श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 2 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

चंदा दहावी नंतर आज भेटली होती. तेंव्हा वर्गातल्या सगळ्या मुलींमध्ये दिसायला चिकनी तीच होती आणि तिचे बसणे, वागणे हे श्रीमंतीच्या घराचे दिसत होते. तेंव्हा आमच्या वर्गातल्या बहुतेक सगळ्या मुलांना चंदा आवडायची पण चंदा माझ्याशीच जास्त बोलत असे म्हणजे तसा वर्गात हुशार मुलगा मीच असल्याने तिचा अर्धा गृहपाठ ती माझ्याकडूनच करून घेत असे आणि मी पण एक मित्राचे कर्तव्य पार पाडीत असे.  दहावी नंतर मी अकरावीला आमच्या आहे त्या शाळेतच राहिलो आणि चंदा मात्र छू मंतर झाली. अकरावीला ती कुठे गेली, कुठच्या कॉलेजला गेली कोणालाच काही कळले नव्हते आणि नवीन नवीन मैत्रिणी झाल्यामुळे तशा हळूहळू तिच्या आठवणी कमी झाल्या. तरीपण मनातल्या एका कोनाड्यात तिची आठवण होती आणि आता साठीची ताकद असल्याने मी ते सरितालाही सांगायचो. आज अचानक ती समोर येऊन असे दर्शन देईल असे वाटले नव्हते म्हणजे,  आधी  तिचा चेहरा कसा कोमल होता आता तोच सुजलेला वाटतोय॰. शरीरयष्टी नाजूक होती आता फुगलेली वाटतेय.,  तरीही एक माझी जुनी मैत्रीण भेटली आणि ती पण एवढ्या बिनधास्त वागणारी म्हणून मी जरा खूषच झालो होतो.

परत एकदा साठीची ताकद लावली आणि सरिताकडे न बघताच तिला रात्री डिनरला एकत्र भेटायचे आमंत्रण देऊन मी मोकळा झालो आणि तिने काहीही आढेवेढे न घेता ते स्वीकारले. जाता जाता एकमेकांचे मोबाईल नंबर्सची देवाणघेवाण करून तिने सांगितले, ” मध्या… जरा उशिराच भेटू, जरा आता औटींगला आले आहे तर जेवायच्या आधी रूममध्ये बसून मी व्होडका घेणार आहे. बघ तू घेत असलास तर कंपनी दे. नाहीतरी पवन पण त्याच्या एका मैत्रिणीला भेटायला बाहेर जाणार आहे मी एकटीच असणार आहे…हो पण बायकोची परमिशन असेल तरच ये.” असे बोलून ती सरिताकडे बघून हसायला लागली. आता ह्यावर सरिता काय बोलणार, ह्याचे  मला टेन्शन असतानाच सरिता पण साठीच्या उंबरठ्यावर असल्याने तिनेही साठीची ताकद दाखवून तिला सांगितले, “हो… हो…..मला काहीही प्रॉब्लेम नाही. तसाही माझा डिनर टाइम ८ वाजताचा असतो त्यामुळे मी काही येणार नाही पण मधु येईल आणि मधु घेतो कमी पण त्याला चढते जास्त तेव्हा तू स्वतःला सांभाळ म्हणजे झाले. ” सरिताने होकार दिला हे मला आधी खरेच वाटेना मी मनातल्या मनात खुश झालो होतो पण तसे न दाखवता तिला सांगितले, ” चंदा जाऊन दे. आज नको. आम्ही पण खूप दिवसांनी आज बाहेर पडलो आहोत आणि सरिताला न घेता यायचे म्हणजे…. नको नंतर कधीतरी एकत्र भेटू. एवढे मी बोलत असतानाच सरिताने परत री ओढली आणि म्हणाली, ” नाही ग ….मधु  ८.३०ला तुझ्याकडे येईल नक्की  येईल उगाच तो मला  घाबरतोय. जा रे खूप दिवसांनी तुझी मैत्रीण भेटली आहे तर दे ना तिला कंपनी. “मनातल्या मनात मी खुश झालो होतो पण साठीच्या ताकदीने मनातली ख़ुशी काही मी चेहऱ्यावर न आणता चंदाला “भेटू ८.३० वाजता” असे बोलून बाय केले.

क्रमश:…. 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments