सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ माधवी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : माधवी

महाभारत वाचताना अनेक अनुकंपनीय दुर्दैवी स्त्रिया भेटल्या. पण माधवीच्या जीवनाचा संघर्ष, त्याग, आणि परवड पाहून हृदय हेलावून गेलं.

ययाती आणि देवयानी यांची अत्यंत सुस्वरूप आणि सद्गुणी कन्या माधवी. ही कथा महर्षी नारदांनी दुर्योधनाला सांगितलेली आहे.

विश्वामित्र ऋषींचा पट्टशिष्य गालव. त्याचे शिक्षण पूर्ण होताच गुरुदक्षिणा देण्याचा त्याने हट्ट धरला. विश्वामित्रांना गालव किती गरीब आहे हे माहीत होते म्हणून ते म्हणाले मला काही नको पण गालव आपला हट्ट सोडायला तयार नव्हता म्हणून विश्वामित्रांनी चिडून त्याला सांगितले की तुला द्यायचेच असेल तर मला श्यामकर्णी आणि शशिकिरणा सारखे आठशे घोडे दे. गालवाने आपला मित्र गरुड यांच्याकडे मदत मागितली. गरुड त्याला ययाती राजाकडे घेऊन गेला.

ययातिकडे तसे घोडे नव्हते पण आपल्या दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवणे त्याला योग्य वाटले नाही  म्हणून त्याने त्यावर तोडगा काढला की माझी अप्सरे सारखी सुंदर अशी उपवर कन्या आहे तिला हुंडा म्हणून कुणीही आठशे घोडे देऊ शकतो तू तिला घेऊन जा.

गालव अयोध्येचा राजा इश्वाकुकुलिन राजाकडे तिला घेऊन गेला. तो राजा  म्हणाला ही कन्या खुप सुंदर व सुलक्षणी आहे ती महापराक्रमी पुत्राला जन्म देईल. तिला माझ्याकडे एक वर्षे ठेव एक मुलगा झाला की दोनशे घोडे आणि ही मुलगी मी तुला परत देतो. असहाय माधवीने मान्य केले. तिला वसु मानस नावाचा पुत्र झाला 200 घोडे घेऊन ती परत ययातिकडे आली. त्यानंतर तिला काशीचा राजा दिवोदास यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यानेही एक वर्ष तिला ठेवून घेतले प्रतार्दन नावाचा मुलगा त्याला तिच्यापासून झाला. आणि दोनशे घोडे देऊन त्याने  तिला परत पाठवले. नंतर तिला भोजराजा उशिनरकडे पाठवण्यात आले. त्याच्यापासून तिला सिवी नावाचा पुत्र झाला आणि त्याने ही दोनशे घोडे देऊन तिला परत पाठवले. सहाशे घोडे घेऊन माधवी सह गालव गरुडाकडे पुढील दोनशे घोड्यांसाठी आला. गरुडाने सांगितले आता तुला उरलेले 200 घोडे मिळणारच नाहीत कारण पूर्वी फक्त वरुणाकडे  एक हजार घोडे  होते.  वरूणाला गाधी राजाच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा  होती. गांधी राजाने ऋचिक ऋषींना सांगितले तुम्ही मला ते 1000 घोडे मिळवून दिलेत तर मी माझ्या मुलीचे लग्न वरुणाशी लावून देईन. वरुणाच्या यज्ञाचे ऋचिक ऋषीनी पौरोहित्य केले. वरुणाने खूश होऊन 1000 घोडे त्यांना दान केले. गाधी  राजाने  वरील3 राजांना दोन दोनशे प्रमाणे सहाशे घोडे दान दिले आणि उरलेले 400 घोडे नदीत वाहून गेले. विश्वामित्र हे गाधीचे पुत्र आहेत. आत्तापर्यंत प्रत्येकाने तिची किंमत 200 घोडे केली तर तू विश्वामित्रांना तिला अर्पण कर म्हणजे त्यांना दोनशे  घोडे मिळाल्या सारखे आहेत. विश्वामित्रांनी ते मान्य केले व त्यांना माधवी पासून अष्टक नावाचा पुत्र झाला. त्यांनी ते सहाशे घोडे कुरणात चरायला सोडून दिले व माधवीला परत पाठवले. पुत्र जन्मानंतर परत कुमारिका होण्याचे वरदान माधवीला असल्यामुळे ती अजूनही कुमारिका म्हणूनच पित्याकडे परत आली.ययातिने गंगा यमुना संगमा वर तिचे स्वयंवर मांडले. पण स्वाभिमानी माधवीला वैराग्य आले. आपल्या देहाची झाली इतकी विटंबना पूर्ण झाली असे समजून ती वनवासात निघून गेली.अनेक वर्ष  वनात हिंडत होती.

माधवी चे चारी पुत्र मोठे झाले .वसु मानस अतिशय सच्छील व धर्माचा रक्षण कर्ता होता. सिवी अत्यंत दानशूर होता. प्रतार्दन महापराक्रमी झाला. आणि अष्टक अनेक यज्ञ करून पुण्यवान झाला.

इकडे ययाती स्वर्गवासी झाला पण त्याच्या अहंकारी स्वभावामुळे इंद्रादी देवांनी त्याला पृथ्वीतलावर ढकलून दिले .ययातिने त्यांना इच्छा सांगितली जिथे सच्छील माणसे जमली असतील तिथेच मला पडू द्या. त्याच वेळी नैमिषारण्यात माधवीचे चारी पुत्र यज्ञ करत होते .ययाती त्या पवित्र ठिकाणी पडला. नेमकी माधवी पण त्या ठिकाणी हजर होती. तिने आपल्या पित्यास ओळखले.  मुलांनी पण आईला ओळखले पण ययातीला त्यांनी ओळखले नाही. माधवीने आपली सर्व मानखंडना विसरून चारी पुत्रांना सांगितले की तुमचे व माझे पुण्य आपण माझ्या पित्याला अर्पण करून त्याला सन्मानाने स्वर्गात परत पाठवू या. त्या पुण्याईच्या जोरावर ययाती परत स्वर्गात गेला पण माधवी मात्र पुन्हा निर्विकारपणे तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली. अशी ही पितृभक्त माधवी. डोकं सुन्न करणारी तिची कथा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments