सौ कुंदा कुलकर्णी
☆ भगवान वेदव्यास… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
आपण सर्वजण लहानपणापासून “व्यासोच्छिष्टम् जगत्सर्वंम्” हे वाक्य वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. असा एकही विषय नाही की महर्षी व्यासांनी त्याला स्पर्श केला नाही. असे ते सर्व ज्ञानी होते. अशा भगवान वेदव्यास यांच्याबद्दल मला लहानपणापासून खूप उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्ण माहिती मिळवावी असे वाटत होते.
मी माहेरची ग्रामोपाध्ये, माझी आई माहेरची जोशी. त्यामुळे आई-वडील दोघांकडूनही अध्यात्माचा वारसा मिळाला होता . वडिलांचं घर वाळव्याला. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही तिथे जात असू. आईचं माहेर चिकुर्ड्याला. आंबे, जांभळे, करवंदे भरपूर. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे जात असू. दोन्हीकडे पोथ्या पुराणे भरपूर असत. त्यावेळी मोबाईल ,टीव्ही तर सोडाच पण साधे वाचनालय किंवा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे घरातलीच पुस्तके वाचण्याचा छंद लागला. अनेक पोथ्या ,पुराणे वाचून झाली. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ” इति श्री वेदव्यास विरचितं***समाप्तम् ” असेच असायचे, हे लक्षात आले. त्यामुळे इतके छान लिहिणारे हे ऋषी कोण अशी उत्सुकता तेव्हापासूनच होती.
२०१७ साली मी नैमिषारण्यात गेले होते . तिथे व्यास गद्दी पाहिली. तो सारा परिसर अत्यंत पवित्र आणि भारावून टाकणारा होता. डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते. भगवान वेदव्यास चिरंजीव आहेत. त्यांचे अस्तित्व त्याठिकाणी जाणवले. तिथे 88000 ऋषीमुनी वायुरूपाने आहेत असे म्हणतात. त्याची देखील अनुभूती आली. भगवान वेदव्यास यांची ती धीरगंभीर मूर्ती डोळ्यात साठवून घेतली. मोबाईल मध्ये भरपूर फोटो काढले. एक वेगळीच ऊर्जा मिळाली.
तेथून परत आल्यानंतर “ नैमिषारण्य सुरम्य कथा “ हे पुस्तक लिहायला घेतले. त्यासाठी अनेक ग्रंथ वाचायला मिळाले. त्यातूनही वेदव्यास यांची बरीच माहिती कळली.
“नैमिषारण्य सुरम्य कथा “ या माझ्या पुस्तकाची परवा तिसरी आवृत्ती निघाली. त्या संदर्भात मी बरीच व्याख्याने पण दिली. त्यावेळी लक्षात आले की भगवान वेदव्यास यांच्याबद्दल फारशी माहिती कुणाला नाही .इतकेच काय, “व्यासपीठ म्हणजे काय? त्यामागील कथा काय ? “ हेही कुणाला माहिती नाही. व्यासपीठ ,मंच, रंगमंच हे शब्द एकाच अर्थाचे आहेत असे समजून सगळे सर्रास वापरतात. पण त्यातील फरक कुणाला माहीत नाही. भगवान वेदव्यास यांच्यावर पुस्तकही उपलब्ध नाही .` तुम्हीच लिहा आणि आम्हाला द्या ` असे वाचनालयातून सांगण्यात आले. योगायोगाने याविषयीचे अनेक ग्रंथ वाचायला मिळाले.आणि मग माझ्या हातून “ ।। भगवान वेदव्यास ।। “ या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक लवकरच बुक गंगा वर उपलब्ध होईल. नक्की वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा ही विनंती.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈