मनमंजुषेतून
☆ घर…! ☆ सुश्री माधुरी परांजपे ☆
मी घर बांधतो घरासारखं
आणि
हा पक्षी माझ्याच घरात घर बांधतोय त्याच्या मनासारखं
मी विचारलं त्याला , “बाबारे, ना तुझ्या नावाचा सात बारा,
न तुझ्या नावाचं मुखत्यार पत्र!”
तर म्हणतो कसा,
“अरे सोपं असतं का कुणाच्या घरात जागा करणं
आणि कुणाच्या मनात घर करणं”
माझं घर तर काड्यांचं आहे.
तुझं घर माडीचं आहे!
नात्यांची घट्ट वीण, विणत गेली नाही, तर
माडीचं घरसुद्धा काडीमोलाचं असतं!
मला नेहमी वाटायचं माझ्यामुळेच त्या पक्ष्यांचं घर झालं.
आता वाटतंय.
त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लास्टर पक्क झालं.
आता त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी पसायदान असते.
तो डोळे झाकून घरट्यात बसला, की
समाधिस्त आणि समृद्ध वाटतो.
त्या पक्षाने शिकवलं मला…
एका घराची दोन घरं होण्यापेक्षा
घरात घर करुन राहाणं
आणि
दुसऱ्याच्या
मनात घर करुन राहाणं कधीही चांगलं…….
संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈