डॉ.सोनिया कस्तुरे
मनमंजुषेतून
☆ लग्न निशाणी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
(हेरवाड येथे नुकत्याच घडलेल्या एका अमानुष घटनेवरून – एका संवेदनशील लेखिकेच्या मनात दाटलेले विचार )
लग्नानंतर कुंकू कपाळी
त्याला का मिरवावे भाळी ?
बांगड्या,मंगळसूत्र,जोडवी
ताबा असल्याची निशाणी
तो मृत्यू पावता, त्याच क्षणी
तीने सोडावी सर्व निशाणी
मंगळसूत्र अमंगल कसे होई
विधवा ती पांढऱ्या कपाळी !
हीच परंपरा चालत आली
प्राण वेचले समाज सुधारकांनी
अखेर हेरवाड ग्रामपंचायतीनी
पाऊल उचलले क्रांतिकारी !
निसर्ग हिरवा फुटे पालवी
तशीच सखी हिरव्या रानी
सौंदर्य देखणे हिरवाई सजवी
हिरवाई तिची निसर्ग कहानी
साज शृंगार हक्क तिचा जरी
नकोच कोणती लग्न निशाणी
नकोत ओझी अंध परंपरेची
त्याच्याविना नाही ती अधुरी
मनोमिलना पुष्षहार घालुनी
सुरुवात व्हावी नव्या जीवनी
प्रेम, जिव्हाळा, कर्तव्य ध्यानी
अखंड उजळो दोघां मधूनी
एकमेकां घेण्या समजूनी
विश्वास सोहळा नव्या संसारी
तो व ती पुरकत्वात नांदो
आजन्म समता साथ सोबती
पती-पत्नी वा नवरा-बायको
जोडीदार म्हणा वा आणीख काही
अनेक संकटे झेलत सांभाळती
आदर प्रेम जपावा सर्वतोपरी
ती स्वतंत्र मनुष्य विचारी
नको गणना नात्यांमधुनी
पती असो अथवा नसो
जगणे श्रेष्ठ माणूस म्हणूनी !
जगणे श्रेष्ठ मानव म्हणूनी !!
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈