प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? मनमंजुषेतून ?

☆ ईद मुबारक….आणि म्हैशाळवेसचा अब्दुल्ला…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

मिरजेतल्या किल्ल्याच्या कमानीतून म्हैशाळ वेसेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अब्दुला चाचाचं लाकडी फळ्यांचं सुबक असं दुकान होतं.दुकानाच्या मागेच त्याची वखारही होती. तिथून जरा पुढच्या वळणाला असणाऱ्या झोपडपट्टीत आम्ही रहायचो.त्याच्या दुकानातून आम्ही कधी कधी वरक्या तर कधी गोळ्या विकत घ्यायचो.वखारीतनं जळण घेऊन जायचो. उंचपूरा,गोरापान आणि देखणा असणारा अब्दुल्ला अजूनही आठवतो.त्याचा लांबलचक सदराही त्याच्यासारखाच असायचा.

त्याची आठवण ईद दिवशी नेहमीच येत राहते. बकरी ईदच्या दिवशी अब्दुलाच्या घरी बकरं कापलं जायचं. त्याची खबर आमच्या झोपडपट्टीत पोहचायची. आम्ही गल्लीतली पोरं भगुलं घेऊन अब्दुल्लाच्या घरी जायचो.अब्दुल्ला मूठ मूठभर मटण प्रत्येकाच्या भगुल्यात द्यायचा. मटण बघून तिथच तोंडाला पाणी सुटायचं.कावळ्या कुत्र्यांना जपत आम्ही असं जिथं तिथं मिळणारं मूठ मूठ मटण घरी घेऊन यायचो.असं मूठ मूठभर मिळालेल्या डल्ल्यांनी झोपडपट्टीतली ईद हरखून जायची.कधी कधी अब्दुल्लाच्या घरातनं शिरकुरमा पण मिळायचा.तो ही आम्ही तांब्यातनं, कुणी भगुल्यातनं घरी न्यायचो.अब्दुला असं प्रत्येकाला भरल्या अंतकरणानं दानत देऊन पाठवायचा.     

आमच्या झोपडपट्टीत अशी प्रत्येक सणाला मज्जा असायची. कधी बिर्याणी आणि घट्ट जिगरीचा सुगंध झोपडपट्टीत दरवळत रहायचा. आमच्या झोपडीच्या पुढच लैलाभाभीची झोपडी होती.तिचीही आम्हा भावंडावर विशेष माया होती. नेहमी स्वच्छ व नीटनेटकी राहणारी गव्हाळ रंगाची,सुबक नाकेली आणि सडपातळ असणारी लैलाभाभी.तिच्या कडूनही या दिवसात काय बाय मिळत रहायचं.चोंगे,रोट आणि गुलगुल्यानं; तर कधी मलिद्यानं असं ज्या त्या सणात मिळणाऱ्या पदार्थांनी आमची पोटं गच्च भरायची. डोल्यांच्या दिवसात तडतडणाऱ्या ताशात दंगून जायचो. आमच्या झोपडीच्या पुढेच कत्तलीच्या रात्रीचा खेळ असायचा.अठरापगड जाती धर्मांच्या सणांनी  आमची झोपडपट्टी अशी घट्ट बांधली गेली होती. ‘सलाम अलेकुम ‘, ‘रामराम ‘ आणि  ‘जयभिम’ च्या वातावरणात लहानपणी वावरताना एकोपा जपलेली माणसं जिथं तिथं मोठ्यामनानं हसतमुखी आणि समाधानी भावनेनं आमच्या झोपडपट्टीत नांदत होती.

…… लहानपणी ईद दिवशी आमच्या झोपडपट्टीतली पोटं भरणाऱ्या अब्दुल्लाची आठवण आजही कधी त्या भागातून जाताना येते.अब्दुल्लाच्या वखारीतनं ढलप्याचं जळण आणि चहासाठी वरक्या घेऊन जातानाचे दिवस आठवत राहतात. अब्दुल्लानं दिलेल्या मूठ मूठभर मटणाची आणि शिरकुरम्याची आठवण येत राहते. आता अब्दुल्ला काय करतो.. कसा दिसतो माहीत नाही. पण उंचपुऱ्या, गोर्‍यापान आणि देखण्या अशा अब्दुल्लाचा चेहरा मात्र विसरता म्हणता विसरता येत नाही. अशा या माणसातला माणूस म्हणून भावलेल्या- अब्दुल्लाला मनापासून सलाम अलेकुम म्हणत दुवा द्यावासा वाटतो…….!

(माणसातली माणसं….. संग्रहातून)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments