विविधा
☆ मनाला दाह देणारे दृश्य ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
मी आज सकाळी सायकलींगला बाहेर पडले होते. काही अंतर गेल्यावर मी जे दृश्य पाहिल त्यांनी माझ्या मनाला असंख्य वेदना झाल्या, डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले. शब्दांच्या पलीकडले असंख्य यातना देणारे दृश्य होते ते.
एक आई आपल्या काही महिन्यांच्या तान्हुल्याला कडेवर घेऊन तर काही वर्षांच्या आपल्या दोन लेकरां सह कचराकुंडीत काही अन्न मिळतंय का ते पहात होती. पदराच्या झोळीत आपल्या पिल्लाला ठेऊन जे भुकेच्या आकांताने रडत होतं, ती माता खूप आशेने सगळा कचरा, सगळ्या पिशव्या फाडून काही मिळतय का डोकावत होती. अनेक माश्या भिरभिरत होत्या, दुर्गंधी सुटली होती पण मुलांच्या पोटात भुकेने पडलेल्या आगी मुळे तीला हे काही दिसत नव्हते, जाणवत नव्हते. तीला हवं होतं फक्त काही अन्न.
हे कमी की काय म्हणून काही कुत्री तिला अडथळा निर्माण करत होती. मूलं भेदरलेल्या नजरेने एकदा आई कडे आणि एकदा कुत्र्या कडे बघत होती. एकच पिशवी दोघांना हवी होती. त्यांना हकलत, ती जिवापाड शोधत होती काही अन्नाचे घास जे आपल्या मुलांचे पोट भरू शकतील.
खूप प्रयत्न केल्या नंतर तिला एक भाकरी चा तुकडा आणि भात मिळाला. भाकरी कसली ती पूर्ण वाळून गेली होती. पण त्या माऊलीच्या चेहर्यावर ही भाकरी पाहून सुद्धा असं काही समाधान दिसले जणू पुरणपोळीच सापडली आहे.
ती ते घेऊन जरा बाजूला बसली दोन मोठ्या मुलांना भाकरीचे दोन भाग करून दिले, तर सगळ्यात छोट्या मुलाला भात भरवू लागली. ती भाकरी काही केल्या त्या मुलांना तोडता येईना. कुत्र्यांनी तोंडात हाड धरून चघळत रहावं तसं काहीसं त्यांच झालं होतं. गरिबी काय काय शिकवते सांगू, त्या मुलांनी तिथे जवळच असलेल्या पाण्याच्या नळावर जाऊन ती भाकरी चक्क ओली केली आणि खाल्ली. उरलेले पोट पाण्यानी भरले आणि हसतं हसतं आई कडे निघून गेली.
हे दृश्य पाहून मी जागेवरच थिजले होते. मनाला असंख्य यातना होत होत्या, अनेक प्रश्न मनाला भेडसावत होते. डोळ्यातून पाणी वाहतं होते आणि त्या ही पेक्षा जास्त राग येत होता अश्या अनेक बडय़ा लोकांचा जे अन्न फक्त स्वतः ची श्रीमंती दाखविण्या साठी वाया घालवतात. पर्वाची माझ्या मैत्रिणींनी दिलेली बर्थडे पार्टी चटकन माझ्या डोळ्यासमोरून गेली. काय तो सोहळा होता. अनेक खाद्यपदार्थ होते. सगळ्याची चव घेऊन बघणंही शक्य नव्हतं. बर्थडे पार्टी च्या नावाखाली केक शरीराला फासत होते. मनात आले हाच केक ह्या बाईला मिळाला असता तर… माझी आणखीन एक मैत्रिण आहे तिला मी अर्धा कप चहा दिला तर ती त्यातला पण अर्धा वगळते. अस का हे मला आज पर्यंत समजलं नाही.
काही घरांमधे तर खूप अन्न शिजवले जाते आणि दुसरे दिवशी ते फेकले जाते. काही घरात शिळे अन्न खायचेच नाही असा जणू नियम असतो, त्यामुळे ते सर्रास कोणताही विचार न करता कचरा कुंडीत फेकले जाते. हे बरोबर आहे की शिळे अन्न खाऊ नये पण मग करतानाच मोजके करावे आणि उरलेच तर गरम करून खावे. आणि अगदीच जमत नसेल तर कोणत्या तरी गरजूच्या मुखात पडेल असे तरी पहावे. काही घरांत माणसं चार आणि ब्रेकफास्ट ला जिन्नस सहा असतात. प्रत्येक व्यक्तींची आवड निवड जपण्यासाठी अनेक पदार्थ बनवले जातात आणि शेवटी ते फुकट जातात.
आज हे दृश्य पाहिल्यानंतर मी सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती करते की कृपा करून अन्न टाकू नका, वाया घालवू नका. गरजे पुरतेच शिजवा. असे किती तरी लोकं आहेत ज्यांना अन्न मिळत नाही काही कारणाने अन्न शिल्लक राहिले तर ते कचरा कुंडीत न टाकता गरजू व्यक्तींना द्या. जरा डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघा असे अनेक जण आहेत ज्यांना ह्याची गरज आहे.
अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. लोकं आपला बडेजाव दाखविण्या साठी जंगी पार्ट्या देतात ज्यात सत्राशे साठ जिन्नस बनवले जातात. आणि त्यातले निम्मे अधिक वाया जातात. हा स्टेटस सिम्बॉल दाखविण्याचा अट्टाहास कश्यासाठी ?? त्या पेक्षा रोज नेमाने काही गरजूंना अन्न दान करा. त्यांच्या पोटातल्या धगधगत्या अग्नीला शांत करा. नकळत तृप्त झालेलं मन आणि भरलेले पोट तुम्हाला लाख आशीर्वाद देऊन जातील. आणि हाच असेल तुमचा खरा स्टेटस सिम्बॉल .
आज मी तुम्हाला हातं जोडून विनंती करते शक्य असेल तेवढे अन्न दान करा. अन्न वाया घालवू नका.
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈