श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

२६ – १२ – २०२१      

खूप  दिवसानंतर  माझ्या  बायकोनी  फिरायला  जायचा  मनसुबा  नुसता  बोलून  न दाखवता  तिने  बुकिंगही  केले  आणि  आम्ही  अलिबागच्या  रेडिसन  ब्लु  रिसॉर्टला पोचलो.

दुपारची  झोप  काढून  आम्ही  जरा  रिसॉर्टला  फेरफटका  मारायला  बाहेर  पडलो आणि  समोरून  जराशी  स्थूल  अशी  एक बाई  एका  पुरुषाबरोबर  समोरून  येत होती.  आता  साठीतच  नाही , तर  नेहमीच पुरुषांची  अशी  नजर  जाणे  साहजिक आहे  पण  साठीची  ताकद  अशी  आहे  की  त्यावर  आता  बायकोकडून  आक्षेपही घेतला  जात  नाही.  जशी  ती  जवळ  आली  तेव्हा  तो  चेहरा  कुठे तरी बघितल्यासारखा  वाटला  पण  कुठे  ते  आठवत  नव्हते. ती दोघे  आम्हाला  क्रॉस  करून  मागे  गेले  आणि  मला  आठवले,  अरे  ही  तर  माझ्या  शाळेतली  चंदा  वाटते.  सध्या  साठी  चालू  असल्याने  साठीची  ताकद  लावायची  असे  ठरवून  बायको  बरोबर  असतानाही  मी  मागे  वळून  तिला  ऐकायला  जाईल  अशा तऱ्हेने  मोठ्याने हाक  मारली, ” चंदा….”

आणि…., आणि  तिने  मागे  वळून बघितले. ” चंदा  फाटक ” मी  परत  तिचे  नाव घेतले.

आता  तिने  साठीची  ताकद  लावली.  ज्याचा  हात  तिच्या  हातात  होता  तो  सोडून ती  आमच्या जवळ  आली. ” मध्या… तू ….अरे  तू  इथे …. ओळखलंच  नाही  आधी  तुला.  हो  आणि  आता  मी  चंदा  गुप्ते  आहे.  फक्कड  मासेखाऊ  झाली  आहे. शाळेनंतर  आत्ता  भेटत  आहोत. मध्या  डोक्यावरचे  छप्पर उडाले  रे  तुझे …. ”  भेटल्या  भेटल्या  तिने  मला जमिनीवर  आणले. शाळेत  माझ्या   मधुसुदन नावाचा शॉर्टफॉर्म  सगळ्यांनी  मधु  केला होता.  फक्त   हिच  काय  ती  मला  मध्या  नावाने हाक  मारायची ” अग  तुझे  पण  ते  लांब  केस  होते  ना.!  कुठे गेले.? हा बॉबकट कसा झाला?”  मी पण तिला  रिटर्न  शॉट  दिला.  तिथपर्यंत  आमच्या  हिच्या  आणि तिच्या बरोबर  असणाऱ्याच्या  भुवया  वर  झाल्या  होत्या.  मी  चंदाची  माझ्या बायकोशी,  सरिताशी  ओळख  करून  दिली. “अग  तुला  मी  मागे  बोललो होतो ना, आमच्या   वर्गातली  मुलगी  चंदा  आणि  मी  आमच्या  माथेरानच्या  ट्रीपला  बॉबी मधले ‘ हम  तुम  एक  कमरेमे  बंद  हो  और  चाबी  खो  जाये ” हे गाणं  गायलं  होतं. तेव्हापासूनच  आमची  जोडी  शाळेत  फेमस  झाली  होती  आणि चंदा, ही माझी अर्धांगिनी  सरिता”. चंदाने  चेहऱ्यावर  खोटे  हसू  आणून  नमस्कार  केला  आणि तिच्याबरोबर  असणाऱ्याकडे  हात  करून  बोलली,  “हा माझा मित्र  पवन … पवन राठी.’  ( त्याच्याही  डोक्यावरचं  छप्पर  उडालं  होतं  माझ्यापेक्षाही पेक्षा  जास्त.  त्यामुळे  मी मनात जरा  खुश  झालो )  पवन माझ्या कॉलेजमध्ये होता. चार वर्षांपूर्वीच अचानक  भेट झाली  तेव्हापासून  आम्ही  दरवर्षी  असे  दोन  दिवसासाठी  फिरायला  बाहेर जातो….माझा  नवरा  शिपवर  असतो  आणि  पवन  बिचारा  एकटाच  आहे  रे  म्हणून  जरा  त्याला  विरंगुळा  मिळावा म्हणून  आम्ही  असे  वरचेवर  भेटत  असतो”  चंदानी  तर  एकदम  जबरदस्त  साठीची  ताकद  दाखवली.  आमच्या  हिच्या  कपाळावरच्या आठ्या  जरा  वाढल्या  पण  मी  मनात  खुश  झालो  होतो कारण , नाही  म्हणायला  मी  पण  तिचा शाळेतला मित्र  होतो,  फक्त  एकटा  नसलो  तरी  विरंगुळा  का  काय  त्याची  मलाही  गरज  होतीच की.

क्रमश:…. 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments