सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 2 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
(पण डोंगरदऱ्यात, जंगलात ,रात्र दाटत असताना ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून गत्यंतरच नव्हते.)–
इथून पुढे —
नेमकी त्या दिवशी अमावास्या होती.जसजसा काळोख दाटू लागला, मनातल्या नकारात्मक भावनांचे साम्राज्य सुरु झाले. तहान, भूकेच्या पलिकडे पोहोचलेली मने स्वत:ला संभाळूनही थकली. अगदी बधीर झाली. तरीही प्रवास चालूच राहिला. अखेर आमच्या त्या दिवशीच्या मुक्कामी पोहोचताच भावनांचा कडेलोट झाला. ग्रुपमधल्या इतरानी केलेल्या प्रेमळ सहकार्यांने आणि सहअनूभुतीने मन अगदी भरून आले..!
त्या दिवशीचा प्रवास सगळ्यांसाठीच आव्हानात्मक ठरला होता. आमच्यातील काही जण मात्र या प्रवासामुळे थोडे जास्त धास्तावले होते.
पुढची सकाळ मात्र पुन्हा एक नवा उत्साह घेऊन समोर आली. डोले, म्याचोरमुले अशी सुंदर गावे गाठत आम्ही पुढे पुढे जात होतो. आता सात आठ तास चालणे, डोंगर चढणे- उतरणे अंगवळणी पडू लागले होते. जसजशी आम्ही उंची गाठत होतो, निसर्ग आपली अधिक हृदयंगम रुपे दाखवत होता. आता हवेतील गारठा वाढला. हिरवाई लोपून लहान झुडपांचे राज्य सुरु झाले. दगडावर पोपटी आणि केशरी शेवाळाचे मनमोहक patterns पहायला मिळाले.दिवसातील तापमान 2-3 अंश असे तर रात्री उणे 3 -4 अंश! अंगावर सहा ते सात थर लेऊन आम्ही या बदलत्या वातावरणाचा सामना करत होतो. या सगळ्यात जमेची बाजू ही की आमच्या ग्रुपमधील सगळ्यांची आता छान मैत्री होऊ लागली होती. शेर्पा मदतनीसांच्या मेहनतीकडे आणि सहकार्याकडे पाहून तर माणुसकीचे जवळून दर्शन घडत होते.
अशात प्रवासाचा सहावा दिवस उजाडला. आमची अर्धी यात्रा सुखरुप पार पडली होती. आज आम्ही गोक्यो नावाच्या गावी मुक्काम करणार होतो. हा दिवस आमच्या पुढे काय घेऊन उभा असणार आहे याची काही कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे आदल्या दिवशीचा थकवा पार करुन मजला दरमजल करत आम्ही सर्व गोक्योला पोहोचलो. दुसर्या दिवशी सकाळी लहानसा प्रक्टिस ट्रेक होता. तो ही 3 तासांचा. नाही म्हणायला वावच नव्हता. गेल्या काही दिवसात शरीराने कौतुकास्पद साथ दिली होती. खरंच सांगते, या प्रवासाने माझ्या मनात मानवी शरीराबद्दल असीम कृतज्ञता दाटून आली आहे!!!! निसर्गाच्या या निर्मितीला, तिच्यातील उर्जेला आणि क्षमतेला मन:पूर्वक सलाम!!!!
तर आता आम्ही गोक्यो री या 5800 मीटर्सवरील ठिकाणी जायच्या तयारीत होतो. काल ज्या सहचर मैत्रिणीला थोडा जास्त थकवा होता तिने आज पूर्ण विश्रांती घेण्याचे ठरवले. आम्हीही पाच सहा जणानी जमेल तितके अंतर गाठून परत येण्याचे ठरवले.इथे कोणाचीच कोणाशी तुलना, स्पर्धा नव्हती. आपली स्वत:ची क्षमता पाहून निसर्गाला जमेल तसा प्रतिसाद देत पुढे जात राहणेच योग्य होते. आमची ही मैत्रीण तीन चार तासांच्या विश्रांती नंतर आम्हाला जॉईन होणार होती. आम्ही नेहमीप्रमाणे जुजबी न्याहारी करुन हाडे गोठवणा र्या थंडीचा सामना करत सराव ट्रेकसाठी निघालो. पावलागणिक धाप लागत होती.5800 मी.(19000 फूट) उंचीवर यापेक्षा फार वेगळे अपेक्षित नव्हते. त्यामुळे सावकाश पावले टाकत आमचा सहा जणांचा चमू हळूहळू चालला होता. खडा चढ असल्यामुळे पावले सांभाळून टाकणे फार गरजेचे होते. ‘बरं झालं, आज प्रज्ञा आली नाही’कुणीतरी म्हणालं सुद्धा! इतक्यात आमच्यापैकी एकाला थोडं चक्करल्या सारखं वाटलं म्हणून तासाभराच्या चढाईनंतर आम्ही तिथूनच मागे फिरण्याचा निर्णय घेतला.
का कुणास ठाऊक, आजची मोहीम अर्धी सोडल्याच्या दु:खापेक्षा मनात सुटकेचा नि :श्वासच जास्त होता.आम्ही पाच सहा जण परत हॉटेल वर आलो. मग शेकोटीच्या भोवती बसून गरम गरम मसाला चहा पित गप्पा मारु लागलो.आता हवा छान होती. गोक्यो तलावाच्या निळयाशार प्रवाहाला चारी बाजुनी गोठलेल्या पांढर्याशुभ्र हिमप्रवाहांची पार्श्वभूमी उठाव देत होती. तळ्यात काही बदके पोहत होती. आमच्यापैकी ज्या लोकानी सकाळी ट्रेकला जायचे टाळले ते तळ्याभोवती फेरी मारायला गेले. आम्ही मात्र खिडकीच्या काचेतून आत येणारे ऊन खात निवांत गप्पा छाटत बसलो. दोन तासात एक एक करत इतर मंडळी येऊ लागली. डायनिंग हॉल गजबजू लागला. सगळे आले की न्याहरी करण्याचा विचार होता. गरम पाणी पीत, तलावाची शोभा बघत आम्ही खिडकीपाशी बसलो होतो आणि अचानक खाली काही धावपळ जाणवली. काय झाले आहे हे नीट कळले नाही पण आमचे शेर्पा मदतनीस, ग्रुपमधील तज्ञ डॉक्टरना बोलावण्याकरता आले. क्षणभरात पळापळ झाली.कोणालातरी काही त्रास होतो आहे असे कळले.ग्रुपमध्ये प्रत्येक क्षेत्रातील नामवंत डॉक्टर होते. सगळेच धावत त्या ठिकाणी पोहोचले. क्षणभरात सगळे वातावरणच बदलले….आमची मैत्रीण मृत्यूशी झुंज देत होती. इतक्या उंचीवरच्या गावातील वैद्यकीय सुविधा किती अपुर्या असतात याची त्यावेळी सगळ्याना जाणीव झाली. तरी सगळ्या डॉक्टर मित्र मैत्रिणींनी चार तास शर्थीचे प्रयत्न केले. होती नव्हती ती सर्व औषधे, उपचार केले गेले. लुक्ला गावावरुन काही मदत मिळू शकेल का, यासाठी प्रचंड फोनाफोनी झाली. पण निसर्गानेही असहकार पुकारला होता. आभाळात ढग दाटू लागले. अशा वातावरणात हेलिकॉप्टर तिथवर पोहोचणे कठीण झाले. आम्ही तिच्या इतके निकट असूनही आमची ही मैत्रीण केव्हाच आम्हाला सोडून अनंतात विलीन झाली होती…..
सगळे सुन्न झालो होतो….
सगळ्यानाच जबरदस्त धक्का बसला होता. शब्द आणि अश्रू थिजले होते. बराच काळ भयाण सुन्नतेत गेला. मग भावनांचे आणि विचारांचे काहूर माजले….
“असं झालं असतं तर…असं केलं असतं तर..” याचं युद्ध प्रत्येकाच्या मनात चालू झालं…..आता कशाचाच काही उपयोग नव्हता….काळाने अत्यंत आकस्मिकपणे आम्हा सगळ्यांवर हा प्रहार केला होता..
खिडकीबाहेर आभाळही गच्च दाटून आले होते. त्या दिवशी तिथून कोणालाही हलणे शक्य नव्हते.
“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…दोष ना कुणाचा….” ग.दिंचे शब्द मनात घोळवत जड अंत: करणाने आमची ही यात्रा अर्ध्यावर सोडून आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला…
समाप्त
लेखिका : डॉ. सुप्रिया वाकणकर.
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈