सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
रोजच्यासारखीच मी बँकेत जायला निघाले होते. आदल्या दिवशी पित्ताचा प्रचंड त्रास झाल्याने खूप अशक्तपणा
जाणवत होता. पण किल्ल्यांची जबाबदारी असल्याने जाणे भागच होते. म्हणून टूव्हीलर ऐवजी रिक्षाने निघाले होते. एक दीड कि. मि. गेले असेन, आणि अचानक मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. छाती जड झाली. कुणीतरी बरगड्यांची घट्ट मोळी बांधत आहे असं वाटायला लागलं. जीवाची घालमेल व्हायला लागली.
नकळत मी रिक्षाच्या सीटवरच आडवी झाले… परत उठत होते ..झोपत होते. माशासारखी तडफड व्हायला लागली. रिक्षा वाला पार घाबरून गेला. “परत” घरी सोडतो म्हणाला. पण परत जाईपर्यंत मी मरेन असं मला आतून तीव्रपणे जाणवत होतं. पुढे वाटेत एक नामांकित हॉस्पिटल असल्याचं आठवलं.
‘तिथे घेऊन चला’ म्हटल्यावर ‘रस्ता माहिती नाही’ म्हणत तोच रडवेला झाला. मग मीच कसातरी रस्ता दाखवला.
तिथे पोहोचताच तिथल्या मोठ्या लॉबीतून कशीबशी चालत मी रिसेप्शनपाशी गेले. तिथली मुलगी फोनवर बोलण्यात इतकी गुंग होती की तिने माझ्याकडे बघितलेही नाही. आता आधार घेत उभे राहणेही अशक्य होत होतं.
समोर एक स्ट्रेचर ट्रॉली दिसताच मी कशीतरी जाऊन त्यावर झोपले. काही मिनिटे मी तिथेच तडफडत पडले होते. तिथून चाललेल्या वयस्करशा दोन ‘ मावशींनी’ मला पाहिलं आणि पटकन ती ट्रॉली ढकलत मला आत कुठेतरी नेऊन ठेवलं.
शिकाऊ दिसणारे दोन तीन डॉक्टर्स तिथे बसलेले होते. वॉर्डबॉयने मला तिथल्या टेबलवर झोपवलं. माझी तळमळ जास्त वाढली होती. मग एक एक करत तिथला प्रत्येक जण घरचा, बँकेचा फोन नंबर विचारायला लागला.
‘आधी काहीतरी इलाज करा‘
असं शेवटी मी ओरडले, तेव्हा ऑक्सिजन मास्क लावला गेला यात किती वेळ गेला कोण जाणे. मग आमचे मॅनेजर सर्वात आधी तिथे पोहोचले.
कुठल्याशा फॉर्मवर त्यांनी सही केली, आणि ” काळजी करू नका” एवढेच बोलून, किल्ल्या घेऊन ते निघूनही गेले. पुन्हा मी सोडून सगळे शांत … एव्हाना माझा घसा आवळल्यासारखा व्हायला लागला होता. छाती-पाठ- मान गळच प्रचंड दुखत होतं. शुद्ध हरपेल असं वाटत होतं. मग त्यांनी मला एक इंजेक्षन दिलं, आणि स्ट्रेचर-ट्रॉलीवर झोपवून लिफ्टमध्ये नेले. लिफ्टमध्ये मला माझी बहीण दिसली आणि माझी शुद्ध पूर्ण हरपली.
संध्याकाळी कधीतरी मी शुद्धीवर आले….आणि सकाळपासून घडलेला एक एक प्रसंग मला आठवायला लागला. प्रत्येक प्रसंगात, माझं आयुष्य संपवायला आलेला काळ जाणवायला लागला.
पण तरी अजून मी जिवंत कशी काय होते?….. मग हळूहळू लक्षात यायला लागलं की…… काळ आला होता हे तर १००% सत्य होतं, कारण त्या अवस्थेत ते मला क्षणाक्षणाला जाणवत होतं. पण वेळ? ती नक्कीच आली नसावी. कारण ती आली असती ,तर त्याही अवस्थेत हॉस्पिटलमध्ये जाण्याची अंतः प्रेरणा श्री स्वामींनी मला दिलीच नसती. रिक्षावाला मला वाटेतच उतरवू शकला असता.
त्या दोन मावश्यांना माझ्याकडे लक्ष द्यावं असं वाटलं नसतं. जे एक अत्यावश्यक इंजेक्शन तेव्हा मला दिलं लं, ते केमिस्टकडून आणायला माझ्याबरोबर कुणीच नव्हतं हे लक्षात येताच तिथला वॉर्ड – बॉयरुपी देवमाणूस ट्कन जाऊन, त्या इंजेक्शनचे ४००० रू स्वतःच्या नावावर लिहायला सांगून, ते घेऊन आला नसता. अर्थात हे मला नंतर कळलं होतं……. आणि या सगळ्यांनी मिळून, काळ बरोबरच घेऊन आलेल्या त्या वेळेला भक्कमपणे अडवून गदी वेळीच परतून लावलं होतं, म्हणून मी जिवंत राहिले होते…..त्या सर्वांची मी आजन्म ऋणी आहे.
दुसऱ्या दिवशी डॉक्टर तपासायला आले तेव्हा अगदी गंभीरपणे म्हणाले की” अजून अर्धा तास उशीर झाला असता तर यांचं काही खरं नव्हतं”……. आणि त्यांच्या त्या बोलण्याने मला मात्र तेव्हा नकळतच हसू आलं होतं.
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे ४११०३७.
मोबाईल: ९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈