डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 2 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे

हा दिवस जाहीर झाल्यापासून प्रत्येक वर्षी आम्ही हा दिवस याचना करणाऱ्या लोकांसाठी आयोजित करत आहोत… ! 

डॉ मनीषा सोनवणे ही खरंतर योगाची मास्टर ट्रेनर…. मास्टर ट्रेनर म्हणजे शिक्षकांचा शिक्षक…. !

मागील तीन वर्षांपूर्वी एका पत्रकाराने मनीषाला म्हटले होते, ‘अहो तुम्ही मास्टर ट्रेनर आहात…. सेलिब्रिटींचे योगासन घेण्याऐवजी, भीक मागणाऱ्या लोकांची योगासने काय घेत बसले आहात ?

मनीषा म्हणाली होती, ‘भीक मागणाऱ्या लोकांनाच आम्हाला सेलिब्रिटी बनवायचं आहे … ‘ 

—तर… आजच्या दिवशी आम्ही आमच्या वृद्ध आई-वडिलांना, ज्यांना भीक मागावी लागते अशांना, लालमहाल परिसर आणि शनिवार वाड्यावर घेऊन आलो… तिथे योगाचे धडे दिले…. नाचलो…. विठ्ठल नामाचा गजर केला….!

माझे बंधुतुल्य मित्र श्री धनंजय देशपांडे उर्फ डीडी हे हा कार्यक्रम लाईव्ह करत होते…. हा माणूस म्हणजे हरहुन्नरी… ! या माणसाला शब्दात कसा पकडू ??? इथे शब्द थिटे होतात…

त्यांनी मला विचारलं हाच एरिया का निवडला ? —लाल महाल आणि शनिवार वाडा ही इतिहासाच्या हृदयातली दोन स्थाने आहेत…. 

तशीच आई आणि बाप ही  आपल्या प्रत्येकाच्याच हृदयातली दोन स्थानं आहेत… 

आई बापाचा सन्मान करायचा…. तर याहून दुसरे श्रेष्ठ स्थान नाही, म्हणून हा एरिया निवडला…. !

—यावर डिडीनी मला घट्ट मिठी मारली…. ! 

कृष्ण सुदाम्याची ती भेट होती… मला या निमित्ताने आज कृष्ण भेटला…. ! 

श्री नितीन शिंदे, मधु तारा सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष…. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग…. हा माणूस सध्या कोट्याधीश आहे…. पैशाने आणि मनानेसुद्धा !

हा माणूस रिक्षा पंचायतीचा पुणे जिल्हाप्रमुख आहे ! 

यांना कोणी विचारले, तुम्ही काय करता ?  तर हे बेधडक सांगतात, ‘काय नाय ओ…. मी रिक्षा चालवतो… !’ 

यावरून एखाद्याला वाटतं हे  “रिक्षावाले काका” आहेत…

नाही… , कोट्याधीश असून हा माणूस दिवसभर स्वतः रिक्षा चालवतो…. आणि रस्त्यात अडल्या नडल्या, अंध-अपंग यांना दवाखान्यात स्वखर्चाने ॲडमिट करतो,  कोणताही कॅन्सर पेशंट असेल तर त्याला ऍडमिट करून त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च ते स्वतः करतात… 

आज वाटण्यासाठी किराणा मालाची पोती आम्ही आणली होती… 

या वेड्या माणसाने शंभर शंभर किलोंची ही पोती स्वतःच्या पाठीवर वाहून आणली…. 

मी जरा रागावून माझ्या या मित्राला म्हणालो, ‘तुम्ही कशाला त्रास घेतला ? वेडे आहात का ? 

ते म्हणाले…., ‘बास्स का राव डॉक्टर …. माझे पूर्वीचे निम्मे आयुष्य हमाली करण्यात गेले…’ 

“धन्याचा तो माल…. मी भारवाही हमाल …. “

या “येड्या” माणसाच्या मी पायाशी झुकलो आणि त्याने मला उठवून हृदयाशी लावलं …. !

ही आणि अशीच अनेक “वेडी” माणसं आम्हाला आज भेटून गेली… पाठीवर हात ठेवले….

श्री प्रभाकर पाटील सर, सौ विजयाताई जोशी, श्री जुगल राठी सर, डॉ बजाज सर,  सौ गौरीताई पेंडसे, श्री बंकटलाल मुंदडा,  सौ आरोही दिवेकर…. आणखी किती नावे लिहू? 

यातील प्रत्येक व्यक्ती हे एक स्वतंत्र पुस्तक आहे…. 

या प्रत्येक व्यक्तिमत्वास शब्दात बांधण्यास मी असमर्थ आहे…. !

आजच्या योग दिनानिमित्त आलेले सर्व माझे आईबाप हे मला “वारकरी” दिसत होते…

आमच्याकडे तुळशीमाळ नव्हती…. म्हणून आम्ही त्यांच्या गळ्याभोवती हात गुंफले….

टाळ सुध्दा नव्हते आमच्याकडे… मग आम्ही टाळ्या वाजवल्या…. 

याचना करणाऱ्या या आई बापाच्या पायाखालची माती अबीर बुक्का म्हणून आम्ही आज कपाळाला लावली….

सर्व भेटलेल्या आईंनी डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटे मोडली आणि तिथे मृदंग वाजत असल्याचा भास झाला….. आम्ही फुगड्या घातल्या नाहीत…. परंतु रिंगण करून खेळलो….  जणू…  

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई I

नाचती वैष्णव “आई” रे II

मनीषाच्या डोईवर “तुळशी वृंदावन” नव्हते म्हणूनच की काय …. कित्येक आईंनी तिच्या डोईवर पदर धरला….

शेवटी अल्पोपहार करवून… सर्वांना शिधा दिला ! 

सर्व आईंना नमस्कार करण्यासाठी आम्ही त्यांच्या पायाशी झुकलो….  त्यांनी खांदे धरून उठवत आम्हाला पदरात घेतलं…. जणू “माऊली” भेटली… ! 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, “भिक्षेकरी आणि गावकरी” ही दोन विरुद्ध टोक आम्ही यानिमित्ताने जोडण्याचा प्रयत्न केला…! 

लाचारीची आहुती वाहून, स्वाभिमानाचा यज्ञ पेटवण्याचा प्रयत्न केला…. 

“Humanity” म्हणजे काय ? हे आम्हाला कळत नाही….  पण माणूस म्हणून जगण्या – जगवण्याचा आम्ही प्रयत्न केला….. या वृद्ध आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे, समाधानाचे हसू आज पाहिले आणि आम्हाला इथेच अख्खं पंढरपुर दिसू लागलं… 

सरतेशेवटी गर्दीच्या गोंगाटात…. भरधाव वाहनांमधून वाट काढत, त्यांच्या हाताला धरून आम्ही त्यांना रस्ता क्रॉस करून दिला… 

जाताना त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहून सहज मनात विचार आला…. खरंच रस्ता कोणी कोणाला क्रॉस करून दिला ? 

प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईने आमचा हात धरून आम्हालाच गर्दीचा हा रस्ता क्रॉस करवून दिला होता…. 

परतीच्या प्रवासाला चाललेली ती पाऊले पाहून….विठ्ठल-रखुमाईच्या चरणांचा साक्षात्कार झाला…. 

आम्ही मग इथे नतमस्तक जाहलो… ! 

— समाप्त —  

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

२१ जून २०२२

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments