सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ आत्महत्या करावी वाटते…संजय आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“आत्महत्या करावी वाटते”, म्हणून एकजण डॉक्टरांकडं गेला. डॉक्टर माझे मित्र. त्यांनी समुपदेशनासाठी त्याला माझ्याकडं पाठवलं.
“आत्महत्या करायचीच आहे”, यावर गडी ठाम होता. त्याला त्याची कारणं होती. ती कारणं अगदी तकलादू नव्हती. जगावंसं वाटू नये, अशी कारणं होती ती. विष्ण्ण, खिन्न करणारी आणि उपाय आवाक्यातही नसणारी अशी कारणं होतीच ती.
मुळात तो तसा बुद्धिमान. विचारी. कलासक्त. पन्नाशीच्या उंबरठ्यावर. पण, अशा वळणावर उभा होता की आता जगाचा निरोप घेणं अधिक सोईचं. आगामी काळ फारच कठीण. इतके सारे गुंते होते आयुष्यात की त्या प्रत्येकावर काम करत बसण्यापेक्षा अलगद जगाचा निरोप घेणं चांगलं. त्याचं लॉजिक काही अगदीच चुकीचं नव्हतं.
आमच्या गप्पा सुरू झाल्या.
यथेच्छ गप्पा ठोकल्या.
दोनेक तास गप्पा झाल्यावर त्याला म्हटलं, “यार. मजा आली. उद्या भेटू.”
त्यावर तो म्हणाला, “अहो, पण मला आत्महत्या करायची होती. म्हणून मी आलो होतो तुमच्याकडे. समुपदेशनासाठी. तुम्ही त्यावर काही बोललाच नाहीत.”
मी म्हटलं, “अरे हो. विसरलोच. बोलू पुढच्या वेळी. घाई कुठं आहे. एक फक्त करा. आपण बोलल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा नाही.”
त्यानंही तसं आश्वासन दिलं.
*
या गोष्टीला काही महिने उलटले.
आज तो मित्र पुन्हा भेटला.
“यार, काय मूर्खासारखा विचार करत होतो मी? आत्महत्या वगैरे…”
तोच हसायला लागला.
मग मनसोक्त गप्पा झाल्या.
*
दरम्यानच्या काळात नेमकं काय घडलं?
माझ्याकडं येऊन तो म्हणाला होता, “मी आत्महत्या करणार म्हणजे करणार.”
मी म्हणालो होतो, “जगावं की मरावं हा ज्याचा-त्याचा निर्णय. माझी विनंती एकच. मला नव्वद दिवस दे. आपण बोलत राहू. त्यानंतर तुला हवं ते कर. तू जगत राहिलास तरी जगात क्रांती होणार नाही आणि मेलास तरी कोणाला काही फरक पडणार नाही. पण एवढी पन्नास वर्षं म्हणजे १८००० दिवस जगलास ना! आणखी नव्वद दिवस मरू नकोस. बाकी आपण बोलू.”
आम्ही नव्वद दिवसांचा कार्यक्रम आखला.
त्याला सांगितलं, “तुझ्या हातात ९० दिवस आहेत. म्हणजे दोन हजार तास. त्यातले हजारेक तर झोपेत आणि बाकी असेच गेले. उरले हजार तास. नाही तरी, मरायचेच आहे. हे हजार तास वापरू ना मस्त.”
सुरूवात आम्ही केली तीच मुळी माथेरानात.
कारण, त्याच्या माथेरानातल्या आठवणी मोठ्या रम्य होत्या!
रम्य माथेरानात आम्ही दोन दिवस राहिलो.
त्याला आवडणारी वाइन. मासे. असं भरपेट खाल्ल्यावर तो झोपी गेला.
दुस-या दिवशी सकाळी सकाळी त्याला घेऊन बाहेर पडलो. हिवाळा होता तेव्हा. धुक्याच्या दुलईत पहुडलेलं माथेरान आणि शांत तळ्याकाठी निःशब्द बसलेलो आम्ही.
‘तुझी लायकी काय, माझी लायकी काय आणि आपल्या सभोवताली जे विसावले आहे, त्याचे मोल काय! किती मिळतंय आपल्याला… आपली लायकी नसतानाही! जोवर तू जिवंत आहेस, तोवर ही सुखं तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. तेव्हा, यार धमाल करत राहा.”
एवढंच त्याला सांगितलं आणि आनंदानुभव घेऊन आम्ही परत फिरलो.
दुस-या दिवशी त्याच्या सोसायटीचं गेट टुगेदर होतं. सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला गायचं होतं. पण, दडपण होतं. ‘जमेल का? नाही चांगले गायलो, तर लोक काय म्हणतील?’
“काही का म्हणेनात? आपल्याला कुठं जगायचंय? गेलं उडत जग. गायचं आणि निघायचं. जगायचं त्यांना आहे. आपल्याला निघायचं आहे. आपल्याला काय फरक पडतो? ते हसतील वा खिदळतील. आपल्याला कुठे आहेत त्यांच्या जगण्याचे नियम? आपल्याला तर मरायचंय.”
तो बिन्धास्त मनापासून गायला.
ग्रेट नाही, पण लोकांना चक्क आवडलं. त्यालाही भारी वाटलं.
पुढच्या दिवशी त्याला घेऊन गेलो, ते अशा घरात.
जिथं कोरोनामुळं घराची पार वाताहात झालेली.
बाप मेला. आई मेली. तीन कच्चीबच्ची उरली.
आणि, एक म्हातारी.
त्यांना जेवण घेऊन गेलो.
ती पोरं याला बिलगली.
यानं मग त्यांना गोष्टी सांगितल्या. शाळेतल्या कविता म्हणाला. एका सामाजिक संस्थेनं या मुलांची जबाबदारी घेतलेली. हा म्हणाला, “माझी सगळी इस्टेट यांच्या नावानं करतो.”
म्हटलं, “इस्टेट सोड. तू त्यांना वेळ दे. प्रेम दे. ही तीन आयुष्यं उभी राहातील.”
दुस-या दिवशी त्याला फोन केला.
तर, काही शेड्यूल ठरण्याच्या आधीच हा त्या गोतावळ्यात जाऊन रमलेला.
आता मला तो शेड्यूल सांगू लागला.
“अरे, हिला पुस्तकं आणायचीत. त्याला कॅडबरी आवडते. मधली जी आहे ना, ती अप्रतिम चित्रं काढते. तिला रंगपेटी आणायचीय. म्हातारीचे पाय दुखताहेत. मी गुगलवर सर्च केलं. ते अमुक तेल चांगलं आहे. तुला काय वाटतं?”
दिवस असेच गेले.
त्याला मी सांगितलं-
“नव्वद दिवस होऊन गेले. आता, हवं तर तू मरू शकतोस.”
तो म्हणाला,
“मूर्ख आहेस का तू? त्या पोरांना आणि म्हातारीला घेऊन मला माथेरानला जायचंय.”
मी म्हटलं, “साला तू काही मरत नाहीस!”
तर म्हणतो कसा –
“मरायला आयुष्य पडलंय. थोडं जगू तर दे. “
– संजय आवटे
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈