सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ अशी झाले मी उद्योजिका ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

साधारण एक वर्षापूर्वी माझी भाची सौ मेधा सहस्रबुद्धे, जी स्वतः उत्तम शिक्षिका आहे, तिने कल्पना मांडली की आपल्याकडे इतकी छान छान पुस्तके आहेत, तर आपण ती एकत्रितपणे वाचूया का? 

माझी नणंद विमल माटेने ती कल्पना उचलून धरली.

माझ्या पतिराजांना पुस्तक म्हणजे जीव की प्राण  .त्यामुळे घरात कपड्याच्या कपाटापेक्षा पुस्तकाची कपाटे मोठी. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने ही त्यांना खरी आदरांजली, असेही वाटून गेले आणि मग एके दिवशी आम्ही एक ग्रुप फॉर्म केला त्याला नाव दिले” संवादिनी “.

माझी मोठी नणंद म्हणजे मेधाची आई सुध्धा लगेच आमच्या ग्रुपला जॉईन झाल्या.

मग आम्ही पहिले पुस्तक गुगलमीट वरून  सुधा मूर्तींचे ‘ wise  and otherwise ‘ वाचायला सुरू केले. वाचनाबरोबर रोज त्यावर चर्चा करता करता आमच्यासारखे पुस्तक वेडे एक एक करून ग्रुप ला जॉईन झाले. पहिल्या दिवशी आम्ही चौघी आणि मृदुला अभंग आणि मंजिरी अदवंत  आल्या.

‘समानशीले व्यसनेषु सख्यं ’ ह्या उक्तीप्रमाणे हळूहळू आमचा ग्रुप खूप मोठा झाला. आमच्या ग्रुप मध्ये ८६ वर्षापासून  पन्नाशीच्या अलीकडे पलीकडे असणाऱ्या  सर्वजणी तितकाच इंटरेस्ट घेऊन ऐकतात आणि वाचतात. एका सदस्याचे ९२ वर्षाचे वडीलसुद्धा  खूप आवडीने सहभागी झाले होते  तिच्याकडे होते त्यावेळेस.

गुगलमीटमुळे एकाच वेळी पुणे, सांगली, मुंबई, कोल्हापूर, बडोदा इथल्या सगळ्या एकत्र वाचन करतो. एक मैत्रीण परदेशी आहे, पण तीही जमेल तसे जॉईन होते.

हा उपक्रम जवळ जवळ एक वर्ष चालू आहे आणि आत्तापर्यंत आम्ही २५ पुस्तके वाचली आहेत .ह्याच वाचन कट्टयावर सावरकरांचे जीवन ह्याचे सार्थ चित्रण डोळ्यासमोर उभे करणाऱ्या मुग्धा पंडितना ऐकायला मिळाले. बनारसला जाऊन शिवतांडव म्हणून आलेल्या वैजयंती आसलेकर- कडून अस्खलितपणे तितक्याच ताकदीने म्हटलेले शिवतांडव ऐकायला मिळाले. करोनामुळे प्रत्यक्ष एकत्र येणे मागील काळात शक्य नव्हते. पण आम्ही इ-कोजागिरी साजरी केली. प्रत्येक सदस्याला त्यात भाग घेता आला आणि काहीतरी सादर करायला मिळाले. सूत्र संचालन सुद्धा ऑफ लाईन प्रोग्रामसारखे झाले. असा एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म खूप काही देऊन गेला. कोरोनाने आलेले नैराश्य कुठल्या कुठे पळून गेले.

आजकाल आपण म्हणतो की मुलांना वाचनाची गोडी नाही. मराठी भाषा ही त्यांना अगम्य.  पण तितकी चांगली पुस्तके एकत्र येऊन वाचली तर मुलंही लक्ष देवून ऐकतात हे आमच्या लक्षात आले.

त्यामुळे त्यांच्यासाठीही  एक दिवस मराठी भाषेतील हा खजिना त्यांच्या पुढे उघडावा असे आम्ही ठरवले आहे.

आत्तापर्यंत वाचलेली पुस्तकं फक्त मराठी अशी नव्हती. सर्व भाषांमधील भाषांतरित केलेली पुस्तकेही वाचली . तसेच ‘ महामुनी व्यास ‘ हे हिंदीमधले पुस्तकही तितक्याच कौतुकाने वाचले. आमच्या मामी सौ.उज्वला केळकरही आमच्या ग्रुपच्या सदस्य आहेत. त्या स्वतः ही उत्तम लेखिका आहेत, आणि त्यांची ६५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण त्याही वाचनात समरस होतात.

अतिशय समृद्ध अशी आपली भाषा आता  टीव्ही मोबाईल संस्कृतीमुळे पुस्तकांपुरतीच सीमित राहिली आहे. अर्थात डीजीटलाइझेशनमुळेच एकत्र वाचनाचा आनंद घेता येतो. पण ती लपलेली संपदा अश्या व्यासपीठांवर ठळक पणे उपलब्ध झाली. आम्ही सगळ्या मैत्रिणी चातकासारखी वाचनाची वाट पाहतो आणि आमची पुस्तकाची तहान भागवतो. आमच्या एक सदस्या सौ मृदुला अभंग हिने सर्व वाचलेल्या पुस्तकांची यादी लेखकांच्या नावासहीत ग्रुपवरती पाठवली आहे.

असा आहे आमचा वाचन ग्रुप “ संवादिनी “, जो सतत नवनवीन  प्रकाशित पुस्तकांच्या माध्यमातून एकमेकींशी संवाद साधतो.

© सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments