डॉ. ज्योती गोडबोले

 

? मनमंजुषेतून ?

☆ देव तारी त्याला…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

देव तारी त्याला।

सत्य हे कल्पिता पेक्षा अद्भुत असते, याचा अनुभव आम्ही डॉक्टर मंडळी, रोजच्या आयुष्यात घेतच असतो.

काहीवेळा छातीठोकपणे सांगितलेले  अंदाज सपशेल चुकतात आणि काहीवेळा हताश होऊन सोडून दिलेले निदान साफ चुकते आणि रुग्ण खडखडीत बरे होतात.

माझ्या हॉस्पिटलमध्ये एक रात्री अचानक एक patient प्रसूतीसाठी आली. तिने नावनोंदणीही केलेली नव्हती.

 दुसरीच माझी patient तिला घेऊन आली होती.

मी  patient ला टेबलवर घेतले,तपासले.

तरुण मुलगी होती ती.

खूप रक्तस्त्राव झाला होता आणि जेमतेम सातवा महिना असेल नसेल.

प्रश्न विचारत बसण्याची ती वेळच नव्हती.

मी सर्व उपचार लगेच सुरू केले तिच्या नवऱ्याला रक्तपेढीत रक्त  आणायला पाठवले.पैसेही मीच दिलेत्याला. होते कुठे त्याच्या जवळ काहीच.

तिला saline लावले,योग्य ते उपचार सुरू केले.तोपर्यन्त त्याने रक्ताची  बाटलीही आणली होती.

तिला चांगल्या वेदना सुरू झाल्या आणि ती सुखरूप प्रसूत झाली.

मी ते मूल जेमतेम बघितले आणि त्या बाईंचे bp नीट आहे ना,रक्तस्त्राव कमी झालाय ना यात गुंतले ते मूल आमच्या  नर्सबाईने नीट गुंडाळून ठेवले. क्षीण आवाजात त्याने आपण आहोत ही ग्वाही दिली मीत्याच्या कडे वळले मुलगा होता तो.वजन 1000 ग्रॅम.

अगदी अपुरी,,वाढ आणि  बिचारे ते बाळ धाप लागली म्हणून कण्हत होते.

मी बाहेर आले,तिच्या नवऱ्याला म्हटले तुमची बायको वाचलीय पण हे एव्हढेसे अपुऱ्या दिवसाचे बाळ जगणे फार अवघड आहे हो तुम्ही त्याला आमच्या बाळाच्या डॉक्टर च्या हॉस्पिटल मध्ये दाखल करा तरच काही आशा आहे याची.

त्यांनी   आपापसात चर्चा केली.

बाई आमच्याकडे एवढे पैसे नाहीत त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागंल ना.

मी  आता मात्र चिडले आणि म्हणाले या मुलीची हेळसांड केलीतच पण आता हे बाळ तरी वाचवायचा  प्रयत्न नको का करायला.

कसली हो माणसे आहात तुम्ही आत्ता लगेच दाखल करा याला ते जगायची शक्यता अगदी थोडी आहे पण तरीही न्या त्याला मग ते त्याला घेऊन गेले आणि  बाळाच्या हॉस्पिटल मध्ये ते मूल भरती झाले मला लगेच आमच्या बालरोगतज्ञांचा फोन.

अग बाई, हे किती गंभीर स्थितीतले बाळ आहे कल्पना दिली आहेस ना, की हे वाचण्याचे  चान्सेस 10 टक्के पण नाहीत.

मी हो म्हणाले,त्यांनीही सर्व परिस्थितीची कल्पना नातेवाईकांना दिली, आणि उपचार सुरु झाले.

ते मूल 3 आठवडे तिकडे होते.आमचे बाळाचे डॉक्टर म्हणाले जगणार बर का ते मूल पण मंद बुद्धी होतेय की काय अशीही भीती असतेच ,या केसेस मध्ये

तशी स्पष्ट कल्पना दिलीय मी त्याच्या आईवडिलांना.

 या गोष्टीला खूप वर्षे झाली.निदान पंचवीस तरी.

किती तरी घडामोडी झाल्या आमच्याही आयुष्यात.

माझी मोठी मुलगी लग्न होऊन परदेशी गेली बाळाच्या डॉक्टरांचा मुलगाही डॉक्टर झाला.

एक दिवस माझ्या दवाखान्यात, एक पोलीस जीप थांबली झाले..दवाखान्यासमोर गर्दीच झाली.

बाईंच्या दवाखान्यात पोलीस कसे?

मीही घाबरूनच गेले, की काय बुवा भानगड झाली.. जीप मधून एक उमदा पोलीस इन्स्पेक्टर उतरला.

आत येऊ का बाई?

होहो या ना. मी म्हटले बसा, बसा.

माझ्याकडे काय काम काढले.

हे बघा,भीतीच वाटते बर का पोलिस बघितले की.

आम्ही डॉक्टर असलो तरी,एक ठोका चुकतोच.

तो हसला,आणि बाहेर जमलेल्या गर्दीला क्षणात  पिटाळून लावले.  आत आला आणि चक्क माझ्या पाया पडला. अहो अहो, हे काय करताय प्लीज असे नका करू, मी ओळखत नाही तुम्हाला.

बाई ,तुमचा पत्ता शोधत आलोय बघा माझ्या आईने मला पाठवलंय तुम्हाला आठवतंय का, त्या एका तरुण मुलीला तुम्ही वाचवले आणि ते  बाळ दुसऱ्या  दवाखान्यात पाठवले?

आता मला आठवले,होय हो,आठवले तर.

काय हो ते मूल. कोबीच्या गड्ड्या एवढे होते हो चिमुकले.पण त्याचे,आता काय?

तो हसला आणि म्हणाला,तोच कोबीचा   गड्डा तुमच्या समोर उभा आहे.

तुम्ही आणि त्या डॉक्टर साहेबानी वाचवलेले ते मूल म्हणजे मीच.

तुम्ही मला जीवदान दिलेत बाई.

माझी आई रोज तुमची आठवण काढते म्हणते, तुझा बाप  तयारच नव्हता  तुला ऍडमिट करायला.

ती बाई देवासारखी उभी राहिली खूप रागावली तुझ्या आजीला,बापाला मग केले तुला ऍडमिट नाहीतर कसला जगणार होतास  रे तू बाळा.

बाई,तुमचा पत्ता शोधत आलो.

खूप हाल काढले हो आम्ही मी आणि आईनी.

बाप मी लहान असताना  शेतात साप चावून वारला.

माझ्या आईने लोकांची धुणीभांडी करून मला मोठाकेला.

मी बीकॉम झालो,आणि मग  mpsc पास केली तुमच्या कृपेने पोलीस इन्स्पेक्टर झालो मी तर अवाकच झाले हे ऐकून.

म्हटले,अहो,मी काय केलेय सगळे कष्ट तुम्हा माय लेकराचे आहेत हो आणि बाळा,तूजगलास,  ती त्या परमेश्वराचीच कृपा.

माझ्या डोळ्यातून आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले म्हणाला,माझे लग्न आहे पुढच्या महिन्यात आई म्हणाली बाईना आणि बाळाच्या डॉक्टरांना अवश्य बोलवायचे.

त्यांनी दुनिया दाखवली तुला बाबा.

बाई,गावाला लग्न आहे.

मी जीप पाठवीन  तुम्ही ,आणि ते डॉक्टर यायलाच  पाहिजे माझ्या हातात मोठी पेढ्याची बॉक्स आणि एक भारी साडी ठेवून तो निघून गेला.

मी आणि  आमचे मुलांचे डॉक्टर, मुद्दाम त्याच्या लग्नाला,आवर्जून गेलो.

त्याच्या आईला ,आम्हाला बघून आभाळ  ठेंगणे झाले .

आम्हालाही खूप  आनंद झाला ते लक्ष्मी नारायणा सारखे जोडपे बघून आम्हाला गहिवरूनच आले.

मुलांचे डॉक्टर मला  म्हणाले, अग, या  पोरा बरोबरच एक चांगले 8 पौंडी मूल  ऍडमिट झाले होते.

ते काहीही कारण नसताना दगावले बघ.

आणि देवाचे तरी आश्चर्य बघ हे आपण आशा सोडलेले पोर, आज किती मोठे झाले.

देवाची लीला अगाध आहे हेच खरे ग बाई.  त्या दोघांना  आशीर्वाद देऊन, ते नकोनको म्हणत असतानाही भरपूर आहेर,करून आम्ही परतलो.

 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments