मनमंजुषेतून
☆ आवरा ही प्रदर्शने… ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
खरं तर, कार्यक्रम, सभा, संमेलने या खेरीज ध्वनिप्रदूषण करणा-या कर्णे, भोंगे आदि गोष्टींचा वापर सगळ्यांनीच शहाणपणाने टाळायला हवा. आरत्या, नमाज, बांग हे ईशस्तवन असेल, तर ते ठाणठाण बोंबलल्याशिवाय देवाला कळत नाही, असा गैरसमज आहे का? की, आपली भक्ति ही प्रदर्शनाची बाब आहे, असा समज आहे?
मला दुसरी शक्यता जास्त बरोबर वाटते. ही सगळी प्रदर्शने ओंगळ व्हायला लागली आहेत आणि धूर्त राजकारण्यांची शक्ति-प्रदर्शने ठरू लागली आहेत. गोंगाट, गलका हे किती त्रासदायक होतात, हे एखाद्या शांत, निरव ठिकाणी जाऊन आल्यावर कळतं. सांगीतिक श्रेणीतील किती तरी नादमधुर आवाजांना आपण मुकतो – पक्ष्यांच्या शीळा, झाडांची सळसळ, ही तर उदाहरणे आहेतच, पण वा-याच्या झुळकेला किंवा झोतालाही नाद असतो, समुद्राची गाजेची रात्रीची जाणीव थरारक असते, रातकिड्यांची किरकिर, बेडकांचं डरांव डरांव हे रात्रीच्या झोपेसाठी पार्श्वसंगीताचं काम करतं. निसर्गाची चाहूल असते ती. हे सगळं आपण गोंगाटांत हरवून चाललो आहोत, असं नाही का वाटत?
मला आठवतंय ->
मी अगदी पाऊल न वाजवता पाळण्याशी जाऊन उभी राहिले तरी माझ्या दिशेला वळलेले तान्हुल्याचे डोळे!
लोणावळ्याला रायवुड पार्क हा जंगलसदृश भाग होता. त्या दिशेने जात असतांना दिवसाउजेडी तिथं रातकिड्यांची चाललेली सामूहिक कर्कश्श किरकिर – त्या झाडांच्या समूहाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिल्यावर क्षणांत थांबली. आपला श्वास आपल्याला ऐकू येईल, इतकी शांतता क्षणात पसरली. असं वाटत होतं की लक्षावधी अदृश्य डोळे आपला वेध घेताहेत, आपल्याला जाणून घेताहेत. तो परिसर सोडला मात्र, ताबडतोब त्यांचं समूहगान सुरू झालं.
झाडावर खारीचं कर्कश्श चिरकणं सुरू झालं की समजायचं, आपली मांजर घराकडे यायला निघालीय.
लिलीचं फूल उमलतांना अतिकोमल असा फट् आवाज करतं आणि सगळ्या पाकळ्या बाहेर फेकल्यासारख्या एकदम उलगडतात.
परदेशांत जन्मलेल्या आणि वाढलेल्या आपल्या भारतीय मुलांचे इथं – भारतात पाय ठेवताक्षणी इथल्या असह्य आवाजांनी गांगरलेले चेहरे, झाकून घेतलेले कान, हे न सांगता काही सुचवत असतं, जे आपल्याला ऐकू येत नाही, समजत नाही.
मोठमोठ्या आवाजातील बोलणं, गाड्यांचे कर्णकटु भोंगे, दुचाक्यांचे फर्रर्र आवाज, गजबज ह्या अनैसर्गिक – मानवनिर्मित प्रदूषणात आता भर पडली आहे ही या डीजे, डॉल्बीवर वाजणा-या ठणाण गाण्यांची ! आश्चर्य वाटतं, हे सगळं चवीने उपभोगणा-यांचे!
सगळेच काही जंगलात वा हिमालयात जाऊ शकत नाहीत. गंमत म्हणजे तिथला निसर्गही आता या ध्वनिप्रदूषणापासून स्वतःला वाचवू शकत नाही. बहिरं असण्याचं दुःख मला माहीत आहे, पण आता बहिरं होण्यात आनंद शोधावा लागेल का? ——
© सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈