डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆जिवलग झोपाळा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
झोपाळ्यावर कधी लिहीन असे वाटले नव्हते मला. लहानपणापासूनचा तो जिवलग मित्रच होता आमचा.
माझ्या माहेरी, खूप मोठा, शिसवी लाकडाचा गुळगुळीत मोठा झोपाळा माजघरात होता.
मोठा वाडा होता आमचा. शाळेतून आलो की दप्तर टाकले की बसलोच झोपाळ्यावर.
खाणे तिथेच.पुस्तके वाचणे तिथेच. माझ्या शाळेतल्या मैत्रिणी झोपाळ्यावर बसायलाच माझ्या घरी यायच्या.
माझी आजी फार हौशी. तिने छान गादी करून घेतली होती झोपाळ्याच्या मापाची.
मग तर मी रात्री झोपाळ्यावरच झोपू लागले. पायाने झोका घेत, अशी सुंदर झोप लागायची.
आजी आणि आई, दुपारची कामे झाली की टेकायच्या झोपाळ्यावर. मग त्यांचे दुपारचे निवडणे, टिपणे, शिवणे सगळे काही झोपाळ्यावरच.
माझ्या वडिलांना भारी हौस होती सगळ्या गोष्टींची. त्यांनी झोपाळ्याला चकचकीत पितळी कड्या बसवून घेतल्या होत्या. ते झोका फक्त अगदी हळू,फक्त मागे पुढे करत. आमच्या सारखा जोरात, आढ्याला पाय टेकतील असा झोका त्यांना आवडत नसे. आम्ही काय त्यांना दाद देणार.
ते गेले की चढाओढीने जोरात झोके घेत असूच. आमच्या गल्लीतली सगळी मुलं, मुली आमच्या घरी संध्याकाळी येत.
आमची खूप भांडणेही होत, झोपाळ्यावर बसण्यासाठी. तो बिचारा तरी एका वेळी किती मुलांना बसवणार ना.
मग आजी म्हणायची, ”अरे, भांडू नका– थोड्या थोड्या वेळाने सगळे बसा हं.”
ती भांडणे मिटायचीही लगेच. मग आजी सगळ्यांना छान खाऊ द्यायची.अजूनही मैत्रीण भेटली की विचारते,
“अग तुमचा झोपाळा आहे का ग अजून.काय भांडायचो ना आपण.”
मला आठवते, मराठीच्या पुस्तकातल्या कविता, झोपाळ्यावर बसून,जोरजोरात ओरडून म्हटल्यामुळे लगेच पाठ होत.
माझे मामे भाऊ उल्हास उदय पण, केवळ झोपाळा आवडतो म्हणून आमच्याकडे राहायला येत.
असेच दिवस मजेत जात होते. मी मग मेडिकल कॉलेजला गेले. तिथला अतिशय मोठा, आणि न संपणारा
अभ्यासही मी झोपाळ्यावर बसूनच केला. मला आठवते, दुसऱ्या दिवशी आमची viva असली की रात्र रात्र जागून मी झोपाळ्यावरच वाचत असायची.वडील मला चहा करून देत आणि मायेने म्हणत,” अग झोप जरा. होईल परीक्षा छान तुझी.’ माझ्या पोटात त्या व्हायवा चा मोठा गोळा आलेला असे. आई म्हणायची,”अग मस्त देशील बघ तुझी ओरल।झोप जरा.”
बघता बघता मी डॉक्टर झाले. सासरही माझं फार सुंदर होतं. खूप मोठी टेरेस होती त्या घराला–प्रशस्त ,ऐसपैस.
माझ्या वडिलांनी मला हौसेने, त्या गच्चीत, मोठा झोपाळा बसवून दिला. मला तर ब्रम्हानंद झाला.
माझी तान्ही मुलगी रात्री जागायची.तिला घेऊन मी कितीतरी रात्री झोपाळ्यावर काढल्या आहेत.
तीही त्या संथ लयीत लगेच झोपून जायची.
माझे हॉस्पिटल सुरू झाले. एखादी खूप अवघड प्रसूती करून आले की रात्री अपरात्री सुद्धा मी झोपाळ्यावर बसून चहा घेऊन तो शीण घालवत असे.
माझ्या धाकट्या मुलीलाही असेच झोपळ्याचे वेड होते. शाळेतून आली की मला शोधत ती गच्चीवरच येई.
मग तिच्या लहान विश्वातली सगळी गुपिते, रुसवे-फुगवे, झोपाळ्यावर बसून मला सांगितल्याशिवाय तिला चैन नाही पडायचे. मोठ्या लेकीला नाही फारसा आवडायचा झोपाळा. पण तरी तीही,समोर खुर्ची घेऊन बसायची मी मात्र झोपाळ्यावरच. डॉक्टर नवराही घरी आला की समोर बसून कॉफी पीत, आम्ही इतक्या गप्पा मारत असू की बस. तोच एक निवांत वेळ असे आम्हाला आमच्यासाठी असा.
मग माझ्या बहिणीही यायच्या लाडक्या भाचीशी खेळायला. ताई हॉस्पिटलमध्ये असली तरी भाची आनंदाने लाडक्या मावश्याबरोबर खेळत असे. त्याही तिला घेऊन गाणी म्हणत बसत झोपाळ्यावर.
_दिवस भराभर पुढे गेले.आम्ही गावाबाहेर बंगला बांधला. मी टेरेसवर छान झोपाळा बसवून घेतला.
मुलीही लग्न होऊन परदेशात गेल्या. माझ्या बहिणींचीही लग्ने झाली. सुदैवाने त्यांनाही मोठी घरे मिळाली.
हौसेने प्रत्येकीने आपापल्या घरी झोपाळा बांधलाच.
अजूनही आम्ही एकमेकींकडे गेलो की म्हणतो, झोपाळ्यावर बसूया ग बाई. त्याशिवाय गप्पाना रंगत येत नाही.
माझी झोपाळा वेडी मुलगी अमेरिकेला गेली. त्यांनी स्वतः चे छान मोठे घर बांधले. खूप मोठे बॅकयार्ड आहे तिचे.
तिने खूप छान झोपाळा घेतला तिथे. मी तिकडे गेल्यावर बघितला. मला अतिशय आनंद झाला.
तिची लहान मुलगी आणि मी, तासनतास झोपाळ्यावर बसून गोष्टी ऐकत असू. आजी,गोष्ट सांग ना मला मराठी, असे म्हणत ती मला झोपाळ्यावरच घेऊन जायची. वंशपरंपरा झोपाळ्याचे वेड तिच्यातही उतरलेय.
परवाच मी आमच्या पूर्वी राहत होतो त्या लक्ष्मी रोडवर गेले होते. तिथे मैत्रीण भेटली. म्हणाली ,” आहे का ग अजून तो झोपाळा तुमचा ?”
म्हटले, ” नाही ग हेमा, वडिलांनी वाडा विकला ना आमचा,झाली की ग वीस वर्षे. पण आम्ही मात्र झोपाळा बांधलाच आहे आमच्या घरात. वडिलांचा झोपाळा धाकट्या बहिणीने फार्म हाऊस वर नेला. खूप मोठे फार्म हाऊस आहे तिचे. तिकडे तो रुबाबात अजूनही झुलतोय. आमच्या आई वडिलांची माया आम्हाला देत.”
हेमाच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाली,” निदान तुमच्या झोपाळ्याला भेटायला तरी स्वातीच्या फार्म हाऊसला आलेच पाहिजे.”
आम्ही तिघी बहिणी स्वातीच्या फार्म हाऊसवर आवर्जून जातो.आणि झोपाळ्यावर बसूनच चहा,जेवणही तिथेच घेतो. आमचे अतिशय गोड सज्जन मेहुणे आम्हाला बसल्या जागी चहा कॉफी पुरवतात.
आम्हा बहिणींचे झोपाळा वेड सर्वानाच माहीत आहे आता.
—-झोका घेताना,असा भास होतो की समोर आमचे आईकाका बसलेत आणि त्यांच्या सुखी असलेल्या लेकींकडे कौतुकाने डोळे भरून बघत आहेत.—–
©️ डॉ. ज्योती गोडबोले