श्री उदय गोपीनाथ पोवळे
मनमंजुषेतून
☆ एकटेपणा: एक अतिज्येष्ठ नागरिक – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
नमस्कार ……
मी ऍडव्होकेट ……….. जाऊ दे. नाव लिहिणार होतो पण नको. माझे नाव तसे प्रसिद्ध नाही आणि ते सांगून तसा काही फरकही पडणार नाही. पण माझे वय सांगतो. गेल्या महिन्यात ८६ पूर्ण झाले. माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनप्रवासाची गाथा आज तुमच्यासमोर थोडक्यात मांडतो. मला माहित आहे तुम्हाला वाटणार, हा म्हातारा आता आपलं रडगाणं गाणार. पण तसे नाही. मी जरा आजकालची परिस्थिती काय आहे त्याची जाणीव तुम्हाला करून देणार आहे.
शालेय जीवनात खूप नसलो तरी हुशार मुलगा अशी गणती होत होती. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय तरी व्यवस्थित असल्याने कुठच्याही संघर्षाशिवाय कॉलेज शिक्षण पूर्ण केले आणि पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण करून एका नावाजलेल्या कंपनीत मी नोकरीला लागलो. चांगला पगार असल्याने घरून लग्नाची घाई होत होती. पण मला अजून काही कायद्याचे शिक्षण घ्यायचे असल्याने ते लांबणीवर टाकले. तरुणपणीचा उत्साह मला खूप काही शिकायला उद्युक्त करत होता आणि त्यात मला सफलताही मिळत गेली. पैशाचे गणित खूप सोप्पे होत गेले. आणि वयाच्या ३२ व्या वर्षी लग्न आणि पुढच्या चार वर्षात दोन वर्षाच्या अंतराने एक कन्यारत्न आणि एका पुत्ररत्नाचाही लाभ झाला. त्याचवर्षी ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमध्ये मी एक प्लॉट घेऊन छानसा टुमदार बंगलाही बांधला. आयुष्य खरेच व्यवस्थित आखीव आणि रेखीव चालले होते. ‘ हम दो हमारे दो ‘ ह्या तेव्हाच्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आयुष्य खरंच मस्त चालले होते.
दोन्ही मुलांचे शालेय शिक्षण व्यवस्थित चालले होते. काही वर्षांनी मी चांगली नोकरी सोडून कोर्ट केसेस घेऊन कोर्टात जायला सुरवात केली. त्यातही मला चांगले यश मिळत गेले आणि थोड्याच दिवसात ठाण्यातील नामांकित वकिलांमध्ये माझी गणती झाली. मुलाला इंजिनिअर होऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत शिकायला जायचे होते. आणि त्याला माझा दुजोरा असल्याने, त्यादृष्टीने त्याच्या शिक्षणाची वाटचाल झाली आणि तो अमेरिकेत गेला. मुलीचे शिक्षण पुरे होऊन तिने तिच्या कॉलेजमधला सुसंस्कृत असा मुलगा तिचा जीवनसाथी म्हणून निवडला आणि त्याला आमची हरकत घेण्याचे काही कारण नसल्याने ती लग्न होऊन तिच्या सासरी गेली.
मुलगा अमेरिकेत शिकून तिथेच नोकरीला लागला. तिथेच त्याला महाराष्ट्रीयन डॉक्टर मुलगी मैत्रीण मिळाली. मुंबईत येऊन त्याचेही तिच्याशी लग्न पार पडले आणि दोघांच्याही व्यस्त व्यावसायिक कार्यक्रमानुसार त्यांना लगेच परत अमेरिकेत जावे लागले. वयाच्या साठीपर्यंत सगळे कसे मस्त चालले असतांना, अचानक छोट्याश्या आजाराने माझी बायको देवाघरी गेली. आता त्या मोठ्या बंगल्यात मी एकटा रहात होतो. माझे वकिलीचे ऑफिसही बंगल्यातच थाटले होते. एकटा असल्याने पूर्णवेळ मी वकिलीच्या व्यवसायात स्वतःला झोकून दिले होते आणि त्यामुळे पैसाही मला चांगला मिळत होता. पैशाचे व्यवस्थित नियोजन करून त्याची गुंतवणूक करणे चालू होते. सुरवातीला दोन वर्षातून एकदा तीन महिन्यांसाठी माझे अमेरिकेला मुलाकडे जाणे होत होते. पहिल्या एक दोन ट्रिपला मला बरे वाटले. मुलगा आणि सुनेने रजा घेऊन अमेरिकेचा काही भाग दाखविला. दोन ते तीन ट्रिपपर्यंत दोन लहान नातवंडांबरोबर वेळ चांगला जात होता. पण नंतर मला तिकडे बोलायला कोणी मिळत नसल्याने कंटाळा येऊ लागला. मुलगा आणि सून मध्ये एकदा त्यांच्या दोन लहान मुलांना घेऊन ठाण्याला घरी आले होते. पण माझी दोन्ही नातवंडे ठाण्यातल्या बंगल्यात आले रे आले की आजारी पडत. असे दोनदा झाल्यावर ते कधी भारतात आले, की एक तर सूनबाईच्या माहेरी दादरला किंवा ठाण्यातल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये रहायला जाऊ लागले. एकंदरीत काय तर मुलगा, सून आणि नातवंडे ह्यांना माझ्याकडे रहाता येत नसे, तर मला अमेरिकेत त्यांच्याकडे राहणे आवडत नसे.
मुलगा प्रेमाने, हट्टाने, जबरदस्तीने तिकीट पाठवायचा म्हणून मी परत एकदा अमेरिकेला त्याच्याकडे गेलो होतो. पण ते दोघे कामाला गेल्यावर घरात मी एकटा. काय करायचे ते कळेना. नातवंडांनाही माझा लळा नसल्याने तेही माझ्याशी जास्त बोलायला येत नसत. मी स्वतःच काही तरी वेळ घालवायचा म्हणून तिकडच्या कोर्टात जाऊन बसू लागलो. पण कोर्टही घरापासून लांब होते आणि तिथे आपल्यासारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने रोज जाणे काही जमत नसे. त्यावर्षी तीन महिने रहायला गेलेला मी कंटाळून एका महिन्यातच परत आलो.
सूनबाई डॉक्टर असल्याने माझ्या आहे त्या बंगल्यात तिच्यासाठी दोन मजल्यांचे हॉस्पिटल बांधून द्यायची माझी तयारी होती. पण माझ्या नातवंडांच्या तब्येतीचा प्रश्न आणि मुलाला, त्याला आत्ता जशी चांगली गलेलट्ठ पगाराची नोकरी आहे तशी काही मुंबईत मिळणार नाही ह्या कारणाने, तो प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागला.
क्रमशः …
– एक अति ज्येष्ठ नागरिक
शब्दांकन —श्री उदय गोपीनाथ पोवळे
मो. नं. ९८९२९५७००५.
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈