प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? मनमंजुषेतून ?

☆ माझ्या गावातल्या माणसातला माणूस – म्हादा..! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

आजही गावी गेलो की म्हादा कुठं ना कुठं भेटतोच. आपल्याच नादात आपल्याशीच बोलत फिरणारा म्हादा गावभर लहानथोरापासून सगळ्यांच्याच ओळखीचा. रंगानं काळासावळा, 

किरकोळ शरीरयष्टी, चेहऱ्यावर साजेशी तेवढीच पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर कितीतरी एकावर एक घातलेल्या टोप्या आणि त्या टोप्यांवर टॉवेलवर टॉवेल गुंडाळून स्वतःची अशी वेगळी ओळख बनून गेलेला म्हादा. अंगात लांब हाती मळकट सदरा, खांदयावर तीन ते चार प्रकारचे टॉवेल,  सदऱ्याच्या आत कधी रंगीत कधी पांढरे बनियन किंवा टी -शर्ट, कमरेला सदैव हाफ पँट आणि पायात झिजलेल्या स्लिपरी–असा सदैव जुन्यार नेसूनच मळकटलेला व भरकटलेला म्हादा…..!

माझ्या लहानपणापासून हा म्हादा मला जसा आहे, तसाच आजही दिसणारा. आता वयानं जरासा थकलेला. म्हादाच्याजवळ कुणी कुणी दिलेले नवे कपडे आणि त्या नव्या कोऱ्या कपड्यांच्या त्यानेच केलेल्या चिंध्या. लोकांनी कितीही नवे कपडे दिले तरी म्हादा जुने कपडेच घालतो. सोबत पाच सहा कपड्यांना घेऊन म्हादा अनेक ठिकाणी भटकताना नेहमीच दिसतो. अगदी मायाक्का- चिचणीपर्यंत पायी चालत जाणारा म्हादा कधी आजूबाजूची गावेही फिरून येतो. असा वणवण भटकणारा म्हादा कधी कुणाच्या शेतात जळण काटूक वेचताना, कधी कुणाच्या घराच्या अंगणातला कचरा गोळा करतानाही भेटतो. असं गोळा केलेले जळण कुणाच्याही घरी देतो, कुणाचे अंगण स्वच्छ करतो आणि मगच पोटाला भाकरी मागून घेतो. “कुणाचं फुकट नगं ” म्हणत हसत हसत कष्टाची शिकवण देत राहणारा म्हादा मला नेहमीच भावून जातो. काही तरी काम करून मगच भाकरी मागून पोट भरणारा म्हादा मला शहाण्याहून शहाणा वाटतो……!

कुणी भेटलं तर एखादा नवा टॉवेल, एखादी नवी टोपी किंवा चहासाठी पाच दहा रुपये मागणाऱ्या म्हादाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या निरागसतेला पाहून म्हादा विसरता म्हणता विसरता येत नाही….! दिवसभर फिरणारा म्हादा, रात्री शाळेला किंवा देवळाला आपलंसं करून बडबडत कधी झोपतो ते कळतच नाही.

मी माझ्या लहानपणापासून म्हादाला असाच पहात आलोय. सर्वांशी कधी चांगलं तर कधी फटकळ बोलणारा म्हादा आता थकलाय. त्याच्या सोबत आता त्याची काठी असते. म्हादा भटकत असताना कुत्री अंगावर धावून जातात, पण म्हादा आपला बडबडत त्यांना काठीनं हाकलत जणू त्यांच्याशीच गप्पा मारत असतो.

म्हादा गावातल्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला सुद्धा हजर असतो. तिथली झाडलोट करून निवद आणि फळं खाताना म्हादाला काहीच वाटत नाही. गावात एखादा कार्यक्रम असला की म्हादा जेवणाची अपेक्षा ठेवून तिथे जात असतो. पंगतीच्या बाजूलाच दूरवर बसून जेवतो. वरातीत मनसोक्त नाचून घेतो. कुणी त्याला खेकसतं, कुणी त्याची टिंगल टवाळी करतं. म्हादा पण “ए लसूण गड्डया ” म्हणत त्याच्याच तालात मग्न असतो. अगदी मनसोक्त उड्या मारत नाचणारा म्हादा इतरांनाही नाचवत राहतो. म्हादा ज्याला भेटतो त्याला नवा टावेल किंवा टोपी मागत राहतो. पण नवे कपडे त्याच्याजवळ काही वेळच असतात. म्हादा नवं कापड फाडून कधी चिंध्या करेल सांगता येत नाही.ज्यानं एखादं नवं कापड दिलं ते गावभर दाखवत म्हादा सर्वांना सांगत सुटतो.

परवा म्हादा सहजच भेटला. मरीआईच्या देवळाच्या कट्टयावर कापडांची जोडतोड करत बडबडत बसलेला. त्यानं माझ्याकडं बघून ” कवा आलासा ” म्हणाला. त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या. बोलत बोलत त्याच्यातल्या म्हादाला शोधत राहिलो. जाता जाता म्हणाला ” व्हय नवा टावेल असल तर बघा की, देताय नव्हं ,मी येतु की घरी.” आणि असं बरंच काही बडबडत राहिला. स्वतःलाच सांगत राहिला. त्याचा एक फोटो घ्यावासा वाटला. बोलत बोलत फोटो घेत असतानाच “व्हय व तेवढा नवा टावेल द्या की बाकी काय नगं ” पुन्हा पुन्हा असं बडबडत राहिला..!

असा सदैव भटकत आणि पोटासाठी जेवढं हवं तेवढच मागणाऱ्या माझ्या गावच्या म्हादानं त्याच्या अस्तित्वाचं नाव अजून तरी राखून ठेवलय. ” मी काय येडा हाय का व्हय ” म्हणणारा म्हादा माझ्या गावातल्या माणसातलाच माणूस म्हणून मला नेहमीच असा भेटत राहतो……..!

(” माणसातली माणसं ” या माझ्या आगामी पुस्तकातील एक पान )

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments