सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
मनमंजुषेतून
☆ शताब्दी ची शिदोरी.. ऋजुता पेंडसे ☆ संग्राहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
शताब्दी कार्यक्रम संपून जवळपास पंधरा दिवस झाले! अजूनही त्या दिवसांच्या आठवणी मनात रेंगाळत आहेत.. मागच्या वर्षी शताब्दी वर्ष सुरू झाले, तेव्हा कोरोनामुळे काही मर्यादित लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम साजरा झाला.. मनात स्वप्न होते की, पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट दूर झालेले असेल आणि आपण अधिक आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकू! पण.. … कोरोना पूर्ण गेलेला नसला तरी सुदैवाने डिसेंबर मध्ये तो मर्यादित प्रमाणात होता. त्यामुळे कार्यक्रमासाठी भरपूर उपस्थिती आपल्याला दिसली..
यंदा शताब्दी वर्ष असले तरी आपण या कालखंडाच्या माध्यान्हीच्या कालखंडात होतो.शाळेच्या 1969 च्या बॅचने 1996 साली पंचविसावे वर्ष उत्साहाने साजरे केले होते. तेव्हाही आपण उत्साहानं जमलो होतो, पण शताब्दी चा उत्साह काही वेगळाच! 25, 26, 27, 28 डिसेंबर 2021 हे चार दिवस शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे होते.या चार दिवसांत उत्साह अगदी ओसंडून वाहत होता!
संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षा यांनी कार्यक्रमाची आखणी अगदी व्यवस्थित केली होती. शाळेशी संबंधित सर्व लोक उत्साहाने कार्यक्रमाची आखणी करत होते.आम्ही हे सर्व व्हाॅट्सपच्या माध्यमातून पहात होतो. पहिले दोन-तीन दिवस तरुणाईचे होते. ज्यांनी शाळा सोडून जेमतेम वीस पंचवीस वर्षे झाली होती, त्यांचा उत्साह अपूर्व होता.त्या त्या दिवसाचे व्हिडिओ पाहून आम्हाला हे सर्व कळले.
२७ डिसेंबर ला आमच्या वर्गाची बॅच बरीचशी शाळेत हजर झाली होती.शाळा अगदी सजली होती.
तो मोठा पेंडाॅल, त्यात चमकणाऱ्या झिरमिळ्या, सगळीकडे लायटिंग आणि शताब्दी सोहळ्याचा आनंद दाखवणारा द्योतक म्हणून मोठ्ठा ‘आकाश कंदील!’जणू काही दिवाळीच होती शाळेची! मी आणि माझी मैत्रीण रिक्षाने हॉटेल वरून गावात येताना रिक्षावाला सुद्धा शाळेच्या शताब्दी बद्दल उत्साहाने बोलत होता!’ एवढा मोठा समारंभ पाहिलाच नाही कधी!’गावातले वातावरणही शाळे प्रमाणेच उत्साहाने भारलेले होते!
२८ तारखेला सकाळी नटून थटून आम्ही उत्साहाने शाळेत आलो. जवळपास पन्नास-पंचावन्न वर्षांनी काही चेहरे आम्ही प्रथमच पाहत होतो. त्यामुळे ‘हीच का गं ती, पूर्वी लांब केस असणारी, किंवा ‘हाच का तो, आता टक्कल पडलेला!’ असे प्रश्न एकमेकींना विचारले जात होते! वय वाढले तरी मूळचे रूप डोळ्यासमोर असतेच ना! एकमेकांशी किती बोलू नि किती नको असे चालू असतानाच नाश्त्याचा आस्वाद घेतला जात होता. चारही दिवस त्याच उत्साहाने पोहे, बटाटेवडे,चहा,काॅफी अखंड मिळत होती. मुख्य कार्यक्रम सुरु होताना ढोल-ताशांच्या गजरात शाळेच्या मुख्य दरवाज्यापासून ज्योत पेंडाॅलमध्ये आणण्यात आली. वातावरण अतिशय आनंदाचे होते. सर्व मान्यवर आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे सर खूपच छान ओळख करुन देत होते सर्वांची! .पाहुण्यांची ओळख, अध्यक्षीय भाषण तसेच इतरही प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. आणि सत्कार समारंभ सुरू झाला. शाळेसाठी खूप मोठमोठ्या देणग्या येत होत्या.मी वडिलांच्या नावे दिलेली देणगीची रक्कम फार मोठी होती असे नाही,पण त्यानिमित्त माझा सत्कार करण्यात आला.शाळा ही आपल्याला मातेसमान असते.आणि तिच्या हातून हा माझा सत्कार झाला ह्याचे मला खूप अप्रूप वाटले! या सर्व कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम दोन अडीच वाजेपर्यंत चालू होता. त्या नंतर आम्हाला थोडावेळ आमच्या वर्गात जाण्यास मिळाला. आम्ही आपापली बाके धरून बसलो. आमचे जुने शिक्षक,बाई … सर्वांच्या आठवणी आणि त्यांचे तास मनासमोर आणत खूप एन्जॉय केले! बालपण साक्षात उभे राहिले डोळ्यासमोर! तीन साडेतीन वाजता पुन्हा एकदा पेंडाॅलमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमासाठी जमलो. त्यात मला माझ्या दोन कविता वाचण्याची संधी मिळाली!
आमच्या वर्गाचा महंमद रफी असणाऱ्या मित्राची गाणी खासच झाली.कित्येक विद्यार्थ्यांनी शाळेच्या छान आठवणी सांगितल्या. त्यानंतर मुलामुलींनी गाण्याच्या तालावर नाचून घेतले.तिथेअसलेल्या युनिफॉर्म मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी च्या कट् आऊट मध्ये आम्ही फोटो काढले.तसेच 100 च्या अंकामागे उभे राहून ही फोटो काढले गेले! लहान मुलांप्रमाणे आम्ही बागडत होतो अगदी!कार्यक्रमाला वेळ खूपच कमी मिळाला असे म्हणत म्हणतच सहा वाजेपर्यंत कार्यक्रम आवरता घ्यावा लागला. पेंडॉल मधून बाहेर पडायला कुणाचेच मन होत नव्हते! प्रत्येकाचे पाय अडखळत होते पण शेवटी कुठेतरी थांबावेच लागते ना! घोळक्या घोळक्याने मुले -मुली(स्वतः ला आम्ही अजून शाळेचे विद्यार्थी च समजत होतो.) गप्पा मारत होते. एसटीचा संप, कोरोना ची भीती या सगळ्याला तोंड देत जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षा सर्व परिचित असल्याने वातावरण आपुलकीचे होते.त्या दोघांनी तसेच इतर सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले होते.शाळेच्या इतिहासात हे सुवर्णक्षण नक्कीच कायम स्वरुपी रहातील! तिथून निघताना खूप सार्या आठवणींची शिदोरी बरोबर मिळाली होती .पुढची शताब्दी काही आपल्यासाठी नाही, पण या शताब्दी ची शिदोरी आम्हाला आनंद देण्यासाठी आयुष्यभरासाठी मिळाली असं मात्र मला वाटलं!
– ऋजुता पेंडसे
संग्रहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈