श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ कोकणचं पाणी…भाग 2 – श्रुती आगाशे ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

(ही सगळी सज्जन माणसं एकत्र आणून त्यांची सज्जनशक्ती करण्याचं काम संघ गेली जवळपास ९०हून अधिक वर्ष करत आहे ! ) इथून पुढे —

किट्स बनवण्याव्यतिरिक्त, सर्व्हे, सामानाचे वितरण अशा कामांचा अनुभवही या चार दिवसांत आम्हाला मिळाला. कल्याणहून निघण्याच्या आदल्या दिवशी तिथल्या भटक्या प्राण्यांसाठीही काहीतरी करायला हवं  असा विचार मनात आला. दुसऱ्या दिवशी प्राण्यांच्या डॉक्टरची भेट घेऊन पूरानंतर प्राण्यांना होणाऱ्या आजारांविषयी आणि त्यांना देण्याच्या औषधानाविषयी समजून घेतलं आणि एक box भरून औषधं बरोबर घेऊन गेले. या क्षेत्रात थोडासा अनुभव असल्याने आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास होता. चिपळूणला गेल्यावर पहिल्या दिवशीच्या अहवाल बैठकीत हा विषय सांगितला आणि ४ दिवसांत एकूण ९ भटक्या, पाळीव कुत्र्यांना जुलाब, fungal infection यासाठीची treatment-औषधं देऊ शकले. त्यांच्यातील सगळेच पूर्ण बरे झाल्याचे अजून कळलेले नाही, पण काही कुत्रे बरे होत असल्याचे कळले आहे. इतक्या मोठ्या संकटात भटके प्राणी ही आपली शेवटची priority असते, पण आपल्या अनुभवाचा सेवकार्यात उपयोग होत असेल तर ५ दिवसांत ते काम पूर्ण करून यावं असं वाटलं म्हणून परिस्थिती सावरण्याचा आणखी एक लहानसा प्रयत्न केला.

पुराने कोकणची भयंकर अवस्था केली आहे. माणसाचं घर वाहून जातं म्हणजे काय? घर वाहून जाणे हा विचारच किती भीतीदायक वाटतो ! २४ तासांत घरातल्या तीन भिंती कोसळून एकंच भिंत शिल्लक राहते याहून मोठं संकट काय असू शकतं एखाद्यावर? तिथल्या स्थानिक स्वयंसेवकांनी आम्हाला त्यांचे अनुभव सांगितले. दररोज संध्याकाळी एक अहवाल बैठक व्हायची. त्या बैठकीत बसलेला प्रत्येक जण मनाने आणि शरीराने पूर्ण थकलेला असायचा. पण बैठकीच्या सुरुवातीला म्हटलेल्या गीताने मनातली विषण्णता जाऊन पुन्हा उमेद निर्माण व्हायची आणि हे केवळ वर्णनाचे शब्द नाहीत हा खरा अनुभव आहे. अहवाल बैठक ही सर्वांत महत्त्वाची बैठक होती माझ्यासाठी या ४ दिवसांत! वेगवेगळ्या विभागातील कामांचे निवेदन आणि अनुभव यांत आम्ही सांगायचो. स्वयंसेवकांनी सांगितलेले अनुभव ऐकून अनेकदा अश्रू अनावर व्हायचे ! पैसे मिळतील या आशेने साफसफाई करण्यासाठी आलेली गडी माणसं परिस्थिती पाहून सेवाकार्याला लागतात, दिलेल्या किटमधली फक्त मेणबत्ती काढून घेत एक पूरग्रस्त त्याला फक्त मेणबत्तीचीच गरज असल्याचे सांगत बाकीचे किट परत करतो, अख्खा संसार वाहून गेलेला असताना दान म्हणून मिळालेल्या किटमध्ये सोन्याचं कानातलं सापडलं म्हणून दुसऱ्या दिवशी ते कानातलं एका स्वयंसेवकाकडे परत करणारी, स्वतःचं घर अर्ध पाण्याखाली जाऊन नुकसान झालेलं असताना माझ्यापेक्षा ज्यांची घरं पूर्ण पाण्याखाली आहेत त्यांच्यावरचं संकट मोठं आहे असं म्हणत मदतीला धावून जाणाऱ्या माणसांबद्दल ऐकून हृदय गदगदून यायचं. ही सगळी माणसं नक्कीच विश्वकर्त्याने घेतलेल्या परीक्षेत पास झालेली माणसं आहेत असं वाटायचं.

या सगळ्यांत आमची निवासाची व्यवस्था शाळेतच असेल असं गृहीत धरून आम्ही तशा तयारीनिशी गेलो होतो. पण, God surprises us too!

आमची राहण्याची व्यवस्था अथर्व वैशंपायन या एका स्वयंसेवकाच्या घरी केली होती. त्यांचं आख्खं कुटुंब मागचे ५ दिवस या कार्यात सक्रीय होतं. आम्ही सगळे एकत्रच रात्री घरी जायचो. घरी गेल्यावर कोकणातल्या माणसांचा खरा गोडवा आम्हाला अनुभवायला मिळाला. थकून भागून स्वतःच्या घरी आल्यावर जसं ‘हुश्श !’ वाटतं, तसंच्या तसं आम्हाला रात्री त्यांच्या घरी गेल्यावर वाटायचं, इतका जिव्हाळा देणारी माणसं आम्हाला लाभली. अथर्वची बायको आणि आता आमची मैत्रीण जाई, रात्री १०-१०:३० वाजता आलं घालून कडक चहा करायची ! कोकणातली माणसं without any regret कधीही चहा पिऊ शकतात हा बाहेरून पाहताना किती आनंदाचा विषय वाटतो ! जाईच्या चहाने दिवसभराच्या कामाचा शीण खरोखर निघून जायचा. मग गप्पा, इकडच्या तिकडच्या ओळखी, वेगवेगळे विषय या सगळ्याने दिवसभर पाहिलेली आणि ऐकलेली चित्तविदारक चित्र शांत होऊन गाढ झोप लागायची. 

शेवटच्या दिवशी संध्याकाळी काही मोकळा वेळ मिळाला. काम करून अक्षरशः पायाचे आणि पाठीचे तुकडे पडले होते. पण, प्राजक्तामावशीने आम्हाला पूर्वांचलच्या मुलींच्या वसतिगृहात जाण्याबद्दल विचारलं. आम्ही सहज नाही म्हणू शकलो असतो. पण संघकामातलं spirit च वेगळं आहे. आम्ही गेलो त्यांना भेटायला ! ‘मनाचे सौंदर्य हेच खरे सौंदर्य’ हा सुविचार म्हणजे त्या मुली ! त्याचं हास्य, त्यातील निरागसपणा, त्यांची स्वागत करण्याची पध्दत ह्या सगळ्यामुळे त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांना पाहूनच थकवा भरून निघाला !  ह्या मुलीही आपल्याच समाजाचा भाग आहेत आणि ह्या इतक्या सुंदर व्यक्ती आपल्या देशात राहतात ही जाणीव खूप आनंददायी वाटली. हे वसतिगृह का आहे, इथे पूर्वांचलातील मुली का राहतात, या आणि संघाच्या अशा अनेक प्रकल्पांविषयी जाणून घेण्यासाठी संघ आतून अनुभवावा लागेल.

या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकृतीची, स्वभावाची माणसं दिसली, भेटली. ह्या संकटातून कोकण नक्की सावरेल. समुद्र मुंबईतही आहे, नद्या भारतभर आहेत, पण उध्वस्त करणारं आणि नंतर तितक्याच जिव्हाळ्याने सर्वांना सावरणारं कोकणचं पाणी खरंच वेगळं आहे !

समाप्त

लेखिका : -श्रुती आगाशे.

संग्राहक : – सुहास सोहोनी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments