डॉ मेधा फणसळकर

? मनमंजुषेतून ?

☆ शुद्ध बीजापोटी… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

“आत्या, परवा  आमच्या ऑफिसमध्ये महिलादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एक आयुर्वेदतज्ञ आल्या होत्या. महिलांना आवश्यक अशी खूप छान माहिती त्यांनी सांगितली. पण त्यांचा एक विचार काही मला पटला नाही. त्या म्हणाल्या की खरं  तर आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार आपण त्यांना जन्माला घालण्यापूर्वीच केला पाहिजे. ही जरा मला अतिशयोक्तीच वाटली.” कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणारी, नुकतेच लग्न झालेली माझी भाची पियू बोलत होती. तिच्या हातात कॉफीचा कप देत विषय बदलत मी म्हटले,“ अग पियू, गेल्या आठवड्यात तुझ्याकडून त्या शेवंतीच्या बिया आणल्या होत्या ना त्या या कुंडीत चांगल्या रुजल्याच नाहीत बघ. तुझ्याकडे किती छान बहर आला आहे शेवंतीला!” त्याबरोबर पियू लगेच त्या कुंडीकडे धावली. तिला झाडांचे खूपच वेड होते.  त्या कुंडीत बघत ती म्हणाली,“ अग आत्या, कशा रुजतील बिया? ती माती चांगली वरखाली करायला पाहिजे, त्याला थोडे खत घालायला पाहिजे आणि सूर्यप्रकाश कुठे मिळतोय त्यांना नीट?” मी पटकन हसले आणि पियूला म्हटले,“ किती अचूक निदान केलेस पियू! खरं तर त्या कुंडीत बी लावलेच नाहीये. पण मगाशी तुला ज्या गोष्टीची अतिशयोक्ती वाटत होती ना तेच तुला पटवून द्यायचे होते. चांगली फुले यायला उत्तम बी- जमीन- खत- पाणी- सूर्यप्रकाश इ.इ. सर्व पूर्वतयारीची आवश्यकता असते. मग आपल्याला अपेक्षित असणारा सर्वगुणसंपन्न उत्तम बालक निर्माण करण्याची तयारी पण आधीपासूनच करायला नको?” पियू उत्सुकतेने माझे बोलणे ऐकू लागली.

“ वास्तविक शिशु म्हणजे पूर्ण मनुष्याचे बीजरुपच! मोठया वृक्षाचा पूर्ण विकास छोट्या बीजामधून होतो. आता हेच बघ, तुम्ही एखादा प्रोजेक्ट हातात घेतला की तुमचे नियोजनबद्ध टीमवर्क सुरु होते. तसेच हे टीमवर्क आहे. पती- पत्नी याचे टीमलीडर आहेत आणि त्यांचे मानसिक- शारीरिक आरोग्य, आहार- विहार अशासारखे अनेकविध घटक त्यांच्या टीमचा हिस्सा आहेत. उत्तम शिशु निर्माण करण्यासाठी कोणते घटक कसे उपयुक्त ठरतात त्याची पूर्ण माहिती तुला या https://youtu.be/viCNjJhfsgQ व्हीडिओमध्ये मिळेल बघ.

वास्तविक या विषयावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.  आत्ताची सर्वांची दिनचर्या बघितली तर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम हे गर्भावर होऊ शकतात. अनियमित झोप, एकाच स्थितीत बराच काळ बसून ड्रायव्हिंग करणे, गर्भनिरोधकाचा अतिरिक्त वापर, शारीरिक श्रम कमी आणि मानसिक ताण अधिक, कॉम्प्युटर- मोबाईल याचा अत्याधिक वापर अशा अनेक घटकांचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होऊ शकतो. यातील काही घटक पूर्णपणे टाळणे अशक्य आहे हे मलाही समजते. पण तरीही त्यातून मार्ग कसा काढता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे.

आता तुला प्रश्न पडला असेल की “या सर्वाचा शिशुशिक्षणाशी काय संबंध?” तर मगाशी म्हटले तसे तुला ज्या रंगांची शेवंती हवी होती तो रंग ज्या बीमध्ये आहे असेच बी तू निवडले होतेस ना? मग प्रत्यक्षात आपले स्वतःचे मूल आपल्याला हवे तसे निर्माण होण्यासाठी तसे बीज निर्माण करायला नको? आणि ज्या क्षणी या बीजापासून गर्भनिर्मिती होते तेव्हापासूनच त्याचा “ मी कोण?” चा शोध सुरु होतो. हा शोध म्हणजेच त्याचे शिक्षण आहे. आणि शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर सर्वांगीण विकासाची प्रक्रिया!

“तेव्हा पियूताई, आता तरी ‛जन्मापूर्वीपासून शिशुशिक्षण’ ही अतिशयोक्ती नाही ना वाटत?” पियूला माझे म्हणणे पूर्णपणे पटले होते हे तिच्या चेहऱ्यावरुनच समजत होते. आणि वाचकहो, मला वाटते तुम्हालाही हा विचार नक्कीच पटला असेल यात शंका नाही.

 

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments