सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग दुसरा… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(‘तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या कुबड्या घ्याव्या लागतात’.) — इथून पुढे —– 

वस्तू जागच्या जागी हव्यात, अंधारातही हात घातला तर ती वस्तू तिथेच सापडली पाहिजे ‘ हे  बरोबरच आहे. पण कधी कधी पसाराही हवासा वाटायला लागला आहे. नाही, खरंतर कधीतरी आळस करणंही ठीक आहे हे पटायला लागलंय. 

ज्यांच्यावर जिवापलीकडे प्रेम केलं, आपल्या गरजा बाजूला ठेऊन, स्वतः पलिकडे जाऊन ज्यांच्यासाठी केलं ती माणसं आपली आठवणही काढत नाहीत हे बघून पूर्वी त्रास व्हायचा. नंतर नंतर बाबांच्या ‘ करावं आणि रस्त्यावर ठेवावं. नाही तर घेणाऱ्याच्या डोळ्यातली लाचारी आपला अहंकार फुलवते ‘ या वाक्याचा अर्थ कळला. खरंच आपण आदर, सन्मानाच्या आधीन होत जातो, demanding होत जातो. मग तो नाही मिळाला की त्रास होतो. आता सत्पात्री दानाबरोबरच गुप्त दानाचा अर्थ आणि त्यातला निरपेक्ष आनंदही कळलाय. कारण मदत आपण दिलीये हे नकळता मदत मिळाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या डोळ्यात आपली मदत घ्यावी लागल्याची लाचारी दिसत नाही. 

मी सहसा कुठल्याही भौतिक सुखात अडकणारी नाही. सकाळीच काय कित्येक दिवस चहा कॉफी नाही मिळाली तरी माझं डोकं दुखत नाही. हौसेनी जमवलेल्या क्रोकरी सेटमधलं काही फुटलं तरी समोरच्याला लागलं नाही न हे मला कायमच महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. असं कितीतरी. 

पण तीन मोह मात्र अजून सुटता सुटत नाहियेत. भाजी, क्रोकरी आणि पुस्तकं हे माझे weak points. कपड़े, दागिन्यांच्या दुकानात न्या, सहसा फरक नाही पडत. पण साठी झाली तरीही एकटी असून भाजीचा, घरात जागा नसूनही क्रोकरीचा आणि हातात मोबाईल असला तरी पुस्तकांचा नाद काही सुटता सुटत नाहिये. तो तेवढा कसा सोडवावा हे कळत नाहीये, खरं तर सोडावासा वाटत नाहीये. कारण तो निरुपद्रवी आहे. असो. ते एक माझ्या माणूस असण्याचं, जिवंतपणाचं लक्षणच समजू या. थोडक्यात स्वतः पलिकडे जाऊन दुसऱ्याला प्लीज करण्याच्या अट्टाहासातला फोलपणा लक्षात आला आहे. 

वादातला निरर्थकपणा लक्षात आलाय. कलेतल्या स्वानंदधनाचा ठेवा सापडलाय. त्यामुळे लोकं ज्या वयात हातातून सगळं निसटतंय म्हणून खंतावतात, त्या वयात मी आनंदी आहे. 

हे सगळं अंगी बाणताना त्रास झाला, हो झालाच. पण आज मागे वळून बघताना समाधान वाटतंय. कारण त्यानी मला जसं निर्माण केलंय त्या माझ्या अस्तित्वाशी मी प्रामाणिक आहे.  एवढंच नव्हे तर तर वेळोवेळी त्यात चांगल्या गोष्टींची भर घालत स्वतःला समृध्द करत जगतेय. उठसूट त्याच्याकडे मागण्या, तक्रारी घेऊन जात नाही. पण त्याला ‘Thank you’ म्हणायला मात्र कधीच विसरत नाही. 

आता निवृत्ती घेतेय म्हणजे सगळ्यातून संन्यास घेणार का? तर तसं मुळीच नाहीये. उलट काही बंधनं शिथिल करून मजेत आयुष्य जगणार आहे . गेली कित्येक वर्षं बंद केलेलं socialization परत सुरू केलंच आहे, ते वाढवणार आहे . ( पण कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतः पलिकडे जाऊन मदत करणार नाही ). मग टपरीवर वडापाव खाणं असो की five star मधे जाणं असो, की आप्त इष्ट जमवून, गप्पा छाटत, midnight snacks, चहा कॉफी घेत रात्रभर धमाल करणं असो.

कोणी सांगितलं. याच्याशी बोलू नको, अमुक करू नको, तर म्हणेन, तू सांगितलंस म्हणून बोलीन किंवा नाही बोलणार; करीन किंवा नाही करणार असं काहीही होणार नाहीये. कारण दोन्ही प्रकारात मी कुठे असेन? तुलाच किंमत दिल्यासारखं होईल. मला वाटेल तिथपर्यंत बोलीन, करीन, मला वाटलं की थांबीन.

तसंच, कोणाचा गैरसमज झालाय असं दिसलं तर २-३ वेळा स्वतःहून बोलायचा प्रयत्न करीन. त्यानंतर ‘Leave it, Forget it’.  मी कोणाला emotional blackmail केलं नाही, आणि आता मीही होणार नाही. अपना फंडा तो भई ‘ Live, and Let Live ‘. ‘ Enjoy and let Enjoy ‘ वाला है —–

समाप्त.

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

खूप सुंदर…..बीना..विचार आवडले