा मुलांसाठी आनंदाचा विषय असायचा .आम्हाला दाखवले जाणारे सिनेमे पण पौराणिक ऐतिहासिक असे असायचे. रामराज्य, संपूर्ण रामायण, भूमिकन्या सीता, गजगौरी, मायाबाजार, पवनपुत्र हनुमान, सती अनुसूया, गुरुदक्षिणा, आणि असेच पौराणिक…. तर बाल- शिवाजी, राजा शिवछत्रपती, पावनखिंड, महाराणी येसूबाई, रामशास्त्री प्रभुणे, इत्यादी… ऐतिहासिक ! कथा साधारण माहिती असायची. त्यामुळे तर संवाद कळले काय किंवा नाही कळले काय,आणि सिनेमा हिंदीत असला काय ! काही फरक पडायचा नाही.
पण जेव्हा दादा आम्हाला झनक झनक पायल बाजे, मदर इंडिया, बघायला घेऊन गेले होते, तेव्हा ते सिनेमे आम्हाला समजलेही नाहीत आणि आवडलेही नाहीत.तो नाचणारा माणूस तर अजिबातच आवडला नाही. मदर इंडियातले काही प्रसंग आवडले ,जे गमतीदार होते. इतरही प्रसंग बरेचसे कळले.पण संवादाच्या नावाने ठणठणाटच… आणि त्या रडक्या, धाकट्या सुहासला बरोबर घेऊन जायचे सोडल्यामुळे ‘चिमणचारा’ खात आमचा छान टाईम पास व्हायचा. मेच्या सुट्टीत आत्या आल्या की आणखी पाच जणं पाहुणे मेंबर….. प्रताप किंवा सरस्वती टाकिजला सिनेमा पाहिला की नंतर अमराई चक्कर, हा ठरलेला प्रोग्रॅम. किंवा रेल्वे स्टेशनवर गाडीचे इंजिन पूर्ण वळत असलेले दृश्य पाहून मगच घरी जायचे,हे ठरलेले.
आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा म्हणजे ‘जागृती.’ तो पाहिल्यावर बरेच दिवस आम्ही भारावून गेल्यासारखे जागृतीच्या चर्चेत रमून गेलो होतो. जागृतीनं आम्हाला हसवलं होतं आणि रडवलंही. दादांनी टॉकिजच्या बाहेर मिळणारी त्याच्या गाण्यांची तीन पुस्तके घेऊन दिली होती… आमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागून.!…ते पाठांतराची स्पर्धाही घेणार होते. म्हणून आम्ही त्यातली सगळी गाणी तोंडपाठ केली होती.आओ बच्चो तुम्हे दिखाऊ झाँकी हिंदुस्तान की…. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल… हम लाए है तुफान से कश्ती निकालके..चलो चले माँ…अशी सगळीच. ही स्पर्धा काही झाली नाही. पण तेव्हा तोंडपाठ झालेली गाणी अजूनही लक्षात आहेत.
हळूहळू मोठी होणारी भावंडं ग्रुपमधून बाहेर पडली आणि छोटी छोटी सामील झाली. आम्ही तीन-चार जण मधले, त्यामुळे कायमचे मेंबर.
मोठ्या झालेल्या एका जीनियस भावाने घरातले सामान वापरून एक प्रोजेक्टर तयार केला होता. भिंग एका लाकडी फळ्यांच्या साच्यात बसवून, मधे कोठेतरी फिल्मा ठेवून आणि मागून टॉर्चचा झोत सोडून ,तारेवर घातलेल्या पांढर्याशुभ्र धोतरावर फिल्मांची प्रतिमा म्हणजे आमचा सिनेमा दिसायचा. फिल्म बहुतेक उलट्या ठेवाव्या लागायच्या… खाली डोकं वर पाय… आम्ही कायमचे मेंबर लोक आनंद, जयश्री टॉकीज आवारातील तुटलेल्या फिल्म गोळा करायचं काम करायचो. एक पहिली सर्टिफिकेटवाली फिल्म आणि एक दि एंडची फिल्म… मधे आलटून पालटून पंचवीस-तीस फिल्मांचा आमचा सिनेमा म्हणजे घरातल्या आणि शेजारपाजा-यांच्या कौतुकाचा विषय होता.
हिंदी सिनेमाची गाणी आम्ही आमचे जबरदस्त, भारी शब्द वापरून म्हणायचो. अर्थाशी याचा अर्थातच काही संबंध नसायचा. एकदा तर आमच्या एका चिमुरड्या भावानं माँटेसरीत ऍडमिशन झालेल्या दिवशी बाईंनी गाणं म्हणायला सांगितल्यावर जोरदार आवाजात ,’ हसता हुआ नूरानी चेहरा… म्हणतम्हणत शेवटी…. दिलरूबा,दिलरुबा ऐवजी….जिंदाबाद, जिंदाबादचा हवेत हात उंचावून नारा देत सगळ्या वर्गाला पाच -सहा वेळा जिंदाबाद… जिंदाबाद म्हणायला आणि बाईंना कोपरापासून हात जोडून नमस्कार करायला भाग पाडलं होतं.
जेव्हा मी पाचवीत होते.. तेव्हा आमच्या वडिलांची सांगलीहून बदली झाली… आणि आम्ही बरेच मधले मेंबर दूर झालो….दादा पण थोडे थकले होते ,त्यामुळे आमची सिनेमाची ती गंमत संपुष्टातच आली .पण अजूनही राहिल्यात त्या त्याच्या मनाला गुदगुल्या करणाऱ्या गोड आठवणी—
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खूप सुंदर लेख