सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
मनमंजुषेतून
☆ आठवणींचा कलश ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आयुष्य जसं वाढतंय तसतसा हा आठवणींचा कलश भरत चाललाय ! मला तर पाण्याच्या रांजणात खडे टाकणाऱ्या कावळ्याच्या गोष्टीची आठवण येते ! रोजचा प्रत्येक क्षण आपण जगतो आणि ते क्षणरत्न या कलशात जमा होते ! काही अनमोल क्षणांची रत्ने त्या कलशात साठून राहतात ! माझ्या मनाच्या अवकाशात त्यातील काही प्रसंग कायमचे चितारलेले राहिले आहेत. तसाच हाही एक प्रसंग मनात अनमोल म्हणून राहिला आहे ! जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्या क्षणाला !
माहेर आणि तिथली माणसं- आई -वडील, भाऊ- बहिणी नेहमीच आपल्याला जवळचे असतात. सुखदुःखात काळजी घेणारे, साथ सोबत करणारे ! लग्न होईपर्यंत आपण त्या कुटुंबाचे घटक असतो, पण लग्नानंतर स्त्रीचे विश्व बदलते. आई चे घर ‘ माहेर ‘ बनते. विसावा देणारे ! आज मला माझ्या पाठीराख्या भावाची आठवण येतेय !
पहिले बाळंतपण माहेरी, या प्रघाताप्रमाणे माझं पहिलं बाळंतपण आईकडे पार पडले. दोनच वर्षांनी पुन्हा अपत्याची चाहूल लागली आणि यावेळेस आपल्याच घरी बाळंतपण करुया असं ठरलं ! सासुबाई आणि आई आलटून पालटून मदतीला येणार होत्या. पण आपण ठरवतो तसं होतंच असे नाही. खरं तर आपल्या ठरवण्यापेक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार गोष्टी घडत असतात ! तसंच झालं ! मला नववा महिना लागला आणि अचानक ह्यांच्या बदलीची ऑर्डर आली ! आम्हाला एकदम प्रश्नच पडला ! आता ह्यांना हजर व्हावे लागणार, तसेच लवकरच क्वाॅर्टरही सोडावा लागणार ! डिलिव्हरी तर अगदी जवळ आलेली काय करायचं? असा प्रश्न पडला. मोठा प्रवास करणे शक्यच नव्हते. बदलीचे गाव लांब होते. तसेच तिथे क्वार्टरही लगेच मिळणार नव्हता. पण देवालाच काळजी ! दिवाळी जवळ आली होती. भाऊबीजेला भाऊ आला होता. त्याचदरम्यान या बदलीच्या गोष्टी झाल्या ! तेव्हा त्याने एका क्षणात प्रश्न सोडवला ! तू माझ्याकडे फलटणला ये बाळंतपणाला ! काहीच प्रश्न नाही. त्याची छोटी मुलगी आणि वहिनीची नोकरी यामुळे आई तिथेच होती. मोठ्या वहिनींचे बाळंतपणही नुकतेच तिथे झाले होते. दोन महिने झाले होते आणि ती आता माहेरी जाणार होती. त्यामुळे भाऊ म्हणाला, ‘अगं, तिथं बाळंतपणाचा सगळा सेटअप आहे, तेव्हा तू तिथंच ये !’ त्याच्या या सांगण्यामुळे आम्ही निर्धास्त झालो. मन भरून आलं ! याहून भावाची भाऊबीज ती कोणती !
तीन चार तासाचा प्रवास होता, पण रस्ता अगदीच खडबडीत ! ह्यांच्या एका डॉक्टर मित्राच्या सहकार्याने आम्ही भावाकडे पोहोचलो. त्यानंतर अक्षरशः आठवड्याच्या आतच माझी डिलिव्हरी झाली. इतक्या अवघडलेल्या अवस्थेत मी तिथे गेले होते ! पण आई, भाऊ, वहिनी सर्वांनी माझी बडदास्त ठेवली ! बाळंतपण पार पडले. तिथून आम्ही दोनच महिन्यात पुणे मार्गे शिरपूरला , बदलीच्या गावी जाणार होतो. आई पोचवायला येणार होती. माझा पहिला मुलगा जेमतेम दोन सव्वा दोन वर्षाचा आणि छोटं बाळ दोन महिन्याचं ! तेव्हा स्पेशल गाडी करणे हा प्रकार नव्हता. आमच्याबरोबर भाऊ फलटण ते पुणे आला. आम्ही रात्रीच्या गाडीने निघणार होतो. दोन लहान मुले आणि खूप सारे सामान घेऊन आम्ही दोघी कशा जाणार? असा भावाला प्रश्न पडला. त्याने लगेच निर्णय घेतला. दोन दिवसाची सुट्टी घेतली आणि केवळ आमच्यासाठी, बहीण आणि भाचरे यांच्या काळजीने तो शिरपूरला पोचवायला आला.
आम्हाला तिथे सुखरूप पोहोचवून लगेच त्याच रात्रीच्या गाडीने तो परत पुण्याला आला ! तिथून फलटण आणि लगेच ऑफिस जॉईन केले ! आता मुलीने चाळीशी ओलांडली! खूप वर्षे गेली, पण तिच्या वेळचे बाळंतपण आठवलं की ते सर्व क्षण आठवणींच्या कलशातून बाहेर उचंबळून येतात ! अशा मौक्तिक क्षणांच्या आधारावरच तर नाती टिकून राहतात ! आता निवांत आयुष्याचा हा खेळ अनुभवत असताना त्या आठवणींच्या क्षणांची रत्ने पहात राहते मी ! त्या क्षणांनी आपले आयुष्य किती समृद्ध केले आहे ते जाणवत राहतं ! हा कलश आपले जेवढे आयुष्य आहे तोपर्यंत अशा *क्षण- रत्नांनी *भरत राहणार आहे, आणि त्या रत्नक्षणांची आठवण मनाच्या तळात कायमच राहील हे मात्र नक्की!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈