डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ व्हॅलेन्टाइन… डॉ सुनिता दोशी ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

कॉलेजमधील निरोप समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने चांगला रंगला …अचानक वक्त्याने प्रश्न विचारला,” मुलांनो तुमच्या जीवनात ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाला किती महत्त्व आहे? तुमचं ‘व्हॅलेंटाइन’ कोण आहे …. असा कधी विचार केलाय का?”… मुलांमध्ये खसखस पिकली .अरे हा काय प्रश्न झाला ?….आणि असेल कोणी व्हॅलेंटाईन …..तरी यांना सांगायचं की काय ?

……आणि तेही या व्यासपीठावर ?

एका वात्रट मुलाने मोठ्याने विचारले,” सर ,तुमचा व्हॅलेंटाइन कोण ?”

आता मात्र चांगलाच हशा पिकला… पाहुणे हसले…

“अगदी खरं सांगायच तर कोणीतरी मलाही विचारावं म्हणूनच मी हा प्रश्न विचारला होता …!”

पुन्हा जोरदार हशा….!

“आता सांगतो ,माझं जीवन हेच माझं ‘व्हॅलेंटाईन’ ज्यावर मी मनापासून प्रेम करतो….. नव्हेतर मी त्याच्या प्रेमातच पडलो आहे ….!जी आपली ‘व्हॅलेंटाईन’ , तिला जर आपण गुणदोषांसहित स्वीकारले तरच जीवन सुंदर होतं …अन्यथा ‘अर्ध्यावरती डाव मोडला ‘हे ठरलेलंच ….!तसेच जीवनातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी , घटना ,व्यक्ती ह्यांच्यासहित मी माझ्या जीवनाला स्वीकारलं आहे… मी जणू माझ्याच जीवनाच्या गळ्यात गळा घालुन गातो , नाचतो आणि रडतो देखील….!”

‘वाह क्या बात है….!

प्रत्येकाने मनापासून दाद दिली. व्हॅलेंटाईन म्हटले, की डोळ्यापुढे येते ती एखादी व्यक्ती …..जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो… विषेशतः प्रियकर… प्रेयसी किंवा पती-पत्नी… आयुष्याचा जोडीदार… वगैरे…! फारच विशाल मन असेल तर एखादी आदर्श व्यक्ती….

पण हे उत्तर मात्र अनपेक्षित होतं… विचार करायला लावणारं आणि तितकंच सुंदर होतं….!

खरंच आपण आपल्या जीवनावर प्रेम करतो का ?किंवा असं म्हणूया की आपण आपल्या जीवनाच्या प्रेमात पडतो का?…. प्रेमात पडणं तर दूरच…! पण मला यापेक्षा कितीतरी जास्त मिळायला हवं होतं ,ते मी डिझर्व करतो….! पण नशिबापुढे काय ?..असं म्हणत जीवनाचं जणू एकओझं ओढत  असतो आपण….! ‘आयुष्य ओघळुनी मी रिक्त हस्त आहे …!’अशीच अनेकांची स्थिती….!

आपल्या जीवनाच्या प्रेमात पडणारे जीवनाला सुख दुःखा सहीत स्वीकारणारे किती जण असतील बरं….?

विचार करता करता  मला एक व्यक्ती आठवली ,ती म्हणजे लहानपणी आमच्या घरी झाडलोट करणारी आवडाबाई! ही आवडाबाई एक रस्ता झाडणारी बदली कामगार होती रोज पहाटे हजेरीला जायचं.कोणी रजा घेतली तर, तिला काम मिळायचं …!नाही तर पुन्हा घरी येऊन इतरांची धुणी-भांडी झाडलोट अशी काम करायची..! महिन्यात सहा -सात बदल्या मिळायच्या ..! पण त्यासाठी दररोज हजेरीला मात्र जावं लागायचं …तेही सहा किलोमीटर चालत..! नवरा दारुड्या ,त्यामुळे “पैसे दे” म्हणून बायकोला मारहाण वगैरे नित्याचंच झालेलं…!पण अशा परिस्थितीतही आवडाबाई खूपच आनंदी असायची. तिचं आणि माझ्या आईचं चांगलं जमायचं !आवडाबाईला तिच्या नोकरीचा फार अभिमान…! अभिमान म्हणण्यापेक्षा भारी कौतुक..!

तिची नोकरी आणि त्याचं वर्णन ऐकणारा एकमेव श्रोता म्हणजे माझी आई! ती सगळं वर्णन करून सांगायची ,”साहेबानी ‘आवडाबाई ‘म्हटलं, की आपण म्हणायचं ‘हाजिर साहेब’म्हणायचं अशी आमची हजेरी असते..!” सरकारकडून मिळणारं साबण,  झाडू ,पाटी वगैरे सगळं तपशिलासह आईला ऐकवायची ती….! पगाराच्या दिवशी नवरा मारहाण करायचा, पैसे मागायचा… पण तो दिवस संपला की दुसर्‍या दिवशी मारहाणीच्या खुणा अंगावर एखाद्या दागिन्याप्रमाणे मिरवत गाणं गुणगुणत कामावर हजर….!

एकदा असंच नवऱ्याने मारलं… बिचारी रडत रडत कामावर आली… मंगळसूत्र काढून टाकलं , पांढरं कपाळ…खूप शिव्या दिल्या नवऱ्याला….!खूप रडली..!

दुसऱ्या दिवशी आमच्या घरी हळदीकुंकू होतं …ही पठ्ठी सगळं विसरून हजर..! छान ठेवणीतलं लुगडं.. कपाळभर कुंकू…डोरलं…. असा थाट !उखाणाही घेतला तिने…’आजघरात माजघर माजघरात पलंग पलंगावर सुरी…सुरी गेली सरकुन…रंगरावच्या हाताखाली पाचशे कारकून…’

‘अरे बाप रे इतके…?’ आम्ही मुलं  फिदीफिदी हसायला लागलो…! आई डोळ्यानेच दटावलं. “कसाही असला तरी  कुंकवाचा धनी आहे माझ्या…!”ती गोड अशी लाजली….

असाच एक प्रसंग… आईबरोबर बाजारात जायचं होतं, बरंच सामान आणायचंअसल्याने आवडाबाई बरोबर होतीच .रिक्षातुन आमची वरात निघाली… नेमकी रिक्षा ज्या भागातून जात होती ,तो आवडाबाईचा झाडायचा प्रभाग होता ..!आवडाबाईला कोण आनंद…”अगं बया.. हा तर माझाच ‘वेरिया’ हे बघा वहिनी या झाडापासून माझी हद्द सुरू होते ..पार त्या शाळेपर्यंत माझीच हद्द …हा भाग पण  माझाच….!

एखाद्या राजाने  आपल्या राज्याच्या सीमा दाखवाव्या त्या थाटात आवडाबाई तिचा ‘वेरिया’अर्थात ‘एरिया’ दाखवत होती.आई पण कौतुकाने “अगोबाई ,हो का ?”म्हणत तिच्या आनंदात सहभागी झाली होती .मला भारी गंमत वाटत होती. घरी आल्यावर मी आईला चिडवत होते.., “काय म्हणते तुझी मैत्रीण? चांगलीच मैत्री आहे का तुझी आवडाबाईशी…”                       

तशी आई म्हणाली,” अगं त्या आवडाबाईकडून शिकण्यासारखी एक गोष्ट लक्षात ठेव… जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि  जीवनावर प्रेम करण्याची वृत्ती…! जीवनाच्या सारीपाटावर पडलेलं दान माझ्या मनासारखं नाही म्हणून जीवनाला नावं ठेवणारे बरेच असतात… पण जे दान पडलं तेच माझं आहे…असं म्हणून त्या चांगल्या वाईट दानासह   जीवनाला आनंदाने कवटाळणारे आवडाबाई सारखे थोडेच असतात…!

व्हॅलेंटाईन म्हणजे काय हे आवडाबाईला माहीत नव्हतं आणि आईलाही…!  पण जीवनाला व्हॅलेंटाईन कसं बनवायचं हे त्यांना माहीत होतं…! आपलं जीवन हेच आपलं व्हॅलेंटाईन हे  मला नव्याने प्रत्ययाला येत होतं…!

 

डॉ सुनिता दोशी✍️

संग्राहक — ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments