सुश्री शुभदा जोशी
मनमंजुषेतून
☆ शोध आनंदाचा…भाग – 4 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆
शनिवार संध्याकाळ!
पुण्यातल्या गर्दीतून साठेसाई गावातल्या आमच्या शेतावर गेल्यावर हळूहळू मन निवत जातं. संध्याकाळी परिसरातले बदल टिपत टिपत निवांत चालत होतो.
अचानक लक्ष गेले अंगांगाने फुललेल्या, बहरलेल्या रानजाईच्या वेलीकडे. वा! कमाल! मंत्रमुग्ध केले तिने… तिच्या सुगंधाने मन मदहोश झाले… ‘ तू… तेव्हा तशी… बहराच्या बाहूंची… ‘ ही ग्रेस यांची कविता आठवली. तो क्षण कॅमेरात टिपून घेण्याचा मोह आवरला नाही…
हा आनंद! झुळूक… तापल्या भाळावर, थंड वाऱ्याची!
शेतावरच्या आमच्या वॉचमन सखीला मी हे फोटो मोठ्या अप्रूपानं दाखवले. ती सहज म्हणाली,” ती पांढरी फुलं व्हय? ” तिच्यासाठी तो नेहमीचाच सिलसिला होता, उमलणे – कोमेजणे… त्यात काही नवल नव्हते.
तिच्या आणि माझ्या आनंदाच्या कल्पना किती वेगळ्या आहेत! सापेक्ष आहे बुवा सगळे!
© सुश्री शुभदा जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈