श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ मनमंजुषेतून ☆ एक अविस्मरणीय अनुभव ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
अविस्मरणीय प्रसंग –
हा प्रसंग आहे, नवसाक्षरांच्या मूल्यमापनाच्या समितीत मी होते आणि नवसाक्षरांचं म्हणजे प्रौढांच्या शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन करत होते, तेव्हाचा. बहुदा 1994 हे वर्ष असावे.
मीरजेच्या वेगवेगळ्या भागात मूल्यमापनासाठी आम्ही जायचो. हे वर्ग संध्याकाळी भरायचे. मूल्यमापनाचे काम रात्री करावे लागे. समितीत आम्ही 8-10 जण होतो. शिक्षण विभागाची जीप साध्याकाळी सर्वांना घेऊन जाई. प्रत्येकाला एकेका गावात उतरवत. शेवटच्या गावात तासभर जीप थांबे व क्रमाक्रमाने सगळ्यांना घेऊन येई व घरोघरी पोचवलं जाई.
त्या दिवशी मिरज तालुक्याच्या पूर्व भागात आमचेमूल्यमापन होते. मी ठरलेल्या ठिकाणी उतरले. अरग, बेडगच्या पुढचं गाव होतं. गावात समितीचीच्या सदस्यांना सहकार्य करण्यासाठी सरकारी आदेश दिलेले होते. एका झाडाजवळ मला उतरवून जीप पुढल्या गावी निघाली आणि जोरात पाऊस सुरू झाला. तिथे बसलेल्या तिघांजवळ मी प्रौढशिक्षण वर्गाची चौकशी केली. तो तिथून दूरच्या वस्तीवर असल्याचे कळले. ‘तुम्ही म्हणत असात, तर जाऊ या’, लोकांचा काही सहकार्य करण्याचा मानस दिसला नाही. तिथले लोक म्हणाले, या पावसात तिथे कुणी आलेले नसणार,’ मलाही तसंच वाटत होतं. वर्ग चालू नसेल, तर घरोघरी जाऊन मूल्यमापन करावे, आशा आम्हाला सूचना होत्या. पण पावसानंतर इतका चिखल झालेला होता की चिखलातून त्या वस्तीवर जाणेही अवघड होते. दिवे गेलेले होते. सगळीकडे अंधार. काय करावे, या विचारात मी असताना तिथे मिरज तालुक्याचे तहसीलदार आले. ते गावात काही कामासाठी आले होते व मिरजेला घरी परत चालले होते. मी एकटीच बाई माणूस तिथल्या काही लोकांशी बोलते आहे असं बघून ते थांबले. पाऊस एव्हाना थांबला होता. मी त्यांना विनंती केली की ते मला घरी सोडतील का? कारण जीप येईपर्यंत कुठे कसे थांबावे कळेना. त्यांची मोटरसायकल होती. ते ठीक आहे म्हणाले. मी जीप आली की गेल्याचा निरोप द्या, असं सांगून निघाले. त्यावेळी मोबाईल आलेला नव्हता. तिथल्या लोकांनी बला टळली म्हणून हुश्य केले असणार.
नाही म्हंटले तरी अनोळखी व्यक्तीबरोबर आपण रात्रीच्या वेळी निघालो आहोत. थोडीशी धडधड होत होतीच. रस्त्यात फारशी, का जवळ जवळ वाहतूक नाहीच. मला हिन्दी मराठी सिनेमातले, एकटी शिक्षिका किंवा नर्स निघाली आहे आणि तिच्यावर कसे, कसले प्रसंग ओढवतात, याची चित्रे मन:चक्षूंपुढे उभी राहिली. वर्तमानपत्रातल्या बातम्या आठवू लागल्या.
वीसेक मिनिटांच्या प्रवासानंतर वाटेत एका ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असताना दिसले. पाण्याला चांगलाच वेग होता. तो वेग पाहून मी त्यांना विचारले, मी खाली उतरून चालत येऊ का? ते नको म्हणाले. त्यांनी योग्य गतीने मोटरसायकल त्या फरशीवरील पाण्यातून बाहेर काढली. 4-5 मिनिटात आम्ही त्या पाण्यातून बाहेर पडलो. चालत येणंच जास्त धोकादायक होतं, हे माझ्या नंतर लक्षात आलं. त्या चार-पाच मिनिटात मला ओढ्यातून कुणी कुणी वाहून गेल्याच्या बातम्या आठवत होत्या. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी मला सूचना दिली की मी काहीही बोलू नये. सुमारे पंधरा- वीस मिनिटे गेली आणि ते म्हणाले, आता आपण सुरक्षित ठिकाणी पोचलो आहोत. मागचा टापू हा दरोडेखोरांच्या हल्ल्यासाठी कुप्रसिद्ध होता. त्यानंतर आम्ही मिरजेत पोचलो. देवासारख्या धावून आलेल्या या तहसीलदारांनी मला सांगलीला घरी आणून पोचवले. या देवमाणसाचे नाव आज मला आठवत नाही, याची खंत वाटते.
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खरोखर अविस्मरणीय आहे हा अनुभव. त्या तहसीलदारांचे कौतुक करावे तेवढे कमीच.