सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 2 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(पण तरी गेले आठ महिने मी हा उपवास सुरू ठेवला आहे आणि आता यापुढेही स्मार्टफोन फ्री आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.’) इथून पुढे —-
– अर्थात हा निर्धार तिचा या स्पर्धेआधीपासून होताच. कारण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिनं जो व्हिडीओ तयार केला होता तोही मोठा रंजक आहे. त्यात ती असं स्पष्ट म्हणते की, “ स्मार्टफोन आणि आपण ही एक लव्ह- हेट प्रकारचीच रिलेशनशिप आहे. फोन हातात नसेल तर जगणं सुनं सुनं वाटतं. मी तर सगळी कामं फोनमध्येच नोंदवते. रात्रंदिवस सोशल मीडियात कनेक्ट असते. मोबाइल गेम खेळण्याचीही चटक लागलेली आहे. घरात कुणी बोलतंय, गप्पा मारतंय, जेवतंय, त्यावेळीही हातात फोन घेऊन तो कधी एकदा स्क्रोल करायला लागायचा असं व्हायचं. मी सतत फोनवरच.”
“ मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की, मी माझा वेळ वाया घालवते आहे. मी स्क्रोल करण्यापलीकडे काहीही करत नाही. फक्त वेळ वाया घालवते आहे. ‘डूइंग नथिंग’ या स्टेजला मी कधी पोहोचले मला कळलंही नाही. रोज मी झोपतानाही फोन उशाशीच घेऊन झोपायचे. रात्री- बेरात्री जाग आली तरी मी लगेच हातात फोन घेऊन स्क्रोल करायला लागत असे. आणि एवढं करून मला कशासाठीच वेळ नव्हता. वेळच मिळत नाही ही तक्रार मी सतत करत होते. त्यामुळे मला वाटतं की या स्मार्टफोनशिवाय जगून पाहावं. म्हणून मी या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं.”
-हा तिचा व्हिडिओ निवडला गेला. तिनं आव्हानही स्वीकारलं; पण पुढे काय? सोपं आहे का सेलफोनशिवाय राहणं? कसं जमलं तिला?
एलिना सांगते, “ मुळात मी सेलफोनशिवाय जगायचं म्हणतेय याचा धक्का माझ्या मित्र-मैत्रिणींनाच जास्त बसला. ते म्हणाले, ‘अशक्य आहे तू जे म्हणतेस ते, शक्यच नाही याकाळात सेलफोनशिवाय जगता येणं.’ पण मी ठाम होते. मलाही एकदम रिकामपण आलं. खूप वेळ एकदम अंगावर आला. मला साधं कुणाशी फोनवर बोलायला वेळ नव्हता; पण आता हातात फोन नाही, त्यावरचा स्क्रोलिंग नाही म्हटल्यावर मला वेळच वेळ होता. अगदी रिकामा वेळ. अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्यावाचून काही पर्यायच उरला नाही. फोटो घेण्यापेक्षा मी जिथं आहे ते पाहू, अनुभवू लागले. मुख्य म्हणजे माझी भरपूर झोप व्हायला लागली. या काळात मी 30 हून जास्त पुस्तकं वाचली. १२५ टक्के जास्त प्रॉडक्टिव्ह झाले. अधिक चांगलं काम करू लागले. मला वेळच नाही, ही तक्रारच माझ्या आयुष्यातून संपली. मुख्य म्हणजे सतत सोशल मीडिया स्क्रोल करकरून मी जास्त उदास आणि डिप्रेस होत असे. ते सारं बंद झालं. माझा टेक्नॉलॉजीला विरोध नाही, ती उत्तमच आहे. मात्र मी तिचा गैरवापर किंवा अतिवापर करत असे. आणि त्याबदल्यात मला काय मिळालं?
तर माझं स्वातंत्र्य गेलं. संपलंच. माझा खासगीपणा संपला. मला काही व्यक्तिगत आयुष्यच उरलं नाही. माझी विचार करण्याची क्षमताही बधिर झाली. मी फक्त तासनतास स्क्रोल करत असे. दिवसाला किमान तीन-चार तास मी फोनवर असायची. आणि त्यावेळेत मी केलं काय ?
तर काही नाही. हे किती धोकादायक आहे—–हे धोके उमगले आणि मी ठरवलं हे सेलफोन फास्टिंग करायचंच. नो मोअर स्क्रोलिंग. आणि म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं. आता ठरवलंय हे वर्षच नाही तर यापुढेही कायम स्मार्टफोन वापरायचा नाही ! “
– एलिना हे जे काही सांगते ते काही तिच्यापुरतंच मर्यादित नाही. ते आज जगभरातल्या प्रत्येकाला लागू आहे. मात्र वर्षभर सेलफोनशिवाय राहण्याचं जे धाडस एलिनाने केलंय ते करण्याची हिंमत आपल्यात आहे का?
विचारावं ज्यानं त्यानं स्वतःला..!
– समाप्त –
लेखक:- अनामिक हितचिंतक
संग्राहिका : – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈