डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆पाणमाय… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
पाणमाय।
याही गोष्टीला झाली 10 वर्षे.
अचानक माझा गुडघा दुखायला लागला.
गेले ऑर्थोपेडिक मित्रा कडे.
त्याने सगळे xray काढले, म्हणाला, काय करतेस ग व्यायाम.
म्हटले रोज जाते की बाबा तळजाई चढायला.
म्हणाला, उद्यापासून ते बंद.
अरे बाबा, मग करू तरी काय या गुडघ्याला.. म्हणाला, येते का पोहायला, पोहायला सुरवात कर, नाहीतर खरे नाही त्या गुडघ्याचे.
अरे बाप रे.
आता शाळेत असताना पट्टीची पोहणारी मी आता, साठी नंतर कुठे जाऊ पोहायला.
पण इलाज नव्हता.
चौकशी केली आणि जवळच एक सुंदर तरणतलाव सापडला.
हा माझ्या घराजवळ, आणि पुन्हा Covered होता.
म्हणजे12 महिने मी पोहू शकणार होते लगेच पैसे भरले.
पहिल्या दिवशी पाण्यात उतरताना आणि उतरल्यावर अशी भीति वाटली.
मला नुसता वॉटर वॉक घ्यायचा होता. काठावर सर बसले होते.
सर कसले, 25 वर्षाचा मुलगाच.
म्हणाले, मॅडम, येतंय ना, पोहायला मग करा की सुरवात.
देवाचे नाव घेऊन सुरवात केली आणि काय आश्चर्य.
शरीर बेटे, मुळीच विसरले नव्हते, हो काहीही.
किती आनंदात मी पोहायला लागले.
वावा. फार् मजा वाटली.
मग हळूहळू माझ्या सारख्या, बायका भेटल्या.
सगळ्या जणी माझ्या वयाच्या, थोड्या लहान मोठ्या.
आमची मुले आणि महिला अशी बॅच होती.
एरव्ही वर्षातले जवळजवळ 8 महिने हा तलाव केवळ आमचाच असायचा.
पण एप्रिल मध्ये परीक्षा झाल्या, की छोटी छोटी मुले पोहायला येऊ लागायची.
ती आमच्या बरोबरच असायची.
मग काय. आमचे सर अगदी बिझी असायचे या पोरांना शिकवण्यात.
किती मनापासून शिकवायचे सर त्यांना.
4 वर्षांपासूनची मुले यायची शिकायला.
आई वडिलानाच किती हौस.
काठावर बसून सूचना करायचे.
आणि पोहून वर आले, की लगेच छानसा बाथरोब, आणि डब्यातील खाऊ.
कौतुक तर कित्ती.
आधी रोज रडारड, मग सर म्हणायचे अरे काही नाही होत. बघ बघ.
तो दादा कसा पोहायला लागला.
तुला हसतील की सगळे, भित्रा म्हणून.
काही मुले तर रडून रडून तलाव डोक्यावर घ्यायची.
आमच्या बॅच ला ध्रुव यायचा.
अगदी, बारीक, गोरापान, आणि चारच वर्षाचा जेमतेम.
बाहेर असेपर्यंत, बडबड.
सरांनी पाण्यात घेतले की आक्रोश सुरू.
आईबाबा, मावशी, आजी. , सर्वांना हाका मारूनमोठमोठ्याने रडायचा मग आम्ही पोहत असलो की सरांना म्हणायचा.
ही मावशी माझ्या मध्ये येतेय तिला बाजूला करा.
मग सर म्हणायचे मावशी, ध्रुव पोहतोय, बाजूला व्हा हं.
असे करत ध्रुव मस्त पोहायला लागला.
त्याचे रडणे, थरथर कापणे बघून एकदा मी त्याच्या वडिलांना विचारले होते,
अहो, इतका लहानआहे ध्रुव, का घाई करताय त्यालापोहणे शिकवायची किती रडतोय तो रोज.
ते हताश पणे म्हणाले, काय सांगू हो, तुम्हाला, घरी 3 वाजले की हा मला पोहायला न्या असा टाहो फोडून डोके उठवतो मग इथे आणले की गप्प बसतो.
ते, मी सर आणि इतर सगळ्या हसायलाच लागलो आणि ध्रुव लाजून वडिलांच्या मागे लपला होता.
साधारण पंधरा दिवसात सगळी मुलं सरांनी तरबेज करून टाकलेली असायची मग शेवटच्या दोन तीन दिवसात मुलांचे आजीआजोबा, कौतुकाने आपल्या नातवंडांचे पोहणे बघायला यायचे. मग एकच गोंधळ.
आजी बघ ना मी कशी उडी मारतो आजोबा माझा विडिओ घ्या ना.
आजीआजोबा कौतुकाने विडिओ काढायचे इतर वेळी शूटिंग ला बंदी असायची.
ते जून पर्यंत चे 4 महिने नुसते गडबडीने असत.
मग तो पर्यंत आमचीही या छोट्या दोस्तांशी मैत्री झालेली असे.
नावानिशी आम्ही त्यांना ओळखू लागलेले असू मग शेवटच्या दिवशी, ती मुले आमचा निरोप घेत.
मावशी बाय बाय.
आता उद्या शाळा सुरू आमची.
आता पुढच्या वर्षी येणार हं नक्की आम्ही तुम्ही सगळ्या पण असणार ना एखादी निकिता, इशिता, श्लोक, समर्थ विचारायचे.
हो तर. आम्ही बाराही महिने येतो रे, तुम्ही नक्की या हं.
मग आम्ही त्यांच्या साठी घरून खाऊ नेलेला त्यांना देत असू पुन्हा पूल रिकामा व्हायचा.
काही दिवस मग आम्हाला करमायचे नाही.
पुन्हा आमच्या आम्ही,आमचे पोहोणे सुरू करत असू सर ही मुकाट हरवल्या सारखे काठावर बसून असत.
या दोन वर्षात,कोरोना मुळे सर्व तलाव बंद होते किती किती मिस केले आम्ही या आमच्या दोस्ताला.
दोन वर्षे तलाव पूर्ण रिकामा केलेला होता.
तो नुसत्या रिकाम्या खोली सारखा तलाव बघून वाईटच वाटले.
पण आता आम्हाला सगळ्यांना मेसेज आले.
आपला तलाव सुरू झाला या.
आम्ही एकमेकींना फोन केले आणि लगेच जायला लागलोही खूप आनंद झाला, ते स्वच्छ निळेशार तुडुंब भरलेले नितळ पाणी बघून.
मला या तलावाने, काय दिले नाही?
तर सगळेसगळे दिले.
माझा उत्साह परत दिला.
माझे गुडघे थाम्बले.
मला खूप छान मैत्रिणी मिळाल्या.
तिथली माणसे आमची दोस्तच झाली.
माझ्या आणि मैत्रिणींच्याही, खूपशा तक्रारी नाहीशाच झाल्या आपले जी ए कुलकर्णी म्हणतात, तसे पाणी ही पाणमाय आहे.
तुम्ही तिच्या कुशीत शिरलात की ती तुमच्यावर आपले उबदार पांघरूण घालते.
आई सारखे प्रेमच करते पाणी तुमच्यावर.
त्यात नसतो स्वार्थ, नसतो काही हेतू.
पाणमायच ती.
या पाणमायेची ओढ लागते.
दुपारी 3 वाजले की आमची पावले तलावा कडे वळतातच.
बाहेर धुवाधार पाऊस पडत असतो.
आणि ते धारा नृत्य बघत आम्ही निवांत पोहत असतो.
खूपच थंडी पडली की मग म्हणतो अग काल 6 होते की temperature. मग आता, जरा नको ना यायला.
की मग आम्ही पुन्हा थोडे थांबतो की पुन्हा आमचं पोहोणे सुरू होतं.
ही पाण मायेशी जमलेली गट्टी या जन्मी तरी सुटायची नाही.
©️ डॉ. ज्योती गोडबोले