सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
मनमंजुषेतून
☆ न ज मा – भाग – 3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
मैने राखी नही बांधी। हमारे मे ऐसा कुछ रहता नही ना. मी एकदा नजमाला म्हटलं, “नजमा, अगं रोज अंघोळ करून यावं. म्हणजे बरं वाटतं. ती काही बोलली नाही. नंतर सांगायला लागली. “भाभी तुम्हे नळ छोडे बराबर पाणी मिलता है। हमे बाहर से, कतार मे ठहरनेके बगैर पाणी नही मिलता। पकाना, भांडे, कपडे धोना, साफसफाई, सब के लिए बाहर से पानी लाना पडता है। बरोबर है ना ?” मलाच डोळे उघडल्यासारखं झालं .घरात जागोजागी नळ असल्याने तिची परिस्थिती कधी लक्षातच आली नाही. फुकट उपदेश करायला काय जातंय, असंच मला वाटायला लागलं.
आता तिची अभ्यासाची गोडी वाढायला लागली होती .शाळेतून आली की, पुन्हा ” शिकवा ” म्हणून दप्तर उघडायची. परीक्षा आणि रिझल्ट ही झाला .नजमाचा पहिला नंबर आला. शाळेत खूप कौतुक झालं. नाचत नाचत बातमी सांगायला प्रथम माझ्याकडे आली.आणि “भाभी, मुझे पहिला नंबर मिला। तुम्हारी वजहसे मिला। मलाही तिच्या इतकाच आनंद झाला. रोज ती जाताना मी तिला सांगायची,” नजमा “म्हणजे “चमकता तारा “तशीच मोठी हो, आणि चमकता तारा होऊन दाखव.
एकदा गणपती उत्सव होता. नजमाचा धाकटा भाऊ सलीम मित्रांबरोबर, घरात न सांगता, पुण्याला मजा करायला गेला. घरच्यांनी दोन दिवस सगळीकडे शोध घेतला. पण सापडले नाहीत. शेवटी चैन करून पैसे संपले.आणि घरी परत आले. गणपतीचा दिवस होता तो. गणपती बरोबर तो घरी आला, अशा एका भावनेने एक नारळ, उदबत्ती, फुल, आणि केळी अशी सामुग्री घेऊन, नजमा घरी आली. तिच्या भक्तीभावाचं मला आश्चर्य वाटलं.
दिवाळी जवळ आली. तिचा दिवाळीचा उत्साह दांडगा होता. “दिवालीमे क्या क्या करेंगे भाभी? मै भी मदद करुंगी। अस तिच पालुपद सुरू होतं. दिवाळी म्हणून तिच्यासाठी, एका नवीन सुंदरशा साडीचा, फ्रील फ्रॉक मी स्वतः तिला शिवला. मी शिवण शिवत असताना, तिचं निरीक्षण असायचं. ‘मला पण शिकवा’ म्हणायची. तिला केसाच्या पिना, रिबिनी, बांगड्या, मेहंदी बरच काही आणलं. मला मुलगी नसल्याने मीही मुलीची हौस भागवून घेत होते. दिवाळीत खुष होती ती. आवडेल ते मागून घेऊन फराळ केलान. “हमारे में दिवाली नही रहती, ऐसा सब कुछ नही बनाते।” नजमा आवडीने खात असताना पाहून मलाही समाधान झालं. ज्याला मिळत नाही त्यालाच द्यावं, असं माझं एक तत्त्व होतं. भाऊबीजेच्या दिवशीही तिने दोघा भैयांना ओवाळलन. तिला ओवाळणीत रस नव्हता. भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधात रस होता. एक दिवस अचानक काय झालं कोणास ठाऊक! नजमा कामाला यायची बंद झाली. आणि तिची आई रूकसाना यायला लागली. पुन्हा पुन्हा विचारलं, नजमाला कुणी काही बोललं का? कुणी रागावलं का? खोदून खोदून विचारलं, तेव्हा रुकसाना ने सांगायला सुरुवात केली .”मुझे गलत समजू नको भाभी। नजमा बडी हो गई है। मै तो दिन भर काम को जाती हूँ। घर मे उसको अकेली रखना कठिन है । एक सग्गेमेका लडका है । दारू नही पीता। सेंट्रींग का काम करता है। कमाई भी अच्छी है ।आज नही तो कल, शादी करनी है ।मेरे सर का बोज कम हो गया। नजमा 18 साल की नई है, तो शादी करना कानून के खिलाफ है। बाहर जा के उसकी शादी की। मला मात्र मनोमन वाटत होतं, नजमा– चमकता तारा, ढग आले तरी तेवढ्यापुरता पुसट झाला तरी तो तारा पुन्हा चमकणारच.
नाजमा आज जबाबदार स्त्री झाली होती. माझं शिवण बघत असताना तिला शिवणाची आवड निर्माण झालेलीच होती. तिने शिवणाचा कोर्स केला. बाहेरच शिवण घेता घेता वाढायला लागलं. महिला उद्योजक, मधून कर्ज घेऊन, दोन शिलाई मशीन घेतलींन. हाताखाली दोन मुली घेतल्यान. आणि उत्तम चाललं होतं .आणि हे सगळं करत असताना तिने मुलांच्या अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. भरपूर कष्ट घेत होती बिचारी.
नजमाचे कष्ट आज फळाला आले. मुलगी सायरा पहिली आली. मुली बरोबर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ते ऐकून मलाही खूप खूप आनंद झाला. आम्हा तिघिंच्याही आनंदाचं, समाधानाच मूल्य वेगवेगळं होतं. आज तेच पेढे घेऊन ती आली होती .डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते .आता ती जबाबदारी स्त्री झाली होती. ती मला पुन्हा पुन्हा सांगत होती, “तुम्हारे कारण मैने यहअच्छा दिन देखा है। मै सदा के लिये तुम्हारी तरक्की मे एहसानमंद हूँ। सायरा की यश का हिस्सा तुम्हारा भी है।” तिच्या यशाचे श्रेय ती मलाही देत होती. नजमाला अभ्यासाची गोडी आणि शिक्षणाचे महत्त्व मी पटवलं, आणि तिनं ते मनावर घेऊन सायनाला शिकवलंन. असं तिचं म्हणणं ऐकून, मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटायला लागलं.
आज नजमाची मुलगी सायरा चमकली. उद्या मुलगाहि चमकेल. मुलांना प्रकाश देणारा तारा –नजमा!! नाव सार्थ करणारी ठरली. जो स्वयंप्रकाशी असतो, तोच दुसर्याला प्रकाश देऊ शकतो. नजमाने तेच केल.
समाप्त.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈